धोनीच्या याच इनिंगने त्याला बॉलचा ‘हार्ड हिटर’ म्हणून जागतिक क्रिकेटमध्ये प्रस्थापित केलं !

३१ ऑक्टोबर २००५.

आजपासून बरोबर १३ वर्षांपूर्वीची गोष्ट. जयपूरचं सवाई मानसिंग स्टेडीयम.

तो दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अजरामर होणार होता. तो दिवस भारतीय क्रिकेटला एक नवीन सुपरस्टार आणि भविष्यातला ‘कॅप्टन कूल’ देणार होता. हा तोच दिवस होता जेव्हा महेंद्र सिंग धोनी नावाचं वादळ आपण साधारणतः सहा महिन्यांपूर्वी विशाखापट्टणम येथील पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत घडवून आणलेला कारनामा हा काही अपघात नव्हता, हे पुन्हा एकवार सिद्ध करणार होतं. हा तोच दिवस होता जेव्हा भारतीय क्रिकेटचा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु असलेला एका विकेटकीपर बॅट्समनचा शोध पुढच्या अनेक वर्षांसाठी संपवणार होता.

श्रीलंकेच्या भारत दौऱ्यावरील ७ वन-डे मॅचेसच्या सिरीजमधल्या पहिल्या २ मॅचेस  जिंकून आपण सिरीजमध्ये आघाडी घेतलेली होती. त्यामुळे सिरीजमध्ये टिकून राहण्यासाठी श्रीलंकेसाठी हा मॅच जिंकणं खूप गरजेचं होतं.

श्रीलंकेचा कॅप्टन मर्वन अटापट्टू याने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेचा ओपनर आणि विकेटकीपर कुमार संघकारा याने १४७ बॉल्समध्ये १३८ रन्स फटकावताना संघाला २९८ रन्सचा स्कोर उभारून दिला आणि आपल्या कॅप्टनचा निर्णय किती योग्य होता हे सिद्ध केलं. त्यात त्याला महेला जयवर्धनेच्या  ७१ रन्सची आणि परवेझ महारूफने शेवटच्या काही ओव्हर्समध्ये फटकावलेल्या  १६ बॉल्समधल्या  ३३ रन्सची तोलामोलाची साथ लाभली होती.

संघकारा-महारूफ जोडीने २८ बॉल्समध्ये ५८ रन्सची पार्टनरशिप साकारताना शेवटच्या २ ओव्हर्समध्ये ३१ रन्स वसूल केले होते. हरभजन सिंग सोडला तर सगळ्या भारतीय बॉलर्सनी सपाटून मार खाल्ला होता.

२९९ रन्सचं टोटल चेस करणं हे त्या काळात आजच्याइतकं सोपं नव्हतं. किंबहुना २९९ हे त्यावेळी विनिंग टोटल होतं. शिवाय श्रीलंकेकडे चामिंडा वॉस, मुथय्या मुरलीधरन आणि दिलहारा फर्नांडो यांच्यासारखं तगडं आक्रमण होतं.

२९९ रन्स चेस करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला आणि इनिंगच्या पहिल्याच बॉलवर वीरेंद्र सेहवागने आपल्याच स्टाईलमध्ये चामिंडा वॉसकडून फोर वसूल केला. पण याच ओव्हरच्या पाचव्या बॉलवर भारतीय संघाने सचिन तेंडूलकरच्या रुपात आपली पहिले विकेट गमावली आणि ‘सचिन- वॉस’ ही लढाई यावेळी वॉसने जिंकली. संघकाराने विकेटमागे सचिनचा अप्रतिम कॅच पकडला होता. संघकारासाठी त्या दिवशी सगळं काही सही-सही चाललं होतं.

सचिन आउट झाल्यानंतर आता नियमितपणे वन-डाऊनला येणारा द्रविड मैदानात येणं अपेक्षित होतं, पण कर्णधारपदावर विराजमान असलेल्या राहुल द्रविडने इथे एक जुगार खेळला. त्याने भारतीय संघात नवखाच असलेल्या महेंद्र सिंग धोनीला वन-डाऊनवर प्रमोट केलं. धोनीचा रोल होता पिंच हिटरचा. आला बॉल उचलून ग्राउंडच्या बाहेर फेकायचा अन जितक्या कमी बॉल्समध्ये  जितके जास्त रन्स वसूल करता येतील तितके करायचे, हीच सामान्यतः पिंच हिटरकडूनची अपेक्षा असते.

महेंद्र सिंग धोनी मात्र त्यादिवशी काहीतरी वेगळंच डोक्यात घेऊन आला होता. पिंच हिटरची भूमिका तर तो पार पाडणारच होता, पण त्याला स्वतःकडून यापेक्षा काहीतरी अधिक अपेक्षित होतं. आपण फक्त पिंच हिटरच नाही तर त्यापेक्षा अजून बरंच काही भव्यदिव्य करण्यासाठी जन्मलोय हे धोनी त्यादिवशी सिद्ध करणार होता. धोनीने इनिंगची सुरुवातच चामिंडा वॉसला ग्राउंडच्या बाहेर फेकून करताना पुढे आपण काय गोंधळ घालणार आहोत, याचा जणू इशाराच दिला होता.

त्यानंतर धोनीने याच ओव्हरमध्ये वॉसकडून अजून एक सिक्स वसूल केला. श्रीलंकेचा विकेटकीपर संघकाराने जे काम त्यांच्यासाठी केलं होतं, तेच काम विकेटकीपर  धोनीने भारतासाठी करायला सुरुवात केली होती. जोडीला सेहवाग सोबत होताच, पण नॉन-स्ट्रायकर एंडवरून धोनीच्या फटकेबाजीचा आनंद घेताना त्याने मात्र आपली तलवार म्यान करून  धोनीला साथ देण्याचा निर्णय घेतला असावा. दोघांनी मिळून संघासाठी ९२ रन्स जोडलेले असताना इनिंगच्या पंधराव्या ओव्हरमध्ये भारताच्या ९९ रन्स झाल्या होत्या, तेव्हा मुथय्या मुरलीधरनने ३९ रन्सवर असताना सेहवागला पॅव्हेलीयनमध्ये पाठवलं.

त्यानंतर मैदानात आला कॅप्टन राहुल द्रविड. धोनीची चौफेर फटकेबाजी सुरूच होती. सेहवागच्या विकेटचा त्याच्या बॅटिंगवर काहीच परिणाम झाला नव्हता. मॅचच्या ३१ व्या ओव्हरमध्ये लेगस्टंपच्या बाहेर जाणाऱ्या बॉलवर त्याने मारलेला सिक्सर तर डोळ्याचे पारणे फेडणारा होता. इनिंगच्या २५ व्या ओव्हरमध्येच दिलहारा फर्नांडोच्या ऑफ स्टंप बाहेर जाणाऱ्या बॉलवर फोर मारून धोनीने फक्त ८५ बॉल्समध्येच आपलं शतक पूर्ण केलं, त्यावेळी तो श्रीलंकेविरोधात सर्वात कमी बॉल्समध्ये शतक ठोकणारा भारतीय बनला होता.

धोनी-द्रविड जोडी जमलीये असं वाटत असतानाच मॅचच्या २७ व्या ओव्हरमध्ये  मुथय्या मुरलीधरन परत एकदा श्रीलंकेच्या मदतीला धावून आला. त्याने स्वतःच्याच बॉलिंगवर राहुल द्रविडचा कॅच पकडत भारताला तिसरा झटका दिला. त्यावेळी भारताच्या स्कोअर बोर्डवर होते १८५ रन्स.

धोनी मात्र त्याच्याच तालात होता. त्याने महारूफच्या पुढच्याच ओव्हरमध्ये १ सिक्स आणि १ फोर ठोकत अजूनच  आक्रमक पवित्रा धारण केला. संघाचा स्कोअर अडीचशे पर्यंत पोहोचल्यानंतर भारताने युवराज सिंगच्या रुपात आपली चौथी विकेट गमावली होती, पण तोपर्यंत धोनीचे दीडशे पूर्ण झाले होते आणि आता विजय दृष्टीपथात यायला लागला होता.

युवराज दिलशानच्या बॉलवर बोल्ड झाला त्यावेळी भारताला जिंकण्यासाठी ८० बॉल्समध्ये फक्त ४९ रन्स हवे होते आणि धोनी अजून मैदानात होता. मॅच संपवल्याशिवाय तो जाणारही नव्हता म्हणा. त्यानंतर वेणूगोपाल राव मैदानात आला आणि धोनीने त्याच्या मदतीने उरलेले रन्स अगदी सहजच काढले. जिंकण्यासाठी फक्त २ रन्स हवे असताना धोनीने दिलशानला ठोकलेल्या  सिक्सरच्या मदतीने  भारताने २९९ रन्सचं आव्हानात्मक टार्गेट जवळपास २३ बॉल्स शिल्लक ठेऊन अगदी लीलया पार पाडलं. सिक्सर ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्याची करण्याची सवय धोनीला लागली ती इथूनच.

धोनीच्या या झंझावाती इनिंगने त्याने अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे केले.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कुठल्याही विकेटकीपर बॅट्सनने एका इनिंगमध्ये काढलेल्या सर्वाधिक रन्सचा (१७२) ऑस्ट्रेलियाच्या अॅडम गिलख्रिस्टचा रेकॉर्ड मोडीत काढत धोनीने तो आपल्या नावे केला. हा रेकॉर्ड आजतागायत धोनीच्याच नावे आहे.

नाबाद १८३ रन्सच्या या इनिंगमध्ये धोनीने १५ फोर आणि १० सिक्सर्स ठोकले होते. हा देखील त्यावेळी कुठल्याही भारतीयाने एका इनिंगमध्ये मारलेल्या सर्वाधिक सिक्सर्सचा रेकॉर्डच ठरला होता, जो पुढे चालून २०१७ साली श्रीलंकेविरुद्धच्याच आपल्या २०८ रन्सच्या इनिंगमध्ये रोहित शर्मा मोडीत काढणार होता.

धोनीच्या क्रिकेटिंग करिअरमध्येच नव्हे, तर एकूणच भारताच्या क्रिकेट इतिहासात देखील धोनीच्या या इनिंगला फार महत्व आहे. या इनिंगपासूनच धोनी नावाचा तारा जागतिक क्रिकेटच्या क्षितिजावर तळपायला लागला. या इनिंगनंतरच नवख्या धोनीचं भारतीय संघातलं स्थान पक्कं झालं. या इनिंगमुळेच भारतीय संघाचा विकेटकीपर बॅटसमनचा शोध संपला आणि याच इनिंगने धोनीला बॉलचा ‘हार्ड हिटर’ म्हणून जागतिक क्रिकेटमध्ये प्रस्थापित केलं म्हणून धोनीची ही इनिंग खूप स्पेशल. कधीच विसरता न येण्याजोगी.

  • अजित बायस

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.