भारतातील सर्वात रागीट माणूस – परमजीत सिंह पम्मा.

साल २००५ – दिल्लीतील कांद्याचे भाव गगनाला भिडले होते. त्याविरोधात निदर्शने सुरु होती.

साल २००९  – भाजपचे नेते वरून गांधी यांनी दिलेल्या मुस्लिमविरोधी विधानाच्या निषेधार्थ दिल्लीत निदर्शने सुरु होती.

साल २०१०- दिल्ली हायकोर्टाने समलैंगिक संबंधांची परवानगी दिल्यानंतर या निर्णयाविरोधात एक गट आपली नाराजी व्यक्त करत होता.

साल २०११ – मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या सरकारमधील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांच्या चौकशीसाठी एक मोठा जमाव सरकारविरोधात घोषणाबाजी करत होता.

या चार वेगवेगळ्या घटना आहेत.

सर्वच विरोध प्रदर्शनांची कारणे आणि त्यात सहभागी लोक देखील वेगवेगळे होते. पण या चारही विरोध प्रदर्शनांमध्ये सहभागी असलेला एक माणूस मात्र कधीच बदलला नव्हता. नव्हे हाच माणूस होता जो या चारही विरोध प्रदर्शनांचं नेतृत्व करत होता.

Paramjit Sinh1
कांदा दरवाढीविरोधातील प्रदर्शन

उपरोल्लिखित चार प्रदर्शनं ही केवळ प्रातिनिधिक स्वरुपाची होत. अशा अनेक विरोध प्रदर्शनासाठी कायमच घोड्यावर बसून तयार असलेला हा माणूस म्हणजे परमजीत सिंह पम्मा.

ते भारतातील सर्वात रागीट व्यक्तिमत्व समजले जातात. त्यांना अनेक गोष्टींचा राग येतो आणि मग त्या गोष्टीच्या विरोधात झेंडा हातात घेत ते आंदोलन करतात.

पम्मा फक्त भारतात घडणाऱ्या घटना आणि घडामोडींवर राग व्यक्त करून थांबत नाहीत. जागतिक पातळीवर भारताच्या संदर्भाने कुठलीही घटना घडू देत पम्मांना ती पटली नाही तर विरोध प्रदर्शन झालंच म्हणून समजा. त्यामुळेच २००८ साली फ्रांसमध्ये शाळेतील शीख मुलांच्या पगडी घालण्यावर आणण्यात आलेली बंदी असेल किंवा २००९ साली लंडन येथील गुरुद्वाऱ्यावर झालेला हल्ला असेल पम्मांनी या घटनांविरोधी आपला आवाज बुलंद केलाच.

pamma pak
Youtube

‘पाकिस्तान हाय-हाय’ ही त्यांची आवडती घोषणा. पाकिस्तानचा विषय निघाला की त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ला असेल किंवा हाफिज सईद याचं माथी भडकावणारं एखादं विधान असो पम्मा विरोध प्रदर्शनासाठी जंतर-मंतरवर पोहोचलेच समजा.

सरकारी व्यवस्थेतील भोंगळ कारभाराच्या विरोधात आणि सामान्य माणसांच्या हिताला बाधक असणारी कुठलीही घटना घडली की आपण रागावर नियंत्रण ठेऊ शकत नाही, असं पम्मा सांगतात. मी वर्तमानपत्र वाचताना कायम अशाच बातम्या शोधतो जिथे विरोध प्रदर्शन करून आवाज उठविण्याची गरज आहे. एकदा का अशी घटना मिळाली की विरोध प्रदर्शनांची तयारी सुरु करतो अशी माहिती पम्मा देतात.

“आपण आपल्या वडिलांसोबत सगळ्यात आधी विरोध प्रदर्शनांमध्ये सहभागी झालो होतो. बाविसाव्या वर्षी जेव्हा वडिलांचं निधन झालं त्यानंतरच्या काळात एकाकीपणा जाणवायचा मग त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण स्वतःच विरोध प्रदर्शनं करायला सुरुवात केली.सुरुवातीच्या काळात ज्यावेळी भाववाढीच्या विरोधात प्रदर्शन केलं त्यावेळी त्याची माहिती देण्यासाठी मी माध्यमांकडे जात असे, पण माध्यमे दुर्लक्ष करत असत. आज मात्र आपण कुठलंही प्रदर्शन केलं की माध्यमे लगेच प्रतिक्रियेसाठी येऊन पोहोचतात.” असं पम्मा सांगतात.

विरोध प्रदर्शनांसाठी पम्मा यांनी १९९७ साली ‘राष्ट्रीय अकाली दल’ नावाचा पक्ष देखील स्थापन केलाय.

याव्यतिरिक्त उपजीविकेसाठी ते दिल्लीतील सदर बाजार भागात आपलं एक कपड्याचं दुकान चालवतात. देश-विदेशात आपल्या रागीट स्वभावासाठी प्रसिद्ध असणारे पम्मा कौटुंबिक आयुष्यात मात्र बिलकुल तसे नाहीत. पम्मांना फक्त काही चुकीचं घडत असलेलं सहन होत नाही आणि त्यामुळेच ते विरोध प्रदर्शन करतात, असं त्यांच्या पत्नी सांगतात.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.