चार बॉलात चार विकेट खोलणारं मराठी पोरगं अजून आयपीएल डेब्यूची वाट पाहतंय

सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० सिरीज सुरू आहे. आयपीएलच्या डोसमुळं एक दहा-बारा कट्टर कार्यकर्ते सोडले, तर त्या सिरीजकडं लय कुणाचं लक्ष नाहीये. आता इंटरनॅशनल मॅच कोण फार बघंना झालंय म्हणल्यावर, डोमेस्टिक क्रिकेटकडं कोण बारकाईनं बघत बसणार.

पण कसंय ज्याला आवड त्याला सवड…

आता आम्हाला क्रिकेट बघायला पण आवडतंय आणि काही वाढीव झालं की तुम्हाला सांगायला पण. त्यामुळं आम्ही डोमेस्टिक क्रिकेटकडं बारीक बघत होतोच. तेवढ्यात खळबळ झाली आणि मग ठरवलं तुम्हाला लगेच सांगावं.

भारताच्या डोमेस्टिक क्रिकेटला लय मोठा इतिहास आहे. सगळ्यात सन्मानाची म्हणून ओळखली जाणारी रणजी ट्रॉफी तर पार १९३५ पासून खेळवली जाते. इराणी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी, विजय हजारे करंडक, विनू मंकड ट्रॉफी अशा पार अंडर-१६ वयोगटापासून भारताच्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये स्पर्धा होतात. पार सचिन तेंडुलकरपासून, विराट कोहली, जसप्रीत बुमराह ते ऋतुराज गायकवाडपर्यंत अनेक हिरे डोमेस्टिक क्रिकेटमुळंच पुढं आले.

आयपीएलसारखी मोठमोठे भिडू असलेली स्पर्धाही आपली भारतीय पोरं किरकोळीत गाजवतात. यामागचं कारण आहे, सईद मुश्ताक अली टी२० स्पर्धा. आता आयपीएल इतकं ग्लॅमर या स्पर्धेला मिळत नसलं, तरी इथंही ढिगानं रेकॉर्ड्स होतात आणि घासून मॅचेसही. इथं मिळणारा अनुभवच पोरांना आयपीएलमध्ये कामी येतो.

सध्याही सईद मुश्ताक अली स्पर्धा सुरू आहे. सोमवारी संध्याकाळी त्याची फायनल रंगेल. तेही गतविजेत्या तमिळनाडू आणि माजी विजेत्या कर्नाटकमध्ये. तमिळनाडूनं हैदराबादला लय चिलमध्ये हरवलं. दुसरी सेमीफायनल मात्र घासून झाली, विदर्भाच्या पोरांनी कर्नाटकला घाम फोडला होताच. त्या पोरांमधलं मेन नाव होतं, मिडीयम पेसर दर्शन नळकांडे.

यावर्षीच्या स्पर्धेत विदर्भाच्या टीमचं डिमोशन झालं. त्यांना डायरेक्ट प्लेट ग्रुपमध्ये स्थान देण्यात आलं. त्यामुळं प्री-क्वार्टर फायनल्स खेळून पुढं जाण्याचा टास्क त्यांच्यासमोर होता. प्री-क्वार्टर फायनल्समध्ये त्यांनी महाराष्ट्रावर जबरदस्त विजय मिळवला. क्वार्टर फायनल्समध्ये राजस्थानला फक्त ८४ रन्स करू दिले. असला सणात फॉर्म बघून वाटत होतं, यावेळी विदर्भ फिक्स कप मारणार.

आता सेमीफायनलमधला किस्सा सांगतो-

पहिली बॅटिंग करणाऱ्या कर्नाटकनं खतरनाक हाणामारी केली. १९ ओव्हर्समध्ये त्यांच्या फक्त ३ विकेट गेल्या आणि बोर्डावर रन्स लागले होते १७५. शेवटची ओव्हर टाकायला आला दर्शन नळकांडे. त्यानं पहिला बॉल डॉट टाकला. दुसऱ्या बॉलवर अनिरुद्ध जोशीची विकेट, तिसऱ्या बॉलवर बीआर शरथ आऊट आणि चौथ्या बॉलवर जगदीशा सुचितची विकेट घेत त्यानं हॅटट्रिक साजरी केली. पाचव्या बॉलवर पण भिडू गप बसला नाही, त्यानं अभिनव मनोहरचीही विकेट घेतली. मागं एकदा मलिंगानं चार बॉलमध्ये चार विकेट्स घेतल्या होत्या. मुश्ताक अली स्पर्धेत कर्नाटकच्या अभिमन्यू मिथुननंही हा पराक्रम केला होता. नळकांडेनं थेट त्या लिस्टमध्ये उडी घेतली आहे.

विदर्भानं बॅटिंग करताना विजय खेचून आणलाच होता, मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये १४ रन्स करायला ते कमी पडले आणि कर्नाटकनं मॅच मारली. आता निकाल पारड्यात पडला नसला, तरी नळकांडेनं हवा मात्र केलीच.

भारताच्या अंडर-१९ संघाकडूनही खेळलेल्या नळकांडेनं सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत ८ मॅचेसमध्ये १३ विकेट्स काढल्यात. आतापर्यंतच्या २२ टी२० मॅचेसमध्ये त्याच्या नावावर विकेट्स आहेत ४३.

त्याची लयदार बॉलिंग ऍक्शन, स्पीड, सातत्य आणि मेहनत करायची तयारी बघून किंग्स इलेव्हन पंजाबनं २०१९ मध्येच त्याला आपल्या टीममध्ये घेतलं. मात्र अजूनही दर्शन पदार्पणाच्या संधीची वाट बघतोय. गेल्या एक-दोन सीझन्समध्ये पंजाबनं लय बेक्कार मॅचेस हरल्या, आता हे विदर्भाचं पोट्टं टीममध्ये असतं तर नक्क्कीच कमाल करू शकलं असतं.

आता यावेळी आयपीएलसाठी मेगा ऑक्शन होणाराय, दर्शनची सध्याची कामगिरी पाहता त्याला चांगली बोली लागली, तर फायनली विदर्भाचा अनुशेष भरून निघत असतोय.

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.