चंदगडसारख्या दुर्गम भागातले देसाई बंधू करणार यंदाच्या प्रो कबड्डीमध्ये राडा !!

कोल्हापूर जिल्हयातल्या दुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदगड तालुक्यातल हुंदळेवाडी गाव म्हणजे जणू कब्बडीचं माहेरघर. जेव्हापासून समजायला लागलंय तेंव्हापासून या गावात अनेक खेळाडू घडल्याची माहिती आहे. प्रो कबड्डीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला सिद्धार्थ देसाई हा त्याच मातीत कसलेला एक खेळाडू.

पण यंदाच्या प्रो कब्बडीच्या 7 व्या हंगामात देसाई घराण्याचा दबदबा संपूर्ण महाराष्ट्राला पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे. कारण सिद्धार्थ चा भाऊ सुरज देसाईदेखील या रणांगणात उतरलाय. सुरज देसाई सध्या भारतीय सैन्यात कर्तव्य बजावतोय पण कबड्डी खेळाशी जोडलेली नाळ त्याला स्वस्थ बसू देत नाहीये हे पुन्हा एकदा उजेडात आलंय.

२०१४ साली सुरु झालेल्या प्रो कब्बडी लीग ने अल्पावधीतच महाराष्ट्राबरोबरच देशात धुमाकूळ घातला आणि तरुणाईपासून ते वयोवृद्धांच्या डोळ्यात आपली मूलं टीव्हीवर दिसणार या आशेने एक वेगळी चमक निर्माण झाली. खरंतर मागच्याचं वर्षी जेव्हा सिद्धार्थला यु मुंबा टीमने ३६ लाख रुपये देऊन करारबद्ध केले तेव्हा पासूनच चंदगड परिसरातल्या प्रत्येक घरात आपल्या लाडक्या सुपुत्राची बहारदार खेळी पाहण्यासाठी लगबग दिसून यायची. कारण आपल्या भागातल्या मुलाने देशपातळीवर जाऊन कमावलेल्या नावाचं प्रत्येक ग्रामीण भागातल्या लोकांना मोठं अप्रूप होत.

हुंदळेवाडीसारख्या  छोटाश्या  गावातुन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गातले अनेक खेळाडू चमकले आहेत याचा संपूर्ण तालुका साक्षीदार आहे. पण एकाच घरातल्या दोन भावंडांच्या कामगिरीमुळे गावाच्या कबड्डीच्या इतिहासाला खऱ्या अर्थाने उजाळा मिळाला हे नक्कीच कोणी नाकारू शकत नाही. इथल्या घराघरात एकेक पट्टीचा खेळाडू नक्कीच तयार होतोय आणि भविष्यात होत राहील.

या दोन्ही भावंडापैकी थोरला सुरज देसाई जो चार वर्षांपूर्वीच आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला होता. कबड्डी खेळात इतिहास निर्माण करत करत स्वतःच्या आणि आईवडिलांच्या आयुष्यातल्या धडपडीची आणि दुःखाची पोकळी भरत सुरजने पल्ला गाठला. आईवडील शेजारी पाजारी यांचा आनंद गगनात मावत न्हवता. पण काही कारणास्तव जयपूर पिंक पँथर्स या टिममधून खेळण्याची संधी हुकली पण सुरज हरला नाही. तोच जोश,तीच धडपड तो करत राहिला.

पण तब्बल चार वर्षानंतर आपला भाऊ यु मुंबा या मानाच्या टीममधून तो बहारदार खेळी खेळतोय हे पाहून मोठा भाऊ सुरजसुद्धा अभिमानाने आनंदी झाला. तो सध्या भारतीय लष्करात देशसेवेची नोकरी करतोय. एकीकडे एक भाऊ देशाच्या रक्षणासाठी लढतोय तर दुसरीकडे लहान भाऊ मातीतला इतिहास अजरामर व्हावा यासाठी धडपडतोय हे समीकरण कोणालाही अभिमान वाटण्यासारखंच होतं.

सिद्धार्थ देसाई. उगवत्या पिढीतला रांगडा खेळाडू.

इयत्ता सातवीत असतानाच सुरजपासून प्रेरणा घेऊन सिद्धार्थने कबड्डी खेळायला सुरवात केली होती. दहावीत ९० टक्क्यांनी उत्तीर्ण झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षण त्याने पदमभूषण रणजित देसाई यांच्या लेखणीने पावन झालेल्या कोवाडच्या श्रीमान व्ही.पी. देसाई या महाविद्यालयात घेतलं.

क्रीडाशिक्षण पांडुरंग मोहनगेकर सरांच्या प्रोस्थाहनाची आणि कौतुकाची थाप कायम पाठीवर होती म्हनुण अभ्यासाबरोबरच खेळातसुद्धा आपली चपळाई दाखवणारा सिद्धार्थ एक दिवस नक्की चांगल्या पातळीवर जाईल आणि खूप मोठं नाव करेल हा विश्वास त्यांना नेहमीच वाटत होता.

तालुका,जिल्हा अश्या विविध पातळीवर त्याने आपले कौशल्य दाखवत कब्बडीच्या वर्तुळात स्वतःच नाव कमावलं. चंदगडच्या स्थानिक क्लबपासून सुरुवात करणाऱ्या  सिद्धार्थने  २०११ साली सतेज बाणेकरांच्या ग्रुपमधुन  खेळायला सुरुवात केली प्रत्येक टप्प्यात घवघवीत यश मिळालेल्या सिद्धार्थने कब्बडी म्हणजे आपल्या जीवनाचा  एक अविभाज्य घटक बनवून सोडला. त्यानंतर मिळालेल्या यशामुळे नंतर एअर इंडियाच्या टीममधून खेळण्यासाठी करारबद्ध झाला.

पुढे तो महाराष्ट्राच्या संघातून खेळत आपली दैदिप्य्मन कामगिरी दाखवून देत राहिला त्याच्या या कामामुळेच त्याला  यु मुंबासारख्या टीममधून खेळायची संधी मिळाली. त्याने यु मुंबा संघात आपली आक्रमक खेळी दाखवून धमाकेदार सुरुवात केली. आपल्या कौशल्याची कदर करणारं व्यासपीठ त्याला प्रो कब्बडी मधून मिळालं.

Siddharth Desai

चंदगडसारख्या दुर्गम भागातून सुरु झालेला एक अभूतपूर्व प्रवास शहरातल्या या टप्प्यावर पोहोचवणे म्हणजे कोणालाही जमणार नक्कीच न्हवत. पण त्याच्या या प्रवासामागे त्याच्या आईवडिलांचे कष्ट , मोठ्या भावाचा त्याग आणि मार्गदर्शन होतं.

प्रो कबड्डी लीग सुरु झालं तेव्हा अनुप कुमार नावाच्या खेळाडूची हवा होती. मागच्या वर्षी अनुप कुमार यु मुम्बाच्या टीममध्ये नव्हता पण त्याची कमी भरून निघेल अशी कामगिरी सिद्धार्थ देसाई ने बजावली. युमुंबा कडून खेळताना पहिल्याच सामन्यात त्याने सामनावीर हा ‘किताब मिळवून आपली धमक दाखवून दिली होती. थोड्याच दिवसात धडधाकट शरीर, आक्रमक चढाई, आणि खेळण्यात बादशहा असणारा सिद्धार्थ  प्रो कबड्डीमध्ये चाहत्यांच्या गळ्याच ताईत बनला .

काही दिवसांपूर्वी सिद्धार्थचे वडील शिरीष देसाई यांना मी फोन केला होता. माझ्या मते कदाचित ते मोबाईल वापरत नसावेत घरातल्या टेलीफोनवर फोन केला. पहिल्या वाक्याची सुरुवात मी अगदी माझी ओळख सांगून करताच दुसऱ्या वाक्यापासून सिद्धार्थ आणि सुरज बद्दल आम्ही बोलत होतो. जवळपास अर्धा तास गप्पा मारत बसलो असेन पण मिनिटामिनिटाला आपल्या मुलांचा एकेक गुण  ते मला सांगत होते.

बीएस्सी शाखेतूनच शिक्षण घेतलेल्या त्याच्या वडिलांनी शेती आणि इतर गोष्टींच्या काळजीखातर शेतीत राहणं पसंद केलं. पण मुलांच्या भविष्यासाठी धडपड करणारा कोणताही बाप स्वस्थ बसत नाही हे नियतीच समीकरण आहे. सिद्धार्थ आणि सुरज या दोघांनीं चांगलं नाव केलं पाहिजेत अशी प्रत्येक मिनिटाला इच्छा बाळगणाऱ्या आईवडिलांनी आजतागायत जे काही केलं ते फक्त मुलांसाठी.

विशेष म्हणजे सिद्धार्थची आई आयआयटी मध्ये उत्तीर्ण आहे. आईवडिलांनी एवढं चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊनसुद्धा मुलांच्या भविष्यासाठी घरदार आणि शेती सांभाळली. सिद्धार्थची कामगिरी पाहून आता त्यांचा आनंद कुठेच मावत नाहीये. स्वतःचा मुलगा टीव्हीच्या स्क्रीनवर दिसावा,त्याला भरभरून पाहता यावे यासाठी आईवडिलांचे डोळे आसुसलेले असतात. त्यांची सगळी स्वप्न पूर्ण करणारी हि भावंडं आज तालुक्यातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात आहेत.

57160109 885965275129048 1692419059691290624 n

शेवटीं बाप तो बाप असतो मुलांसाठी धडपडणारा, स्वतःच्या इच्छांना मूठमाती देऊन भविष्याची स्वप्ने पाहणारा अगदी अशीच काहीशी स्वप्न मला सिद्धार्थाच्या वडिलांच्या डोळ्यात दिसत होती, जाणवत होती. आज ज्या पातळीवर सिद्धार्थ खेळतोय तिथून प्रत्येक तरुणाच्या मनात एक स्फूर्ती देण्याचे काम तो करत आहे आणि करत राहीलही.

काल सिध्दार्थवर तेलगू टायटन्स संघाचा शिक्कामोर्तब झाला. आपल्या कर्तबगार खेळीमुळे त्याला करोडपती बनण्याचा मान मिळाला. सुरुवातीच्या बोलीतच 1 करोड 45 लाख ही अवाढव्य रक्कम त्याच्या नावावर बहाल झाली. आज पून्हा दुसऱ्या संधीत भाऊ सुरजचे सिलेक्शन झालं. काही का असेना सुरजने नशीब आजमावत 10 लाखावर स्वतःच नाव कोरल. आता अवघ्या चंदगड तालुक्याचे लक्ष या भावांची धमाकेदार खेळी पाहायला उत्सुक झाले आहे.

अगदी गावाच्या शेजारी गाव असल्याने मला या दोन्ही भावांचा कमालीचा अभिमान आहे आणि तो असायलाही  हवा. मातीतल्या खेळाडूंची रग अवघा महाराष्ट्र पुन्हा एकदा अनुभवणार आहेच. या सिझनला दोन्ही भाऊ राडा करणार आणि महाराष्ट्राला भुरळ घालणार एवढं मात्र नक्की. शुभेच्छा रे वाघांनो!!

  • कृष्णा सोनारवाडकर

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.