अन् गरब्यासाठी फेमस असलेले सोमय्या घोटाळे बाहेर काढू लागले…

सातत्यानं नवं-नवीन घोटाळे बाहेर काढणं आणि ते माध्यमांधून लावून धरणं यासाठी किरीट सोमय्या हे राज्यभरात ओळखले जातात. कचरा घोटाळा, एसआरए घोटाळा किंवा भूखंड घोटाळा  त्यांनी आजपर्यंत अनेक आरोप केले आहेत.

पण त्यातील पुढे किती सिद्ध होतात हा एक वेगळा संशोधनाचा आणि अभ्यासाचा विषय आहे.  पण त्यांच्या आरोपांची दखल घ्यावी लागते हे मात्र नक्की. आता देखील सोमय्या सातत्यानं हसन मुश्रीफ  यांच्यावर आरोप करत  आहेत. महाविकास आघाडीला त्यांनी चांगलंच बेजार केलंय हे नक्की.

किरीट सोमय्या याच आरोप करण्याच्या स्टाईलमुळे सध्या राजकीय वर्तुळात फेमस असले तरी त्यांची राजकारणात फेमस होण्याची सुरुवात झाली होती ९० च्या दशकात एका गरबा कार्यक्रमातून, आणि तिथं उपस्थित राहिलेल्या लालकृष्ण आडवाणी यांच्यामुळे.

किरीट सोमय्या यांच्या राजकीय आयुष्याला सुरुवात झाली ती जयप्रकाश नारायण यांच्या विद्यार्थी आंदोलनांमधून. अवघ्या २० व्या वर्षी त्यांनी आईकडून प्रेरणा घेत आणीबाणी दरम्यानच्या विद्यार्थी चळवळींसाठी स्वतःला वाहून घेतलं होतं. आणीबाणी संपल्यानंतर देखील त्यांनी तरुणांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालणं आणि ते सोडवणं हे चालूच ठेवलं होतं.

पुढे १९८० मध्ये भाजपची स्थापना झाल्यानंतर किरीट सोमय्या यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण भाजपसाठी तो अगदी नव्याचाच काळ होता. पण भाजप नेत्यांसाठी एखाद्या दुःखद स्वप्नाप्रमाणे होता. कारण सर्व निवडणुकांमध्ये पराभव होत होता. कोणतीही विजयाची चिन्हे दिसत नव्हती. त्यावेळी भाजपचे खासदार देखील अवघे दोन होते. त्यातून लोक चिडवायचे. देशात सरकार चालवणार कोण? ज्यांचे खासदार दोन.

पण सोमय्या हे हट्टानं भाजपमध्ये राहिले. ते माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीनं प्रभावित होते. सोबतच बाळासाहेब ठाकरे यांच्या आक्रमक भाषणांचे देखील ते चाहते होते. 

त्यावेळचे इतर जेष्ठ नेते प्रमोद महाजन, हशू आडवाणी, जयवंतीबेन मेहता, वेद प्रकाश गोयल, राम नाईक, गोपीनाथ मुंडे यांच्याकडून देखील सोमय्या राजकारणाचे धडे गिरवत होते.

अशावेळी तरुणांच्या प्रश्नांसोबतचं सोमय्या यांनी भाजपसोबतच्या हिंदुत्ववादी विचारधारेशी जुळवून घ्यायला सुरुवात केली आणि यातून त्यांनी ९० च्या दशकात मुलुंड, घाटकोपर या गुजरातीबहुल भागांमध्ये गरब्यांचे कार्यक्रम आयोजित करण्यास सुरुवात केली. सोबतच महाआरतीची देखील सुरुवात केली. हे गरबा आणि महाआरतीचे कार्यक्रम प्रचंड गाजायचे. 

या गरबा आयोजन आणि महाआरतीच्या कार्यक्रमांमधून सोमय्या लोकांच्यात ओळखले जावू लागले. यातून भाजपच्या रथयात्रेपर्यंतच्या दिवसांमध्ये ते महाराष्ट्र भाजपमधील महत्वाचे नेते बनले होते. सोमय्या यांनी रथयात्रेला देखील उपस्थिती लावली होती. असं सांगितलं जातं की, याच रथयात्रेवेळी सोमय्या लालकृष्ण आडवाणींच्या देखील जवळ पोहचले.

याच रथयात्रेनंतरच्या झालेल्या एका गरबा कार्यक्रमाला सोमय्या यांनी लालकृष्ण आडवाणी निमंत्रित करण्याचं ठरवलं, त्यानुसार त्यांनी बोलवलं देखील. आडवाणी यांनी देखील येण्याचं मान्य केलं आणि मुंबईतील गरब्यासाठी ते दाखल झाले.

लालकृष्ण आडवाणी फक्त दाखलच झाले नाहीत तर त्यांनी याठिकाणी नृत्य देखील केल्याचं त्यावेळचे अनेक राजकीय पत्रकार सांगतात.

एका आमदार देखील नसलेल्या माणसाच्या कार्यक्रमाला लालकृष्ण आडवाणी आले आणि त्यांनी नृत्य केलं हीच त्यावेळची मुंबईतील सर्वात जास्त चर्चीली गेलेली बातमी होती. आडवाणी येण्याआधी सोमय्या फक्त लोकांमध्ये ओळखीचं नाव होतं, पण त्या दिवसापासून ते अख्ख्या मुंबईत फेमस झाले.

यानंतर सोमय्या यांनी मुंबईतले छोटे-छोटे मुद्दे घेऊन रस्त्यावर उतरायला सुरुवात केली, यातून ते थेट अधिकाऱ्यांशी जाऊन भिडायचे. अशाच आंदोलनांमधून सोमय्या यांनी स्वतःची अँग्री यंग मॅन अशी इमेज सेट केली. 

अखेरीस १९९५ ची विधानसभा निवडणूक आली. भाजपची शिवसेनेसोबत युती होती. त्यावेळी मुलुंड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे सीटिंग आमदार आणि त्यावेळचे ज्येष्ठ नेते वामनराव परब यांच्याविषयी शिवसेनेच्या गोटात नाराजी होती.

पण १९९० मध्ये परब यांनी काँग्रेसच्या आर. आर. सिंग यांचा मोठ्या फरकानं पराभव केला होता. त्यामुळे जरी सेनेमध्ये आपल्या विषयी नाराजी असेल तरी आपल्याला पुन्हा तिकीट मिळेल अशी त्यांना आशा होती. मात्र परब यांच्या आशांवर पाणी फिरलं आणि भाजपनं वामनराव परब यांचं तिकीट कापलं.

याचा फायदा थेट सोमय्या यांना झाला आणि मुलुंडचं तिकीट त्यांच्या पदरात पडलं. मात्र त्यावेळी मुंबई भाजपमध्ये बरीच नाराजी व्यक्त झाली होती. कारण परब यांच्या तुलनेत सोमय्या कितीतरी तरुण आणि राजकारणात नवखे होते. मात्र निकाल लागला तेव्हा सोमय्या पहिल्यांदा आमदार झाले होते.

आमदार असताना त्यांनी गुंतवणूकदार संरक्षण कायदा आणि शवविच्छेदन कायदा असे दोन महत्त्वाचे कायदे मंजूर करून घेतले. सोबतचं फक्त मुंबईच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे असलेले हाउसिंग सोसायटी कन्वेयंस हे विधेयक देखील विधानसभेत त्यांनीच सादर केलं होतं.

पुढे १९९९ साली पक्षाने सोमय्या यांना ईशान्य मुंबई मतदारसंघातून लोकसभेचं तिकीट दिलं आणि काँग्रेसचे दिग्गज नेते गुरुदास कामत यांचा ७ हजारच्या दरम्यान मतांनी पराभव करत ते विजयी झाले. अशा प्रकारे किरीट सोमय्या राजकारणात आले आणि महाराष्ट्राच्या राजकारणातून ते लवकरच दिल्लीच्या राजकारणात देखील पोहचले. पण त्यानंतरच्या काळात देखील सोमय्या महाराष्ट्रातील घोटाळे बाहेर काढत राहिले. 

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.