मुघलांच्या सर्वोत्कृष्ट सरदारांना कोंडून मारणारा मराठ्यांचा रणधुरंधर सेनापती..

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिना. खाशा औरंगजेब दख्खनेत उतरून तेरा-चौदा वर्ष झालेले तरी मराठ्यांचे राज्य काय त्याला जिंकता आले नाही. राजाराम छत्रपती जिंजीस राहून स्वराज्य सांभाळीत होते.त्यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली स्वराज्याची फौज चौफेर उधळत होती. राजाराम महाराजांचा एक सेनापती मात्र मुघलांना सळो की पळो करून सोडत होता. केवढाही बलाढ्य सरदार पाठवा, त्याला या मराठ्यांच्या सेनापतीकडून मार मिळणारच.

या पराक्रमी सेनापतीचे नाव ‘संताजी घोरपडे’. औरंगजेबाच्या तंबूवरचे कळस कापून नेणारा रणमर्द..

संताजीबाबांच्या तुफान घौडदौडीला थांबवण्यासाठी औरंगजेबाने एक भलीमोठी योजना आखली. मुघल शहजादा कामबक्ष याच्यासह काही नामांकित सेनापती आणि पंचवीस हजारांची फौज संताजीबाबांसोबत लढण्यासाठी पाठवली. या नामांकित सरदारांमध्ये कर्नाटकचा सुभेदार कासीमखान, औरंगजेबाचा मंत्री आणि त्याच्या मावसबहिणीचा नातू रहुल्लाखान, उलखानाजाद खान, तोफखाना प्रमुख सफशिकन खान, महंमद मुरादखान, डकीयचा राजपुत्र रामचंद यांचा समावेश होता.

संताजी घोरपडे कर्नाटक भागात कुठेतरी फिरत असल्याची बातमी कामबक्षच्या कानावर पडलेली होती. त्याने सात-आठ हजारांची फौज स्वतःजवळ ठेवली आणि मातब्बर सरदारांसमवेत उरलेली फौज संताजी घोरपडेंच्या मागावर पाठवली.

दोड्डेरीनजीक मराठे आणि मुघल आपापसात भिडले. मराठ्यांची दहा हजार सैनिकांची खडी फौज होती.

तब्बल तीन दिवस तुफान लढाई झाली. या तीन दिवसात मराठ्यांनी मुघलांना रसद मिळू नये याची पुरेपूर व्यवस्था केली. कोणत्याही अन्नाशिवाय मुघल तीन दिवस मराठ्यांसोबत लढत होते, मार खात होते. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस दोड्डेरी गावात असणाऱ्या छोट्याशा गढीत मुघलांनी आश्रय घेतला. पण तोपर्यंत मराठ्यांनी युद्धसज्ज घोडे, हत्ती आणि उंट आपल्या ताब्यात घेतले.

तीन दिवसांच्या युद्धामुळे आणि भुकेमुळे मुघलांनी दोड्डेरीच्या गढीमध्ये मोठी चंगळ केली. सकाळ-संध्याकाळ मेजवान्या झडू लागल्या.

कामबक्ष आपल्याला वाचवण्यासाठी तीन बलाढ्य सरदारांना मोठा फौजफाटा घेऊन पाठवतोय, हे ऐकल्यावर तर सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. गढीत आनंदी वातावरण होते. मराठ्यांचा वेढा एकदम सक्त असल्यामुळे कुणीही गढीच्या आतबाहेर करू शकत नव्हते.

इकडे कामबक्षने पाठवलेले सरदार विजापूरपर्यंत आले पण त्यांची पुढे जाण्याची हिम्मत होईना. संताजी घोरपडे या नावासोबत युद्ध करायला कुणीही तयार होईना.. तेवढ्यात जिंजीवरून राजाराम महाराजांनी आपल्या सेनापतीच्या बचावासाठी पाठवलेली फौज विजापूरला येऊन पोहोचली आणि संताजीबाबांच्या शत्रूचा परस्परच काटा निघाला.

गढीमध्ये आता दहा-बारा दिवस उलटून गेले होते. अन्नधान्याची टंचाई तयार होऊ लागली. चारा संपायला लागला. पाण्याची टंचाई तयार झाली.

इकडे मराठे मात्र कोणत्याही परिस्थितीत वेढा ढिला करत नव्हते.तब्बल एक महिना लोटला. गढीच्या आतमध्ये असलेले बैल, गाय, उंट या प्राण्यांना मारून खाण्याची वेळ मुघल सैनिकांवर आली.

मराठे गावातून मिठाई खरेदी करत. गढीच्या दरवाज्यासमोर जात आणि मोठ्या चवीने मिठाई खात असत. ते दृश्य पाहून मुघलांच्या जीवाची लाही लाही होत असे. गढीत सर्वत्र रोगराई पसरली. सगळीकडे घाण, अस्वच्छता.. अन्नधान्य संपले. पिण्याचे पाणी संपले. आता मात्र मुघल घाईस आले.

गढीच्या भिंतीवरून ते पैश्यांची पुरचुंडी बाहेर फेकत. मराठे त्याबदल्यात थोडंस अन्न गढीमध्ये टाकत. त्या अन्नाच्या तुकड्यासाठी गढीत तुंबळ हाणामारी होऊ लागली. याचदरम्यान कर्नाटकचा सुभेदार कासीमखान मृत्यू पावला. तो कशाने मेला हे कुणालाच समजले नाही. दीड महिना लोटून गेला.

आता मात्र मुघल खचले. मुघलांचे सैनिक गढीच्या भिंतीवरून उडी मारत. त्यातले जे वाचले त्यांच्या कमरेला असलेली सोन्याची नाणी मराठे काढून घेत आणि त्यांना बेदम मार देऊन पिटाळून लावत.

गढीच्या आत असलेल्या मुघल सरदारांनी संताजी बाबांसोबत तहाची बोलणी सुरू केली. मोठ्या श्रीमंत थाटात संताजी घोरपडेंच्या विरोधात आलेल्या मुघली सरदारांच्या अंगावर साधे कपडेसुद्धा राहिले नसावे?

मुघल सरदारांनी केवळ दोनच मागण्या केल्या. एक, सर्व सरदारांना घोडे पुरवण्यात यावे आणि दोन, सर्वांना घालायला अंगभर कपडे द्यावे. किती ती दुर्दशा.. आणि या सर्वांच्या जीवाची किंमत किती? सात लाख रुपये. आणि सोबत आणलेल्या एकूण एक गोष्टी आहे तिथेच सोडून जायच्या.. मोठ्या मानहानीनंतर मुघल या तहासाठी तयार झाले. त्यांच्यासमोर दुसरा पर्याय नव्हता.

संताजी बाबांना या तहामध्ये सात लाख रुपये रोख तर पन्नास-साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळाला..

आपल्या पराक्रमी शिपायांची शौर्यगाथा जेव्हा औरंगजेबाच्या कानावर पडली, तेव्हा तो इतका चिडला की या सर्व सरदारांची त्याने परस्पर वेगवेगळ्या सुभ्यामध्ये बदली केली.. त्यांना बादशहाच्या समोर उभा राहण्याची परवानगीसुद्धा दिली नाही.

आपल्या तलवारीने मुघलांच्या अगणित शिपायांची खांडोळी करणाऱ्या महापराक्रमी संताजी बाबांची उत्तुंग शौर्यगाथा म्हणजे ‘दोड्डेरीचा वेढा’..

  • केतन पुरी

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.