आणि तेव्हापासून मुंबईकरांसाठी रोज सकाळचा नाश्ता म्हणजे ‘रामाश्रयचा डोसा’ हे समीकरण बनलं.
मुंबईतल्या साऊथ इंडियन पदार्थावर जीव ओवाळणाऱ्या प्रत्येकाला एकच प्रश्न विचारायचा असतो. रामाश्रय की आर्य भवन. त्यांना एक निवडता येत नसतंय.
पण लय विचार करून शेवटी रामाश्रयमध्ये मिळणारा शीरा डोळ्यापुढे आणत सगळे रामाश्रयचाच पर्याय निवडतात.
रामाश्रय, आर्य भवन ही आहेत मुंबईतली फेमस साऊथ इंडियन हॉटेल्स. त्यातल्या त्यात रामाश्रय म्हणजे तर साऊथ इंडियन फूड लव्हर्सचा जिव्हाळ्याचा विषय.
माटुंगा सेंट्रल स्टेशनपासून पाच मिनिटाच्या अंतरावर, भांडारकर रोडजवळ स्विगी आणि झोमॅटोवाले डोंगळ्यांसारखे रांग लाऊन उभे किंवा घुटमळताना दिसले की समजायचं असतंय तुम्ही रामाश्रयला आलात.
काय विशेष नाय. साधं हॉटेल, साधे पदार्थ, फळ्यावर साध्या अक्षरात लिहिलेला त्या दिवसापुरता साधाच मेनू. हॉटेलचा फील लय साधा पण इथल्या पदार्थांची टेस्ट मात्र ‘रॉयल’.
रामाश्रय हॉटेलचा इतिहास आहे जवळ जवळ ८० वर्ष जूना. या हॉटेलची स्थापना झाली १९३९ साली. स्थापना केली शामबाबू शेट्टी यांनी. शामबाबू शेट्टी मूळचे मंगळुरूचे. ते पहिल्यांदा जेव्हा मुंबईत आले तेव्हा त्यांनी मुंबईच्या माटुंगा परिसरात स्वतःची साऊथ इंडियन पदार्थांची गाडी सुरू करायचं ठरवलं. त्यांच्या हाताला इतकी यूनिक आणि पारंपारिक चव होती की मुंबईकरांना हे पदार्थ इतर साऊथ इंडियन पदार्थांपेक्षा वेगळे आणि भारी लागायचे आणि त्यामुळे जास्त आवडायचे.
रोज सकाळचा नाश्ता म्हणजे रामाश्रयचा डोसा हे समीकरण बनलं. सकाळी ऑफिसला जाण्यासाठी आणि लोकल ट्रेनचं अडव्हेंचर सैर करण्यासाठी निघालेला मुंबईकर माटुंगा स्टेशन जवळ आला की त्याच्या आवडत्या पदार्थांचे चार घास पोटात ढकलण्यासाठी का होई ना, चार क्षण थांबायचा आणि मग पुढे निघायचा.
नंतर पूढे शामबाबू शेट्टी यांच्या मुलांनी म्हणजेच जयराम शेट्टी आणि भास्कर शेट्टी यांनी ह्या व्यवसायातला आणि फूड सेक्टरमधला फायदा ओळखत हाच बिझनेस पुढे चालवण्याचं ठरवलं. रामाश्रय हॉटेलचं नाव तर होतंच होतं. साऊथ इंडियन जेवण म्हणलं की मुंबईकरांची पहिली पसंती ही रामाश्रयलाच मिळत होती.
या हॉटेलचा पूर्वी पासूनच एक यूएसपी हा राहिलाय की हे हॉटेल सकाळी पाच वाजल्यापासून उघडतं.
कसंय भिडू, मुंबईत दररोजच्या ऑफिसपेक्षा मोठा विषय असतो तो म्हणजे दररोज ऑफिसला ‘पोहोचणं’ आणि ऑफिसला पोहोचण्यासाठी दररोज ‘झगडणं’.
घरातनं बाहेर पडलं आणि ऑफिसला पोहोचलं इतकं सोप्पं मुंबईकरांचं आयुष्य नसतंय.
बस, रिक्शा, ट्रेन, ट्रॅफिक, प्रवास, गर्दी या गोष्टी पार केल्यानंतर येतं ते ऑफिस. त्यात मुंबईची ओफिसं सुद्धा पुणेकरांसारखी ११, १२ ला उघडत नाहीत. ८.३०, ९ पासून सुरू होत असतात. म्हणजे तुम्हाला समजा ९ वाजता ऑफिसला पोहोचायचं असेल तर तुम्हाला निदान ६ किंवा ७ वाजता घरून निघणं आहे. अशावेळी नाश्ता आणि खाण्यापिण्याची सोय हे रामाश्रय हॉटेल वर्षानूवर्ष लावत आलंय.
म्हणजे तसं बघायला गेलं तर दिवसभर हॉटेलमध्ये तुम्हाला गर्दी दिसतेच. पण इथे त्याहूनही जास्त गर्दी दिसते ती सकाळी.
आता ऑफिसवाले तर झालेच, पण बरीच पोरं सुद्धा आपल्याला या रामाश्रयच्या टेबल खुर्च्यांवर कल्ला करताना दिसतात. माटुंगा एरियात रुईया, पोदार आणि वेलिंगकर अशी तीन मोठ्ठी कॉलेजेस आहेत, त्यामुळे रामाश्रय म्हणजे या पोरांचं हक्काचं ठिकाण आहे. नाही म्हणायला मणीज आणि आर्य भवन ही साऊथ इंडियन हॉटेल्स सुद्धा याच एरियात असल्यामुळे रामाश्रयला टफ देतात. पण प्रत्येकाचा पहिला चॉइस रामाश्रयच असतो.
रामाश्रयमध्ये जर कधी तुम्ही गेलात तर खायलाच पाहिजेत अशा गोष्टी म्हणजे इथला पाण्याहून पण पातळ असा नीर डोसा आणि सोबत येणारी नारळाची हिरवी पिवळी चटणी. ही चटणी मागून मागून खाल्ली तरी चालते, तिकडल्या अण्णांना ती परत परत आणून द्यायची सवयच असते.
समजा भूक भागली नाही तर अख्खं टेबल व्यापून घेणारा एक साधा डोसा मागवला की तुमचं काम होतंय. शिवाय इथं गेलं की पायनॅप्पल फ्लेवरचा शीरा खाल्याशिवाय आणि वाफाळलेली फिल्टर कापी प्यायल्या शिवाय परत यायचं नसतंय.
रामाश्रय पूर्वी होतं त्याच्या आता चौपट बनलंय. एवढंच काय, तर रामाश्रयच्या अनेक शाखा मुंबईतल्या अनेक वेगवेगळ्या भागात सुरू झाल्या आहेत. बदलत्या काळाप्रमाणे इतर शाखांमधला हॉटेलचा लूक पण बदलत चाललाय.
पण या नवीन शाखांमध्ये देवाचे हार घातलेले फोटो, फळ्यावर लिहिलेला मेनू, टेबलाच्या कॉर्नरला एक पाय बाहेर काढून दाटीवाटीने बसलेली, घडयाळ बघत नी घाई करत जेवणारी माणसं आणि टेबलांच्या मधून वाट काढत, प्लेट्स उचलत आणि लुंगी सांभाळत धावणारे अण्णा असं काहीच दिसत नाही.
या नवीन शाखांमध्ये पदार्थांच्या चवीसोबत हॉटेलमध्ये बसण्याचा फील पण रॉयल असतो. त्यामुळे रामाश्रयमध्ये आल्यासारखंच वाटत नाही.
तर आता आम्हाला विचाराल, आणि मुंबई दौरा करणार असाल तर ‘माटुंग्याच्या’ रामाश्रयला भेट द्यायला विसरू नका.
हे ही वाच भिडू:
- उडपी हॉटेल भारताच्या कानाकोपऱ्यात कस पोहचलं ?
- तामिळनाडू सोडून हे अण्णा मुंबईत आले, त्यांचा डोसा आज दुबई, न्यूझीलंड मध्ये मिळतो..