ताजमहाल नसून तेजोमहालय आणि ख्रिश्चानिटी नसून कृष्ण-नीति असे म्हणणारे पु. ना. ओक

पुरुषोत्तम नागेश ओक या नावाने त्यांना काहीच जन ओळखत असतील पण पु.ना. ओक म्हटल्यावर लगेच आठवत,

“अरे हे तर तेजोमहल वाले पु. ना. ओक “.

सध्या whatsapp आणि फेसबुक या माध्यमांवर अनेक इतिहासवीर थोडा कल्पित थोडा सत्यावर आधारित इतिहास लिहून फोरवर्ड करीत असतात. न कोणी याची सत्यासत्यता तपासात बसते न कोणी याला प्रतिवाद करायला जाते. अशाच जनतेचे मुख्य संदर्भकार म्हणजे पु.ना.ओक.

फक्त फरक इतका कि पु.ना. ओक यांनी whatsapp मेसेज खरडले नाहीत तर त्यांनी सरळ आपण म्हणतो तोच इतिहास खरा हे सिद्ध करण्यासाठी पुस्तके लिहिली. आता तीच पुस्तके मनात गृहितक बांधणाऱ्यांना मेसेज बनवण्यासाठी उपयोगी पडतात हि गोष्ट अलाहिदा.

तर आपण आधी पु.ना, ओक यांचा इतिहास जाणून घेऊ.

(या इतिहासाचाही स्त्रोत ते स्वतःच आहेत याची जाणकारांनी नोंद घ्यावी.)

पु.ना.ओक यांचा जन्म २ मार्च १९१७ साली इंदोर येथे झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून एम.ए आणि कायद्याची पदवी घेतली. काही काळ फर्ग्युसन महाविद्यालयात इंग्रजी शिकवले आणि त्यानंतर ब्रिटीश आर्मी जॉईन केली. दुसऱ्या महायुद्धात सिंगापूर मध्ये त्यांची पोस्टिंग होती. जेव्हा जपानने ब्रिटीश आर्मीला हरवले तेव्हा पु. ना. ओक सुद्धा युद्ध कैदी म्हणून जपान्यांच्या हाती सापडले. पुढे त्यांची भरती आझाद हिंद सेनेत केली गेली.

त्यांनी सांगितल्या आठवणीनुसार ते आझाद हिंद सेनेतला बहुतांश वेळ नेताजी सुभाषचन्द्र बोस यांचे असिस्टंट होते.

तिथून त्यांची रवानगी जनरल जगन्नाथ भोसले यांचा अॉन फिल्ड असिस्टंट म्हणून करण्यात आली. त्यांनी आझाद हिंद रेडियोचे देखील काम सांभाळलं. दुसऱ्या  महायुद्धात आझाद हिंद सेना ब्रिटिशांच्या विरुद्ध विजयी होऊ शकली नाही. नेताजींचे विमान कोसळले, आझाद हिंद सेनेची वाताहत झाली. युद्ध संपल्यावर पु.ना. ओक पायी चालत सिंगापूरहून अनेक देश, जंगले ओलांडून कोलकात्याला आले.

१९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळालं. पु.ना ओक नी वार्ताहार म्हणून हिंदुस्तान टाईम्स, द स्टेटसमन अशा वृत्तपत्रांमधून काम केलं. पुढे माहिती आणि नभोवाणी मंत्रालयात अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. एवढेच नाही तर अमेरिकी दुतावासात देखील संपादनाचे काम केले. या दरम्यानच्या काळात भारतात इतिहास हा स्थानिकांच्यावर अन्याय करणारा लिहिण्यात आला आहे असे त्यांच्या निरीक्षणात आले. मग त्यांनी भारतीय इतिहासाचे पुनर्लेखन करायची जबाबदारी उचलली.

आणि त्यांनी नवा इतिहास घडवलां…

भारतीय इतिहास पुनर्लेखन संस्थेची स्थापना १९६४ साली केली. पुढे त्याचेच रुपांतर विश्व इतिहास पुनर्लेखन संस्थेत केले. फक्त भारताचाच नव्हे तर जगाचा इतिहास पाश्चात्य लेखक आणी त्यांना धार्जिण्या भारतीय इतिहासकारांनी हिंदूच्या विरोधात लिहिला असे त्यांनी ठासून सांगितले. त्यांनी हिंदी आणि मराठी भाषेत अनेक पुस्तके लिहिली. यातले सर्वात प्रसिद्ध पुस्तक म्हणजे

“ताजमहल नव्हे तेजोमहालय”

ताजमहल हा शहाजहानने बांधला नसून तो अग्रनगरच्या अग्रसेन महाराजांनी अग्रेश्वर महादेवासाठी बांधलेला तेजोमहालय आहे असे या पुस्तकाचे म्हणणे आहे.या पुस्तकातील बरीचशी पाने ताजमहाल शहजाहान ने कसा बांधला नाही यात खर्ची केली आहेत पण ज्या अग्रसेन महाराजांनी तेजोमहालय बांधल्याचा दावा ओक करतात त्याच्या बद्दल विस्तृत माहिती द्यायला ते कमी पडतात. फक्त शहाजहान पूर्वी ५०० वर्षापासून हे मंदिर अस्तित्वात होते असे त्यांनी सांगितले आहे आणि बाकी सर्व पुरावे मुघलानी, इंग्रजानी आणि त्यानंतर आलेल्या सेक्युलर सरकारांनी दडवले असा आरोप ते करत राहतात.

या पुस्तकाबद्दल अनेक वाद झाले. त्यात अनेक तज्ञ इतिहासकारांनी ऐतिहासिक पुराव्यांचा आधार देऊन ओक यांचा समज खोटा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना आणि त्यांचा इतिहास पटणाऱ्या लोकानी त्याकडे लक्ष दिले नाही.

अखेर हे प्रकरण सर्वोच्च न्यायलयात गेले. तिथे झालेल्या सविस्तर चर्चेनंतर १३ जुलै २००० साली न्यायमूर्ती एस.पी.भरूचा यांच्या नेतृत्वाखालील बेंचने निर्णय दिला कि हि वास्तू तेजोमहल नसून ताजमहलच आहे. फक्त एवढे करून न्यायालय थांबले नाही तर विनापुरावा सर्वोच्च न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याबद्दल पु.ना.ओक यांची कानउघडणी केली.

पु.ना.ओक यांनी फक्त ताजमहल बद्दल दावा केला नाही. तर ख्रिश्चानिटी ही कृष्ण-नीति आहे, व्हॅटिकन सिटी ही वाटिका आहे, मिरजेचा मिरासाहेब दर्गा म्हणजे मयूरेश्वरी मंदिर, कोल्हापूरचा बाबू जमाल दर्गा म्हणजे बाबूजी का महाल , पुण्यातील दाता पीर म्हणजे दत्ताचे मंदिर असे अनेक दावे करून आपले कल्पनेचे घोडे पुरावे देण्यापेक्षा फक्त उर्दू नावाना समान जोडता येणारे संस्कृत नावापुरते सीमित ठेवले.

परकीय आक्रमकांनी भारतीय वस्तूंचे नुकसान केले यात शंकाच नाही मात्र पु.ना.ओक यांनी अतिरंजित कहाण्या आणून त्यांना इतिहासाशी जोडल्या. इतिहासाची एक गंमत आहे. आपल्याला ऐकायला आवडणाऱ्या गोष्टीना इतिहास समजण्याची चूक समाज करत आला आहे त्यामुळे खरा इतिहास मागे पडण्याची शक्यता असते. पु.ना ओक यांचा दावा न्यायलयात टिकू शकला नाही .

२००७ साली पु ना.ओक यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी निधन झाले. पण ऐकीव माहितीवर विश्वास ठेऊन आजही हे दावे पुढे केले जातात आणि पुरावा म्हणून पु.ना.ओक यांच्या पुस्तकांचे उदाहरण दिले जाते. अनेक मोठे नेतेसुद्धा आपल्या राजकीय फायद्यासाठी या अफवेला फूस देत असतात. आजच्या सोशल मिडीयाच्या काळात हे दावे फोरवर्ड आणि शेअर केले जातात.

२०१५ साली परत एकदा काही वकिलांनी आग्रा न्यायालयात ताजमहाल हा तेजोमहालय आहे म्हणून धाव घेतली.

न्यायलयाने भारतसरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडे या विषयाबद्दल विचारणा केली. त्यावेळी मोदी सरकारने ताजमहाल च्या जागी शंकराचे मंदिर असल्याचा कोणताही पुरावा मिळत नसल्याचे सांगितले. तसेच भारतीय पुरातत्त्व खात्याने सुद्धा ताजमहाल हा तेजोमहाल नाही असा लेखी अहवाल न्यायालयात सुपूर्द केला आहे.

हे ही वाचा – 

Leave A Reply

Your email address will not be published.