भारत लुटायला आलेल्या मुहम्मद घोरीने आपल्या नाण्यांवर लक्ष्मीची प्रतिमा छापली होती

कुठतरी जुना वाडा पाडताना नाहीतर खोदकाम करताना एखादा सोन्यानाण्यानं भरलेला हंडा सापडला की लोकांची झुंबड उडते तो बघायला. सगळ्यांना त्या नाण्यांमध्ये इंटरेस्ट असतो असं नाही. त्यांचा इंटरेस्ट फक्त त्या सोन्या चांदीमध्ये असतो.

पण आपल्या इतिहास संशोधकांच तस नसतं. त्या सोन्याचांदीपेक्षा त्यांना ती नाणी महत्वाची असतात. कारण इतिहासाचा अभ्यास करताना महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या साधनांमध्ये ऐतिहासिक काळातील नाण्यांचा समावेश होतो. आर्थिक विनिमय, व्यापार- उदीम, सुबत्ता, अवनती, तंत्रज्ञानात्मक प्रगती, राजकीय यंत्रणा, तत्त्वज्ञान, धार्मिक कल्पना, कलाकुसर इत्यादी कितीतरी पैलूंविषयी ऐतिहासिक नाणी बोलू शकतात.

नाण्यांमुळे राजांची नावे, त्यांची क्रमवारी, त्यांचा काळ, राज्यांची स्थाने, त्यांच्या सीमा समजण्यास मदत होते. नाण्याचे वजन, आकार, प्रकार, धातू, नाण्यावरील मजकूर, चित्रे, चिन्हे, नाण्याचे दर्शनी मूल्य, त्याची टांकसाळ या साऱ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात.

अजून एक माहिती मिळते, ती म्हणजे राजांच्या राजकीय नीतिमत्तेची. आणि या नाण्यांवरुनच समजलय की एक चालू राजा होऊन गेलाय इतिहासात..

दिल्लीचा सुलतान शिहाबुद्दीन उर्फ मुइझ्झुद्दीन घोरी ऊर्फ मुहम्मद घोरी

कोण हा घोरी

भारतातील मुस्लिम सत्तेचा संस्थापक व दिल्लीचा पहिला सुलतान. घोरी घराण्यातील कर्तबगार सुलतान. शिहाबुद्दीन उर्फ मुइझ्झुद्दीन घोरी ऊर्फ मुहम्मद या नावानं इतिहासात प्रसिद्ध आहे. भाऊ घियासुद्दीन घोरीने गझनीचे राज्य जिंकले, तेव्हा घियासुद्दीन पश्चिमेकडील प्रांताचा कारभार पाहात होता. पूर्वेकडील प्रांतात मुहम्मद हा सुभेदार म्हणून काम करत होता. दोघा भावाचे संबंध चांगले होते.

मुहम्मदाने ११७५ मध्ये मुलतान हस्तगत केले. हिंदुस्थानावर त्याने एकुण नऊ स्वाऱ्या करुन भयंकर कत्तली केल्या आणि अगणित संपत्ती लुटली. पण दिल्लीवर राज्य करण्यासाठी त्याला जनतेची दिशाभूल करावी लागली.

गुजरातच्या इ. स. ११७८ मध्ये केलेल्या स्वारीत मुहम्मदाचा पराभव झाला. ११७९ मध्ये त्याने पेशावर येथे आपला अंमल बसविला. जम्मूच्या विजयदेव राजाशी हातमिळवणी करुन त्याने लाहोरच्या सुलतान खुसरौखानचा पराभव केला व पंजाबमध्ये आपली सत्ता स्थापन केली.

११९२ मध्ये पृथ्वीराज चौहानविरुद्ध झालेल्या लढाईत मुहम्मदचा पराभव झाला. परंतु आपल्या पराभवाचा सूड उगवण्यासाठी अफगाण व तुर्क लोकांचे सैन्य जमवून त्याने ११९३ मध्ये पुन्हा मोहीम काढली. त्याने तराईन येथे राजपुतांचा पराभव केला. ह्यानंतर अजमीर, कनौज, वाराणसी ही राज्ये घेतली.

तराईनच्या दुसर्‍या लढाईत मात्र मुहम्मदने पृथ्वीराजचा पराभव केला. नंतर मुहम्मद घोरीने सत्ता हस्तगत केली. सत्ता हस्तगत केली मात्र ती टिकेल की नाही याबाबतीत तो साशंक होता. त्याने प्रशासकीय दृष्ट्या खूप कमी बदल केले. त्याने जिकंलेल्या प्रदेशांत कायमची सत्ता रहावी म्हणून त्या ठिकाणी अनेक कर्तबगार अधिकारी नेमले, तसेच आपल्या सैन्यात व राज्यव्यवस्थेत योग्य माणसे नेमली. मुहम्मद पराक्रमी होता आणि हुशार ही.

मात्र नाण्यांच्या बाबतीत त्याने अतिशय सावधगिरी बाळगली. 

सत्ता हस्तगत केल्यावर पहिल्या टप्प्यात त्याने पृथ्वीराज चौहानने पाडलेली नाणी चलनात तशीच राहू दिली. यातून त्याने जनतेला हा संदेश दिला की, सत्ता बदलली आहे पण तुमचे जीवनमान बदलणार नाही.

त्यानंतर त्याने दुसऱ्या टप्प्यात पृथ्वीराज चौहानच्या नाण्यांसारखीच नाणी बनविली. पृथ्वीराजच्या नाण्याच्या उलट दिशेला बैलाची प्रतिमा आणि नाण्याच्या मागील बाजूस घोडेस्वारची प्रतिमा होती. ज्यात ‘पृथ्वीदेवा’ म्हणजे पृथ्वीराजची स्वतःची आख्यायिका होती.

या घोरीने त्यात एक बदल केला. सेम टू सेम घोडेस्वारची प्रतिमा कोरुन त्यावर मुहम्मद बिन साम म्हणजे आपली स्वतःची आख्यायिका कोरली.

पुढं जाऊन जनतेला विश्वासात घेण्यासाठी म्हणून त्यानं लक्ष्मीच नाणं काढलं. मुहम्मदच्या आधी बुंदेलखंडातील चंदेल, त्रिपुरीचे कलाचुरि, मालवाचे परमार, कानौजचे गढवाल इत्यादी हिंदु राजघराण्यांप्रमाणे ही लक्ष्मीची नाणी होती.

या नाण्यांवर एका बाजूला लक्ष्मीची प्रतिमा आणि दुसऱ्या बाजूला हिंदु राजाचा पराभव नावावर केलेला ‘श्रीमद मुहम्मद बिन सम’ असं कोरण्यात आलं.

सुलतानाच्या काळात नाण्यांवरील पूर्वीच्या काळातील देव-देवता, पशुपक्षी गायब झाले. लिपीतही बदल होत गेला. नाण्यांवर एका बाजूला अरेबिकमध्ये, तर दुसऱ्या बाजूला संस्कृतचा देवनागरीत वापर केला आहे. नाण्यांवर कुराणातील वचने आली. खलिफांची नावे, सुलतानांची नावे यायला सुरुवात झाली. मोहम्मद घोरीने आपल्या विजयानंतर चहमान आणि गढवाल नाण्यांच्या धर्तीवर बरीच नाणी चलनात आणली.

या नाण्यांच्या फेरबदलातून त्याने जनतेला एक प्रकारे इशारा द्यायला सुरुवात केली की, तुमचा राजा एक हिंदू राजा नसून, मुस्लिम सुलतान आहे. आणि त्याची भाषा तीच तुमची भाषा असायला पाहिजे. मुहम्मद घोरीने नाण्यांमध्ये टप्प्याटप्प्यात केलेले बदल त्याच्या राजकीय दूरदृष्टीची दखल घ्यायला भाग पडतात.

हे ही वाचा भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.