उजनीचं पाणी – यशवंतराव ते विलासराव व्हाया शरद पवार.

मान्सुनचं आगमन झालं की सगळ्यांना आपल्या गावात आपल्या भागात पाऊस कधी कोसळेल याचीच काळजी लागलेली असते. मात्र आम्हा सोलापूरवासीयांना आस लागते ती पुण्यातील पावसाची. सोलापूर जिल्ह्यातली माय आपल्या पुण्याला शिकणाऱ्या पोराला जेवला का विचारते, पण त्याचा बाप त्याच्या ख्यालीखुशाली विचारण्याआधी पुण्यात पाउस पडला का विचारतो.

का बर सोलापूरच्या माणसांना पुण्याच्या पावसाची एवढी काळजी..?

महाराष्ट्रातला सर्वात कमी पर्जन्यमान असणरा जिल्हा कोणता ठाऊक आहे का..? तो मराठवाडा नाही की विदर्भ नाही. तो आहे पश्चिम महाराष्ट्रातला सोलापूर जिल्हा.

देशातले सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत माहिती आहे का ? 

ते ना गंगेच्या समृद्ध खोऱ्यात आहेत न की कावेरीसारख्या नदीच्या खोऱ्यात. इतकचं काय तर ते महाराष्ट्रातल्या ऊस शेतीसाठी फेमस असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात देखील नाहीत. सर्वात जास्त साखर कारखाने आहेत सोलापुर जिल्ह्यात.  

ते कसं काय प्रश्न पडला ना..?

ही किमया साधली आहे उजनी धरणामुळे. हे उजनी धरण आहे सोलापूरच्या माढा तालुक्यात. पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या भीमा नदीवर हे धरण बांधलं आहे. याची क्षमता आहे १२१ टीएमसी. या धरणानं आमच्या भागाचं नशीबच पालटल.एकेकाळी ज्वारीच कोठार म्हणून ओळखल्या जाणऱ्या दुष्काळी जिल्ह्यात देशातले सर्वाधिक कारखाने उभे राहिले.

या धरणाने घडवलेला बदल माझ्या कुटुंबाने डोळ्याने अनुभवला आहे. माझं गाव ढवळस. माढा तालुक्यातलं अतिशय दुष्काळी म्हणून ओळखलं जाणार हे गांव. पूर्वी पाण्याअभावी बरीचशी शेत मोकळी असायची. काम नसल्याने गावातली बहुतांश कुटुंब पुण्या मुंबईला स्थलांतरीत झालेली.

प्रत्येक घराला आज्जा मुबैच्या नाही तर सोलापूरच्या गिरणीत कामाला गेल्याचं आम्ही ऐकलेलं असायचं. गावतली तरणी पोर काम नसल्याने गावातच चकाट्या पिटणं, पत्ते खेळणे असले उद्योग करत असायचे. दारूचं व्यसन अनी दारिद्र्य गावाच्या पाचवीला पूजलेलं होत.

Screenshot 1 2
twitter

जून १९८० उजनीचं धरण पुर्ण झालं. उजनीच पाणी आलं आणि गांव झपाट्याने बदलला. सैराट पिक्चर मधला पेटलेल्या माळरानासारखी शेतं आर्चीच्या उसाच्या शेतासारखी हिरवीगार झाली. मुंबईला गेलेली माणसं परत आली. घरामध्ये स्कोर्पिओ, बुलेटसारख्या गाड्या दिसू लागल्या. घरात जनावरं आली. दूधदुभत वाढलं. गावातली पोरं तालमीमध्ये घुमू लागली.

हा बदल झालाय तो केवळ यशवंतराव चव्हाणांच्या कल्पकतेमुळे बांधलेल्या धरणामुळे. यशवंतराव चव्हाणांच्या नंतर शरद पवारांनी या धरणाला मुर्त स्वरुप दिलं. म्हणूनच तर उजनीच्या जलाशयाला यशवंतसागर हे नावं दिलय. फक्त धरण बांधून चालणार नव्हतं तर साठलेलं पाणी शेतकऱ्यांच्या रानात पोहचवण्याचं काम महत्वाचं होतं. त्याची जबाबदारी घेतली ती शरद पवार आणि विलासराव देशमुख या मुख्यमंत्र्यांनी. 

महाराष्ट्रात जलसिंचन कुठे वाढलं की नाही मला ठाऊक नाही पण आमच्या तालुक्यात तरी ते नक्की वाढलं.

भीमा सीना जोडकालवा. देशातील पहिला नदी जोड प्रकल्प. सीना माढा उपसा सिंचन योजनेस दिनांक १७ मे १९९४ रोजी शासनाने ५४ कोटी रुपये किंमतीस मान्यता दिली. भीमेच पाणी तब्बल २०० फुट जमिनी खालून  साधारणत: १४ किमी एवढ्या दूर नेऊन सीना नदी मध्ये सोडलं आहे. या जोडकालव्याचा लाभ ७ तालुक्यांना झाला.

फक्त ऊसच नाही तर बोर, डाळिंब, द्राक्ष, कांदा या पिकांचेही उत्पादन उजनीच्या पाण्यावर सोलापूरचे शेतकरी घेत आहेत. फक्त शेतीच नाही तर सोलापूर शहराची तहानही उजनी भागवते.

तर आता तुमच्या लक्षात आलं असेलच की सोलापूरच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणारं हे धरण भरत ते पुण्याच्या पावसानं. तर मग का नाही वाट पाहणार आम्ही पुण्याच्या पावसाची ? सोलापूरकरांच्या दृष्टीने पंढरपुरच्या विठोबा इतकच उजनी धरण दैवत ! 

उगीच नाही पं.नेहरूंनी म्हटलय,

“धरणं ही आधुनिक भारताची मंदिरं आहेत.”

तर असं हे आमचं सोलापुरात फारसा पाउस न पडताही पूर्ण भरणारं उजनी धरण. यशवंतराव चव्हानांच्या दूरदृष्टीने आणि शरद पवार आणि विलासराव यांच्या जिद्दीने साकारण्यात आलेलं धरण हे पाहायला नक्की या.

हे ही वाचा.

2 Comments
  1. Ganesh Bhoge says

    हँल्लो मी गणेश भोगे कुर्डू ता माढा

Leave A Reply

Your email address will not be published.