बुल्ली बाई प्रकरणातली मास्टरमाईंड असलेली हि श्वेता सिंग कोण आहे ?

काही महिन्यांपूर्वी तुम्ही सुल्ली डील्स हे प्रकरण ऐकलं असेल तसंच काहीसं प्रकरण अलीकडेच घडलं होता,  तो म्हणजे बुल्ली बाई अ‍ॅप प्रकरण. 

या प्रकरणाबाबत आता मोठ्या प्रमाणात आवाज उठविण्यात आला होता, एमआयएमचे प्रमुख असुद्दिन ओवेसी तसेच राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील  आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिवाय शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी या देखील सुल्ली डील्स प्रकरणापासून सक्रिय होत्या. तसेच या प्रकरणातल्या काही पीडित महिला मुंबईतील असल्याने मुंबई पोलीस आयुक्त देखील या प्रकरणाची सखोल चौकशी करत होते. 

हा घाणरेडा प्रकार कोणता अज्ञात ग्रुप करतोय याचा थांगपत्ता लागत नव्हता मात्र आज अखेर या प्रकरणातले आरोपी पकडण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. 

विशेष म्हणजे यात १८ वर्षाची मुलगी आहे.

त्याआधी हे जाणून घेऊया कि, हे प्रकरण काय आहे ?

गेल्या १ जानेवारी २०२२ रोजी Github या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अचानक काही मुस्लिम धर्माच्या महिलांचे फोटो उपलोड होत होते. त्या फोटोंच्या खाली त्या महिलांची किंमत लिहिली जात होती, काहीतरी घाणरेड्या भाषेत लिहून या महिलांचे ऑनलाईन सौदे केले जात होते…. ५ महिन्यापूर्वी म्हणजे ५ जुलै २०२१ रोजी सोशल मिडीयावर एक स्क्रीनशॉट फिरत होता. यात एका मुस्लीम महिलेचा फोटो होता आणि त्याखाली ‘सुल्ली डील ऑफ द डे’ असं लिहण्यात आलं होत. नंतर यात सामान्य मुस्लीम महिला बरोबरच पत्रकार, लेखिका अशा प्रसिद्ध मुस्लीम महिलांचे फोटो सुद्धा वापरण्यात आले होते.  या महिला आणि मुलींवर बोली लावून ऑनलाईन सौदेबाजी केली जात होती. यापैकी काही महिलांनी पोलिसांकडे तक्रार देखील केली होती.  विशेषत: जे सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या सक्रिय आहेत अशा महिलांना या प्रकरणात टार्गेट केलं गेलं. 

सुल्ला, सुल्ली हे महिलांविरोधात वापरण्यात येणारे अपमानजनक शब्द आहेत.  या शब्दात बदल करून बुल्ली बाई असा नवा शब्द वापरण्यात आला होता….

त्यानंतर ५-६ महिन्यानंतर बुल्ली बाई अ‍ॅप प्रकरण समोर आलं आणि  पुन्हा एकदा मुस्लीम धर्मीय महिलांना टार्गेट करत शेकडो मुस्लीम महिलांचे फोटो Github चा वापर करून ‘बुल्ली बाई’ (#Bullybai) नावाच्या अ‍ॅप वर उपलोड करण्यात आले होते.   

या ‘बुल्ली बाई अ‍ॅप’ प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या १८ वर्षीय श्वेता सिंगला मुंबई पोलिसांनी उत्तराखंडमधून अटक केली आहे. 

कोण आहे आरोपी श्वेता सिंग?

या प्रकरणी मुंबई पोलिसांनी मुंबईच्या सायबर क्राईम सेलने मंगळवारी उत्तराखंडमधील एका १८ वर्षीय या श्वेता सिंगला अटक केली होती. श्वेता सिंग ही संपूर्ण बुल्ली बाई अ‍ॅप प्रकरणाची मास्टरमाईंड असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी पोलिसांनी आणखी एक २१ वर्षीय आरोपीला बंगलोरमधून अटक करण्यात आली अशी माहिती मिळतेय.  

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे दोघे आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांची विचारसरणी जुळली आणि त्याच्यात मैत्री झाली, या दोघांनी मिळून हे बुल्ली बाई अ‍ॅप प्रकरण चालू केले. त्या दोघांनी मिळून मुस्लिम महिलांच्या फोटोजचा लिलाव करणारी वेबपेजेस सुरू केलीत.

श्वेता सिंग JattKhalsa07 नावाचे बनावट ट्विटर हँडलचा वापर करत होती आणि या हँडलवरून घृणास्पद पोस्ट आणि आक्षेपार्ह फोटो टाकत होती. 

याआधी बंगळुरू येथून अटक करण्यात आलेला दुसरा आरोपी विशाल कुमार याने श्वेताचे नाव उघड केले आहे, जो इंजिनीअरिंगच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. विशालने सांगितले की, तो श्वेताच्या संपर्कात होता आणि श्वेता बुल्लीबाई अ‍ॅप संबंधित सर्व ऍक्टिव्हिटी करणाऱ्या लोकांच्या संपर्कात होती. तो नेपाळमध्ये बसलेल्या कोणाकडून तरी सूचना घेत होती असंही त्याने जवाब दिला होता.

या वेबपेजचे वृत्त बाहेर येताच प्रकरणाने जोर पकडला. त्यानंतर विशाल कुमार झा याला पहिली अटक करण्यात आली. या व्यक्तीला ट्विटरच्या माध्यमातून ट्रेस करत पकडण्यात आले.  

मुख्य आरोपी श्वेता सिंग हि अनाथ आहे.  २०११ मध्ये तिच्य आईचे कर्करोगामुळे निधन झाले होते. त्याचवेळी २०२१ मध्ये तिच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. वडील गेल्यानंतर श्वेता तिच्या तीन भावंडांसोबत रुद्रपूरला राहत होती. उत्तराखंडच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा हवाला देत एका अहवालात श्वेता मुस्लिमांच्या विरोधात असलेल्या विचारसरणीशी संबंधित असल्याचे म्हटले होते. सोबतच, असेही सांगण्यात आले आहे की, ती अनेकदा सोशल मीडियावर अशा पोस्ट देखील करत असते.

त्याचमुळे काही समविचारी पोस्टवरील चर्चेदरम्यान वरील दोन्ही आरोपी संपर्कात आले आणि नंतर व्हॉट्सअ‍ॅपवर बोलू लागले. अशातच दोघांची मैत्री झाली.  अटकेनंतर श्वेताला मंगळवारी ट्रान्झिट रिमांडसाठी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. जिथे त्याला रिमांडवर मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पण जेंव्हा मुंबई पोलिसांनी श्वेता सिंगची चौकशी केली असता, त्या दरम्यान तिने कोणताही पश्चाताप व्यक्त केला नाही, तसेच त्याची तयारी देखील नाकारली आहे.

आर्थिक परिस्थिती खालावली असल्यामुळे श्वेताने बारावीपर्यंतच शिक्षण घेतले, त्यानंतर तिने  कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला नाही. तिला एक मोठी बहीण आहे जी वाणिज्य शाखेत पदवीधर आहे, तर तिला एक लहान बहीण आणि भाऊ आहे जे सध्या शाळेत शिकत आहेत. श्वेता स्वतः इंजिनीअरिंगच्या प्रवेश परीक्षेची तयारी करत होती.

तपास पथकातील सूत्रांनी माध्यमांना सांगितले की, श्वेता नेपाळमधील एका सोशल मीडियावरच्या एका मित्राच्या सूचनेनुसार काम करत होती. श्वेता सिंगकडून मिळालेल्या माहितीनुसार, जियाउ नावाचा एक नेपाळी नागरिक तिला अ‍ॅपवर केल्या जाणार्‍या ऍक्टिव्हिटीबद्दल सूचना देत होता. सध्या पोलीस कथित नेपाळी नागरिक आणि या प्रकरणाशी संबंधित असलेल्या लोकांचा तपास करत आहेत. 

श्वेताला कोणी मदत केली?  कशासाठी मदत केली, त्यामागचा उद्देश काय होता? श्वेता सिंग हि कुणाची प्यादी बनून या गोष्टी घडवत होती का ? ती सोडली तर इतर कुणी या प्रकरणाचा मास्टरमाईंड आहे का ? याचाही तपास सुरु आहे.

तसेच पोलीस बुल्ली बाई अ‍ॅप प्रकरणात आणि मागील काळात घडलेल्या सुल्ली प्रकरणात एकच आरोपी आहेत त्यातही वेगळा गट ऍक्टिव्ह आहे याचा देखील तपास पोलीस करत आहेत. 

या प्रकरणात श्वेता व्यतिरिक्त किती लोकांचा समावेश आहे? हा फक्त एवढं मोठं प्रकरण एक खेळ होता कि, की इतर कोणती मोठी प्लॅनिंग होती ?  या सर्व प्रश्नांची उत्तरे मुंबई सायबर सेलचा तपास पूर्ण झाल्यानंतरच बाहेर येतील. 

सगळ्या प्रश्नांची उत्तरे तर मिळतीलच पण हा प्रश्न देखील समोर येतो कि,  याआधीच्या म्हणजेच सुल्ली डील्सच्या प्रकरणात सरकारने तसेच पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई केली असती, तर या वेळी हे नवीन प्रकरण घडलंच नसतं.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.