अंडर-१९ पोरांच्या आशिया कपमध्ये राडा घालणाऱ्या कार्यकर्त्याचं भारताशी कनेक्शन आहे

आशिया कप म्हणजे आपल्या खंडाचा वर्ल्डकपच. आपल्याकडचे चाहते टेस्ट मॅचेस जितक्या आतुरतेनं पाहत नाही, तितक्या आतुरतेनं आशिया कप पाहतात. अर्थात त्यामागं कारणही तसंच असतं. आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान हे दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी भिडतात आणि भारत पाकिस्तान म्हणलं की सगळी दुनिया एकाबाजूला ठेऊन टीव्ही किंवा मोबाईलसमोर बसायचंच हा आपला शिरस्ता.

आता सध्या आपली भारताची टीम गेलीये साऊथ आफ्रिकेला मग आशिया कपचा विषय आला कुठून. फक्त सिनिअर टीमचं क्रिकेट पाहत असाल, तर चॅनेल बदला भिडू. सध्या अंडर-१९ संघांचा आशिया कप सुरू आहे. विराट कोहली, युवराज सिंग, स्टीव्ह स्मिथ, बाबर आझम असे कित्येक क्रिकेटर अंडर-१९ स्पर्धांमधूनच पुढे आले. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये प्रवेश करण्याची पहिली पायरी म्हणून आजही अंडर-१९ क्रिकेटकडे पाहिलं जातं.

सध्या सुरू असणाऱ्या अंडर-१९ आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान मॅच पार पडली, भारत अगदी थोडक्यात हरला. पण लगेच मूड घालवू नका, आपल्या पोरांनी सेमीफायनल गाठलीय. आता या स्पर्धेत काय खळबळ झालीच तर ती तुम्हाला सांगावी म्हणून आम्ही बारीक लक्ष ठेऊनच होतो. खळबळ झाली.. मग म्हणलं लगेच तुम्हाला सांगावं.

अंडर-१९ आशिया कपमध्ये नेपाळ आणि कुवेत या संघाची मॅच झाली. आता हे दोन संघ तसे छोटे, पण म्हणून यांची मॅच रटाळ झाली असेल, असं तुम्हाला वाटत असेल तर तो आहे गैरसमज. या दोन छोट्या देशांच्या मॅचमध्ये दंगा मात्र मोठा झाला.

कुवेतच्या टीमनं टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. नेपाळच्या भिडूंची सुरुवात थोडी अडखळली, पण त्यांच्या मिडल ऑर्डरनं चांगलाच जोर पकडला. त्याच्या दोन कार्यकर्त्यांनी फिफ्टी मारली, तर एकानं ४९ रन्स केले. साहजिकच नेपाळनं बोर्डावर लावले २३९ रन्स.

आता एवढ्या धावांचा पाठलाग करणं काय सोपं नसतं. त्यात कुवेतच्या टीमनं युथ वनडे मॅचेसमध्ये एकही सामना जिंकला नव्हता. त्यामुळं सगळी बाजू नेपाळच्याच बाजूनं होती. कुवेतचा कॅप्टन मीत भावसार आणि ज्यूड सलधाना ही जोडी ओपनिंगला आली. या दोघांनी बोर्डावर लावले १०९ रन्स लावले. मीत भावसारनं धडाका लावलाच होता, पण कहानीमध्ये आला ट्विस्ट.

सलधाना २५ रन्स करुन आऊट झाला आणि त्यानंतर सुरू झाली घसरगुंडी. कुवेतचे पुढचे चार बॅटर २, ०, १, १ असा स्कोअर करुन आऊट झाले. हे कमी की काय म्हणत, पुढच्या चार जणांनाही ५, ०, ७, ० असे रन्स करता आले. थोडक्यात काय, तर कुवेतचा सप्पय बाजार उठला. पण या सगळ्या धुराळ्यात एक कार्यकर्ता क्रीझवर पूर्ण ताकद लावून उभा होता. तो म्हणजे कॅप्टन मीत भावसार.

त्यानं थोडेथिडके नाही, तर नॉटआऊट १७५ रन्स केले आणि कुवेतची नौका पार लावली. त्याच्या १७५ रन्सच्या पावसात २४ फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. एकट्याच्या जीवावर त्यानं २३९ रन्स चेस करुन दाखवले. सोशल मीडियावर त्याच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली. 

आता मीत भावसार हे काय कुवेती नाव वाटत नाही, अर्थातच पोरगं आहे भारतीय. मीतचा जन्म झाला कुवेतमध्ये, पण त्याचे आई-वडील भारतीय आहेत. मीत जवळपास ५-६ वर्षांचा असतानाच क्रिकेटच्या मैदानावर उतरला. जानेवारी २०१९ मध्ये त्यानं मालदीव विरुद्ध कुवैत सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यावेळी त्याचं वय होतं १४ वर्ष २११ दिवस. त्यावेळी तो आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट खेळणारा सर्वात यंग पुरुष खेळाडू ठरला.

आईची प्रेरणा आणि धोनीचा आदर्श

मीतला हातात बॅट धरायला शिकवलं ते त्याच्या आईनं. लगेच आपापल्या आयांना दाखवायला जाऊ नका, लाटण्यानी मार खाल. मीत कदाचित अभ्यासात हुशार असेल आणि सगळं ऐकत असेल म्हणून त्याला परवानगी मिळाली असेल. मीत आयपीएलचा मोठा चाहता आहे आणि त्याचा आदर्श खेळाडू आहे एमएस धोनी.

त्याच्या धुवाधार इनिंगनंतर त्याच्या बॅटिंग पासून कुणाला सेहवागची आठवण येतेय, तर कुणाला रोहित शर्माची, पण असंच कडक खेळत राहिला, तर मीत क्रिकेटविश्वास आपली स्वतंत्र ओळख बनवेल हा दिवस फार दूर नाही.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.