पाकिस्तानच्या पॅटन रणगाड्यांना स्मशानभूमीत बदलवणारा ‘वीर अब्दुल हमीद’ !
सप्टेंबर १९६५- भारत-पाकिस्तान युद्ध अगदी भरात होतं. काश्मीर पाठोपाठच पंजाबमध्ये देखील युद्धाची आघाडी उघडण्यात आली होती. भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांनी लाहोरपर्यंत धडक मारायचा इरादा बनवला होता. भारताच्या लष्करी हालचालीवरून पाकिस्तानने पंजाबमध्ये आक्रमक धोरण स्वीकारलं होतं.
पाकिस्तानच्या पॅटन रणगाडे असलेल्या पहिल्या चिलखती तुकडीने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली. अमेरिकनेने पाकिस्तानला दिलेले हे पॅटन रणगाडे अतिशय शक्तिशाली म्हणून ओळखले जायचे. जगभरातील अनेक युद्धांमध्ये त्यांनी निर्णायक भूमिका बजावली होती. भारतीय सैन्याला या पॅटन रणगाड्यांना उत्तर शोधावं लागणार होतं.
८ सप्टेंबर १९६५.
पाकिस्तानने खेमकरण शहर ताब्यात घेतलं. भारतीय आर्मीनेच त्यांना तिथून आत येऊ दिलं होतं. साधारण ३०० पॅटन रणगाड्यांची डिव्हिजन होती. भारतीय आर्मीचे १४० शर्मन रणगाडे त्यांच्यापुढे अपुरे होते. त्यामुळे भारतीय सैन्याने माघार घेतली आणि ते शेतात लपून बसले. सर्वत्र कालव्यातून पाणी सोडून पाकिस्तानी रणगाड्याना हालचालीसाठी अडचणी निर्माण करण्यात आल्या होत्या. जागो जागी रणगाडेविरोधी बॉम्ब बसवण्यात आले होते.
९ सप्टेंबरची सकाळ.
खेमकरण जवळच्या ‘चिमा’ गावाबाहेर ‘४ इंफ्नट्रि डिव्हिजन’ लपूनच पाकिस्तानी रणगाड्यांची वाट पाहत होती. साधारण साडे सातच्या दरम्यान त्यांचा आवाज ऐकू येऊ लागला. सगळे सज्ज झाले. त्यात होता ‘४ ग्रेनेडीयर’चा कंपनी हवालदार अब्दुल हमीद.
अब्दुल हमीदच्या जीपवर ‘रिकॉनसाईल गन’ बसवण्यात आली होती. तो उत्कृष्ट नेमबाज असल्यामुळे तो ‘डीटॅचमेंट कमांडर’सारखा वरिष्ठ अधिकारी नसून देखील आरसीएल गनची जबाबदारी त्याच्या एकट्यावर दिली गेली होती.
सकाळी ९ वाजेपर्यंत पाकिस्तानी रणगाडे दिसू लागले होते. भारतीय सैन्याने कोणतीही गडबड केली नाही. त्यांना जवळ येऊ दिलं गेलं आणि जेव्हा पहिला रणगाडा हमीदच्या जीपच्या ३० फुट जवळ आला तेव्हा त्याने बार उडवला.
पाकिस्तानच्या पहिल्या पॅटन रणगाड्याच्या ठिकऱ्या उडाल्या.
बेसावध पाकिस्तानी सैन्यामध्ये खळबळ उडाली. अवजड रणगाडे आग ओकू लागले. भारताकडून देखील चोख प्रत्युत्तर दिलं गेलं. अब्दुल हमीदने अतिशय चपळाईने आपली जागा बदलली आणि दुसऱ्या रणगाड्याला टिपले. युद्धाची धुमश्चक्री जोरात होती.
एका छोट्याशा जिपने जगातल्या सगळ्यात शक्तिशाली रणगाड्यांना पळता भुई थोडी करून सोडली. दिवसाखेर पाकिस्तानचे १३ रणगाडे नष्ट करण्यात आले. त्यातले चार रणगाडे एकट्या अब्दुल हमीदने उडवले होते. भारताचे शर्मन टँक तिथे कुचकामी ठरले होते. त्यामुळे त्यांना माघारी घेण्यात आले.
१० सप्टेंबर.
दुसऱ्या दिवशी सकळी परत युद्धाला तोंड फुटले. अब्दुल हमीदने कालच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणे चालूच ठेवले होते. अब्दुलच्या जीपची हालचाल इतक्या जलद व्हायची की रणगाड्यांना त्याचा वेध घेणं मुश्कील होऊन बसलं होतं.
पाकिस्तानी सैन्याने मात्र कुठल्याही परिस्थितीत अब्दुलची जीप उडवण्याच्या मनसुबा पक्का केला होता.
शूर अब्दुल हमीद त्यांच्या हाती लागत नव्हता. दुसऱ्या दिवशी देखील त्याने २ रणगाडे टिपले. तिसऱ्या रणगाड्याला त्याने टार्गेट केले होते, मात्र चिखलातून जागा बदलत असताना अखेर एक ग्रेनेड त्याच्या गाडीवर येऊन आदळले आणि गाडीचा स्फोट झाला. अब्दुल हमीद जागीच शहीद झाला.
अब्दुलच्या शौर्यामुळे इतर साथीदारांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी जोरदार लढा दिला. अखेर पाकिस्तानला माघार घ्यावी लागली. या युद्धात पाकिस्तानने आपले ९७ रणगाडे गमावले. पॅटन रणगाड्याच्या इतिहासात प्रथमच एखाद्या देशावर इतकी मोठी नामुष्की ओढावली गेली.
अस्सल उत्तर युद्ध.
दुसऱ्या महायुद्धानंतरचे सर्वात मोठे रणगाडा युद्ध म्हणून हे युद्ध ओळखले जाते. आजही खेमकरण शहराची ओळख रणगाड्यांची स्मशानभूमी अशीच आहे.
पाकिस्तानच्या पॅटन टँकला दिलेले ‘अस्सल उत्तर’ म्हणून या युद्धाला ‘अस्सल उत्तर युद्ध’ असे देखील म्हणतात.
सात रणगाडे उडवून वीर अब्दुल हमीदने अविश्सनीय कामगिरी केली होती. त्याच्या या विरतेबद्दल त्याला देशातील सर्वोच्च अशा ‘परमवीर चक्रा’ने गौरवण्यात आले.
- पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब टाकणार होता.. पण ?
- जेव्हा कारगिल युद्धात दिलीप कुमारांनी मध्यस्थी केली होती!!!
- लोकांच्या कापलेल्या केसांनी कोरियन अर्थव्यवस्थेला युद्धाच्या दुष्परिणामांपासून वाचवलं होतं.