हा शेतकरी वर्षाला ३० लाख रुपये इन्कम टॅक्स भरतोय….

काय काय भिडूनों, मार्च एन्डिंग जवळ आलायं. लक्षात आहे ना? इन्कम टॅक्स भरण्यासाठी शेवटचा महिना आणि त्यात पण शेवटचे चार दिवसचं राहिलेत. त्यामुळे लवकरात लवकर काय असेल तो टॅक्स भरुन घ्या. पण तरीही एक आपला सहजच प्रश्न. असा असून असून किती असणार आहे हो तुमचा आयटी रिटर्न?

चांगला सेटल्ड बिझनेस असला तर २ ते २.५ लाख रुपये. गलेलठ्ठ पगाराची नोकरी असली तर २ लाख रुपये म्हणजे डोक्यावरनं पाणी.

पण भिडूनों,

भारतात एक असा शेतकरी आहे जो मागील काही वर्षांमध्ये प्रत्येक मार्च एन्डिंगला तब्बल ३० लाख रुपयांच्या आसपास इन्कम टॅक्स भरतो.

होय. बरोबर वाचलयं. हे खरयं. जसा तुमच्या चक्कीत जाळं झाला तसाचं आमच्या पण झालेला. म्हणून तर म्हंटलं तुमच्या समोर हे मांडावं.

या आयटी रिटर्न शेतकऱ्याच नाव म्हणजे रामशरण वर्मा.

जी गोष्ट मोठं मोठ्या डिग्र्या घेणाऱ्यांना जमणार नाही अशी गोष्ट या बहाद्दराने शेतीतून साध्य केली आहे. हा शेतकरी आज एवढा श्रीमंत झालाय की तो वर्षाकाठी तब्बल ३० लाख रुपये नुसता इन्कम टॅक्स भरतो. ते पण हायस्कूल नापास असताना.

उत्तरप्रदेशच्या बाराबंकीच्या टेरा दौतलतपुर नावाच्या एका छोट्याश्या गावात राहत असलेले रामरशण वर्मा. त्यांच आता वय आहे साधारण ५६ वर्ष. आजपासून जवळपास ४० वर्षापुर्वी म्हणजे १९८१-१९८२ च्या दरम्यान त्यांनी आपल्या सहा एकरातुन शेतीला सुरुवात केली होती.

घरची परिस्थीत हालाखीची असल्यामुळे शाळा हायस्कूलमध्ये असतानाच सुटली. त्यात नापास झाल्यामुळे अजून एक वर्ष त्याच वर्गात बसणं परवडणारं नव्हतं. त्यामुळे २१-२२ व्या वर्षीच त्यांच्यावर शेतीची सगळी जबाबदारी येवून पडली.

आता त्यांनी वेगळं काय केलं? तर सुरुवातीपासूनच त्यांनी नव-नवीन प्रयोगांवर भर दिला होता. यात एका पेक्षा जास्त पीकं घ्यायची, नगदी पिकांवर जास्त भर द्यायचा असे काही प्रयोग होते.

त्यानंतर पुढच्या ५ ते ६ वर्षातच त्यांना याचा रिझल्ट दिसू लागला. त्याकाळी म्हणजे १९८७ च्या दरम्यान ते वर्षाला टॉमॅटो मधून २.५ ते ३ लाख रुपये, बटाट्यामून १ लाख, मेथी मधून ५० ते ६० हजार प्रति एकर कमवायला लागले होते.

जेवढा पगार आज एखाद्या क्लासवन अधिकाऱ्याचा आहे तेवढी कमाई ते ३५ वर्षापुर्वी करत होते.

आज वर्मा यांच्याकडे जवळपास ३०० एकर शेतीचं क्षेत्र आहे. तिथून इथं पर्यंतच्या प्रवासात हळू हळू जमीन वाढतं गेली, व्याप वाढतं गेला, नफा वाढला. मात्र या सगळ्या दरम्यान ते कुठेच प्रयोग करताना थांबले नाहीत आणि दमले पण नाहीत.

वर्मा यांचा केळी, टोमॅटो, बटाट्याच्या शेतीतुन मिळणारा नफा आजच्या घडीला दुप्पट – तिप्पट दरानं वाढला आहे. संपुर्णपणे हायटेक असलेल्या शेतात १२५ एकरात टॉमॅटो लावला आहे. यातुन प्रतिएकर चारशे क्विंटल टॉमॅटो अंदाजे निघतो. ज्याच्या विक्रीतुन जवळपास २ ते सव्वा दोन लाख रुपये कमाई होती.

केळी उत्पादनात तर त्यांनी केलेल्या क्रांतीमुळे २०१९ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. सोबतचं २००७ आणि २०१० मध्ये राष्ट्रीय कृषी पुरस्कारानं गौरवलं आहे. ते इथं टिशूकल्चर पद्धतीनं केळीची शेती करतात. त्यामुळे उत्पन्न वाढून त्यांना एका एकरातील पीकातुन तब्बल २.५ ते ३.५ लाख रुपयांपर्यंतची उलाढाल होते.

रामशरण वर्मा सांगतात,

आज या शेतीतुन मी इतक चांगल उत्पन्न घेत आहे की शेतीला टॅक्स नसुन देखील माझ्या उलाढालीचा आकडा पाहून माझ्याकडून टॅक्स घेतला जातो. सध्या मी वर्षाला ३० लाख रुपयांच्या आसपास तरी इन्कम टॅक्स सहज भरतो.

आज वर्मा यांच्या जवळ स्वतःच व्हाईट हाऊस नावाचं घर, ब्रँडेड कपडे, गाड्या सगळं आहे. स्वतःच्या राखणीसाठी त्यांनी दोन चांगली जातीवंत कुत्री पाळली आहेत. शेतीच्या पारंपारिकतेतुन बाहेर पडणारे वर्मा इतर अनेक शेतकऱ्यासाठी प्रेरणा बनले आहेत.

सोबतच ते शेतकऱ्यांच मार्गदर्शन आणि प्रबोधन देखील करत असतात. ते म्हणतात, शेतकऱ्यांना कर्जमाफी देवू नका तर आर्थिक मदत द्या. त्यामुळे पेरणी करतेवेळी कर्जाची गरजच लागणार नाही.

ते आपल्या www.vermaagri.com या वेबसाईटवरुन दररोज कमीत कमी १५ शेतकऱ्यांना प्रशिक्षीत करतात. देशा-परदेशातील कृषी शास्त्रज्ञ, लोकसेवेच्या परिक्षा पास झालेले आधिकारी देखील त्यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी येत असतात. मार्च २०१७ मध्ये नाबार्डची सहयोगी संस्था बर्डचे प्रशिक्षक डॉ. श्रीनाथ रेड्डी आणि डॉ. कैलाश चंद्र शर्मा यांच्यासोबत जगातील १३ देशांची ३३ सदस्यीय टीम रामशरण यांच्या शेतीचा अभ्यास करुन गेली आहे.

लॉकडाऊन दरम्यान स्थलांतरित मजुरांना गावात काम मिळत नव्हतं तेव्हा रामशरण यांच्या शेतात नियमीतमध्ये ५० ते ७० श्रमिक काम करत होते. वर्षभरात कोणत्या ना कोणत्या स्वरुपात मजूरांच्या हाताला इथं काम मिळतचं असते.

देशात एका बाजूला शेतीत पैसा मिळतं नाही असं सांगताना शेतकऱ्यांचे डोळे प्रसंगी पाणावलेले आपण बघत असतो. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी तर कधी आणखी कोणत संकट सहन झालं नाही तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या पण बातम्या येत असतात. त्यावर सरकार तात्पुरती मदत देतं, आणि परत परिस्थिती जैसे थे.

पण दुसऱ्या बाजूला देशात असे पण काही सकारात्मक शेतकरी आहेत जे, याच शेतीतून अक्षरशः सोनं पिकवतात, आणि नुसतं पिकवत नाहीत तर त्याचा योग्य मोबदला घेत लखपती, करोडपती देखील होत असतात. रामशरण वर्मा यांपैकीच एक.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.