तो ऐंशी वर्षांचा झाला आणि व्हिलचेअरवर असला तरी तो संघात पाहिजे होता.

धोनी ऐंशी वर्षांचा जरी झाला अन् व्हील चेअर वर जरी असला तरी तो माझ्या प्लेयिंग इलेव्हनचा अविभाज्य भाग असेल.

एबी डिविलीयर्स.

गेले काही दिवस धोनीचा फॉर्म, त्याला टी ट्वेंटीमधने वगळणे, येत्या विश्र्वचषकातील त्याच्या सहभागावरचे प्रश्नचिन्ह या सगळ्या पार्श्वभूमीवर डिविलीयर्सचे हे वाक्य होते.

धोनीबद्दल शक्यतो टोकाची मते बघायला मिळतात.

एकतर तो लय आवडतो किंवा अजिबात आवडत नाही.

सोशल मिडीयावर we hate dhoni because we love cricket, we hate dhoni because we love Sachin, अशा नावाची ढीग पेजेस आहेत. धोनी भारतात कथित अर्थाने कधीच अभिजात खेळाडू म्हणून गणला गेला नाही. (धोनीचे भारतापेक्षा परदेशात फॅन फॉलोईंग जास्त आहे.)

एकदा तो सचिनसोबत नॉन स्ट्रायकर एंडला असताना एक कथित अभिजात कॉमेंटेटर म्हणाला होता की,

“we have surgeon at the striker end and butcher at the other.”

त्याच्या बॅटींगच्या शैलीबद्दल पण कधी काव्यमय “लेलेगिरी” झाली नाही. (लक्ष्मण, द्रविडच्या बॅटींगसारखे). निदान मराठीत तरी नाही. त्याचे रणजीतले सहकारी सांगतात हा राष्ट्रीय संघात आल्यावर जरा कमी आक्रमक झाला आहे. तो राष्ट्रीय संघात देखिल सुरुवातीला तेवढाच आक्रमक व एक्सप्रेसिव्ह होता.

मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज मिळालेल्या टू व्हीलर फोर व्हीलरमधने चक्कर मारणे ही त्याची आवड होती. पण हे सगळं २००७ च्या कुप्रसिद्ध विश्र्वचषकापर्यंतच कायम राहिले. विंडीजमधून हारुन आल्यावर पोलिस संरक्षणात त्यांना घरी पोहचविण्यात आले. तेव्हा मला गुन्हेगार असल्यासारखं वाटत होते, असं त्याने नंतर एका मुलाखतीत सांगितले.

या विश्वचषकानंतरचा धोनी धोनी नव्हता. हा नवा धोनी कूल होता. कमी एक्सप्रेसिव्ह होता. त्याला हे कळून चुकलं होतं की १५-२० वर्ष देशाच्या अपेक्षांचं ओझं वाहणाऱ्या खेळाडूंचे जर या देशात पुतळे जाळले जातील किंवा घरावर दगडफेक केली जाईल तर आपण अजून कुणीच नाही.

धोनीनं काढलेल्या रना, त्याने जिंकून दिलेल्या मॅचेस, त्याचं नेतृत्व या सगळ्या पेक्षा धोनीचे महत्व अधिकय…

धोनी कधीच क्रिकेटपुरता मर्यादित राहणार नाही. कारण धोनी हे नाव नाही धोनी ही वृत्ती आहे. खेळाडूचे मोठेपण कधीच खेळापुरते मर्यादित नसतं.(रादर ज्या खेळाडूंचे मोठेपण खेळापुरते मर्यादित आहे ते नक्की मोठेपण आहे का भपका आहे?)

पेले, माईक टायसन, किंवा विंडीजची जगप्रसिद्ध फायर इन दी बॅबिलॉन टीम यांचे विजय हे केवळ त्यांच्यापुरते मर्यादित नसतात. त्यांचा विजय हा नाईलाजास्तव, लाजेकाजेपोटी का हुईना कथित अभिजनांना “ब्लॅक वॉश” अशी हेडलाईन देऊन साजरा करावा लागतो. ही लोकं लाखो करोडो लोकांसाठी प्रेरणा असतात.

जी स्वतावर विश्वास ठेवून कथित अभिजात अन ‌शहरकेंद्री व्यवस्थेत नशीब काढायला आली आहेत.

धोनीचा फॅन बेस बघितला तर ही गोष्ट लक्षात येते.

धोनीच्या फॅन बेस मध्ये मुली, सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गातील क्रिकेट फॅन, गाव-खेड्यातून शहरात नशीब काढायला आलेली लोकं यांचे प्रमाण जास्त आहे. (personal sample survey). ही लोकं धोनीच्या संघर्षाशी स्वताला रिलेट करतात.

शहरकेंद्री‌ व्यवस्थेत यशस्वी होण्यासाठी आपल्यामध्ये जे काही चांगले वाईट बदल करावे लागतात त्याचे धोनी सर्वोत्तम उदाहरण आहे. अगदी इंग्लिश न येण्याचा जो न्यूनगंड आहे तोसुद्धा त्याच्या post match presentation मधल्या you know, you know, you know शी जोडला जातो. धोनी बद्दल एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे जरी त्याने शहरकेंद्री व्यवस्थेत यश मिळवले असलं तरी त्याने त्याची कोअर ओरीजनॅलिटी टिकवून ठेवली.

न त्याने त्याच्या बॅटींगच्या शैलीत बदल केला, न त्याचे मित्र बदलले, न तो कधी शहरी झगामगा मला बघा टाईप पार्ट्यांमध्ये दिसला. स्वताचे गावपण टिकवून ठेवण्यात तो यशस्वी झाला आहे.

जेव्हा जेव्हा भारताच्या सर्वोत्तम क्रिकेट जिनीयसची यादी केली जाईल तेव्हा धोनी टॉप थ्रीमध्ये असणार हे नक्की आहे. ग्रेग चॅपलच्या मते भारताचा एक राष्ट्रीय प्रश्न आहे,

“तो म्हणजे सगळ्या भारतीयांना असं वाटतं की वयाने मोठ्या असणाऱ्या व शहरातल्या लोकांना जास्त कळतं”

निदान भारतीय क्रिकेटपुरतं तरी ही परंपरा तोडण्याचे श्रेय धोनीकडे आहे. या श्रेयामागे कमालीचा निर्दयी वाटावा असा रुथलेसनेस होता. तो चेहर्यावर दिसणार नाही याची योग्य काळजी धोनी घ्यायचा. जसा तो शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलरचा सामना करताना चेहरा सिरीयल किलरसारखा थंड ठेवायचा तस.

आता थोडं सचिनच्या फॅनना समजून घेऊ.

ज्या लोकांना खेळ हा खेळापुरताच मर्यादित असतो असं वाटतं किंवा तसे वाटणे ज्यांच्या सोईचे असतं त्यांना सचिन आवडणं हे अगदीच साहजिक आहे. यातल्या पहिल्या गटाला फारसा दोष देण्यात अर्थ नाही. कारण खेळ हा अर्थव्यवस्था, समाज अन् राजकारणाशी जोडलेला असतो हे शिकवणारी व्यवस्था आपल्याकडे नाही अन् शिक्षणव्यवस्था तर नाहीच नाही.

यातल्या दुसरा गटाला हा सचिन आवडणे याला वेगळे महत्त्व आहे. कारण मग या गटाला मेरीट नावाच्या मिथचे गोडवे गाता येतात. हाऊस ऑफ कार्ड्स नावाच्या सिरीयल मध्ये नायक (जो श्वेतवर्णीय आहे) तो ब्लॅक सिनेटरला एक गोष्ट पटवून देण्यासाठी सांगतो की, कसं मी पण तुझ्यासारखी शून्यातून सुरुवात केली. अन् व्हीप पदापर्यंत पोहचलो. ब्ला ब्ला ब्ला….

तो ब्लॅक म्हणतो,

“तुझ्या आणि माझ्या शून्यात काही प्रकाशवर्षांचे अंतर आहे.”

हाच फरक धोनी आणि तेंडुलकरमध्ये आहे. नियोजन करणे, पूर्ण वेळ खेळावर केंद्रित करणे ही लक्झरी धोनी जिथून येतो तिथे उपलब्धच नाही. म्हणूनच धोनीचे जगणे आणि खेळणे हे one ball at a time प्रकारचे आहे. अन ते अशा जगणारांना प्रेरणा देणारं असतं.

धोनी रुढार्थाने ज्याला गाव खेडं म्हटलं जाते तिथला नाहीये. ज्याला खेडवळ झारखंडमधला निमशहरी भाग म्हणलं जातं अशा भागातून येतो. धोनीला माहिती आहे शहरकेंद्री व्यवस्था आपल्या सोईने नियम बदलते. आपल्या पळवाटांना अपवादाचे नाव देते. आपली खेळायची तयारी झाल्यावर नियम पण‌ बदलते.

पण धोनी नावाची वृत्ती हार मानली नाही. कारण या वृत्तीचे जगणं त्याच्याशी जोडलय. त्याने  एक काळाने एखादा पूर्णपणे गाव खेड्यातला माणूस या शहरकेंद्री व्यवस्थेच्या छातीवर उभा राहून षटकार मारण्यात घालवला. लढण्यात घालवला.

मात्र या लढण्याला देखील विराम असतो. धोनीने तो विराम घेतलाय. आज त्याने क्रिकेटच्या सगळ्या फॉर्ममधून निवृत्ती घेतली. कोरोनाच्या साथीमुळे क्रिकेटला थांबलं आणि त्यामुळे धोनीला हा निर्णय लवकर घ्यावा लागला.

क्रिकेटच्या मैदानात तो आता दिसणार नाही, मात्र त्याचं व्यवस्थेशी लढण मात्र सुरुच राहिलं. नवे खेळाडू घडवणे किंवा दुसरे काही मात्र धोनीच्या धावण्याला विराम लागणार नाही हे नक्की.

ता.क. माझ्यासाठी धोनीने काढलेल्या रना बोनस आहेत. त्याचे ष्टम्पाच्या मागे उभा राहून सूत्रसंचालन करणे हेच जास्त महत्त्वाचे आहे. 

  • अजित देशमुख.

हे ही वाचा. 

1 Comment
  1. Prasad Mali says

    धोनी ने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली, क्रिकेटच्या सगळ्या
    फॉर्ममधून मधून नाही तो येणारी IPL खेळणार आहे… लेख चांगला आहे पण नेमकी माहिती चुकीची लिहिली… चूक दुरुस्त करा

Leave A Reply

Your email address will not be published.