पाकिस्तानने भारताकडे हॉकी खेळाडू मागितला, भारताने सांगितलं, ‘त्यासाठी युद्ध करावं लागेल !’

तो भारताचा महान हॉकी खेळाडू होता.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी आणि त्याच्यामध्ये अनेक समानता होत्या. जसं की दोघांचाही जन्म ७ जुलै रोजीच झाला होता. दोघेही एका अतिशय छोट्याशा शहरातून आले होते. दोघेही लहानपणी फुटबॉल खेळत असत. आपल्या गावातील फुटबॉल संघाचा तो कॅप्टन देखील राहिला होता.

धोनी भारताचा विकेट कीपर होता, तर तो संघाचा गोलकीपर होता. धोनीने भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला, तर त्याने भारताला ऑलिम्पिक हॉकीमध्ये सुवर्ण, रौप्य आणि आशियायी खेळात सुवर्ण जिंकून दिलं.

दोघांनाही इतिहास आपापल्या संघाचे महान कॅप्टन म्हणून त्यांना लक्षात ठेवील.

धोनीने तरी वर्ल्ड कप मधला पराभव बघितला, पण तो भारतासाठी ऑलिम्पिक खेळला आणि पदक न जिंकता परतला, असं कधीच झालं नाही. त्याने भारताला १९५६ सालच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण, १९६० साली रौप्य आणि १९६४ साली परत सुवर्ण जिंकून दिलं.

त्याच्याविषयी एवढं सगळं सांगूनही त्याचं नाव तुम्हाला ओळखता आलं असेल याची खात्री अजूनही देता येत नाही. हाच त्याच्यामधला आणि धोनीमधला सर्वात मोठा फरक. भारतीय हॉकीसाठी इतकं काही केलेलं असूनही आपल्याला त्याचं नाव माहित नसतं, हीच मोठी शोकांतिका.

लक्ष्मन शंकर असं या महान भारतीय हॉकी खेळाडूचं नाव.

भारतीय हॉकी म्हंटलं की आपली सुरुवात होते भारतीय हॉकीचे जादुगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेजर ध्यानचंद यांच्यापासून आणि शेवट होतो धनराज पिल्लई यांच्यावर. पण यांच्यामध्ये आपण लक्ष्मण शंकरला मात्र विसरलेलो असतो.

लक्ष्मण शंकर यांच्याविषयी १९६४ सालच्या ऑलिम्पिकपूर्वी पाकिस्तानचे मेजर जनरल मुसा म्हाणाले होते,

“भारताने जर आम्हाला जोगिंदर आणि लक्ष्मण शंकर दिले, तर मग आम्हाला कुणीच हरवू शकत नाही”

त्यावर उत्तर देताना भारताच्या हॉकी फेडरेशनचे तत्कालीन अध्यक्ष अश्विनी कुमार म्हणाले होते,

“त्या दोघांना मिळविण्यासाठी तुम्हाला भारताबरोबर युद्ध लढावं लागेल.”

यावरून आपल्याला लक्षात येऊ शकतं की भारतीय हॉकीमधला त्यांची भूमिका किती महत्वाची असेल ते. परंतु पाकिस्तानच्या जनरल मुसा यांनी शंकर विषयीचं हे विधान असंच केलं नव्हतं. तर त्यालाही एक इतिहास होता.

१९५६, १९६० आणि १९६४ अशा तिन्ही वेळच्या ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ एकमेकांशी भिडले होते. त्यातल्या फक्त १९६० सालच्या फायनलमध्ये पाकिस्तानला विजय मिळाला होता.

१९५६ आणि १९६४ या दोन्ही सालच्या फायनलमध्ये त्यांचा १-० असा पराभव झाला होता. अनेक प्रयत्न करून देखील पाकिस्तानला भारताची गोल पोस्ट भेदता आली नव्हती. कारण तिथे भिंतीसारखा भक्कम बचाव करत उभा होते लक्ष्मण शंकर.

लक्ष्मण शंकर यांच्याविषयी तर असंही सांगितलं जातं की ते आंतरराष्ट्रीय हॉकीमधले पहिले गोलकीपर होते, ज्यांना आपल्या संघाचं कर्णधारपद मिळालं. त्यांचा बचाव इतका भक्कम होता की त्यांनी खेळलेल्या तिन्ही ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये  मिळून त्यांनी विरोधी संघाचा फक्त १ गोल स्वीकारला होता. तिच गोष्ट आशियायी खेळांची. तीन आशियायी फायनलमध्ये मिळून त्यांनी स्वीकारले होते फक्त २ गोल.

“लगता हैं बॅट्समन को अब बॉल फुटबॉल के बॉल की तरह नजर आले  लगा हैं”

क्रिकेटच्या मॅचेस बघताना कॉमेंट्री बॉक्समधून हे वाक्य आता आपण इतक्या वेळा ऐकून झालंय की त्याचा वीट यावा. पण हे वाक्य बहुधा सर्वप्रथम वापरण्यात आलं होतं ते लक्ष्मण शंकर यांच्याविषयी. १९६४ सालची ऑलिम्पिक स्पर्धा सुरु असताना ऑस्ट्रेलियायी मासिक ‘हॉकी सर्कील’ने शंकर विषयी लिहिताना हे वाक्य वापरलं होतं.

१९६८ सालच्या मेक्सिको ऑलिम्पिकसाठी निवडण्यात आलेल्या भारताच्या संघातून त्यांना वगळण्यात आलं होतं. त्यानंतर नाराज झालेल्या शंकर यांनी हॉकीमधून निवृत्ती घेतली आणि भारतीय सैन्य दलात काम करायला सुरुवात केली.

१९७९ साली मराठा लाईट इन्फंट्रीचे कॅप्टन म्हणून त्यांनी निवृत्ती घेतली. त्यांचे निवृत्तीनंतरचे शेवटचे दिवस मात्र अतिशय दुखात आणि कष्टात गेले. पायाला गँग्रीन झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पाय न कापता त्यांनी आयुर्वेदिक उपचार घेण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय त्यांच्या अंगलट आला.

२९ एप्रिल २००६ साली त्यांनी जगाचा निरोप घेतला.

भारत सरकारने त्यांना अर्जुन आणि पद्मश्रीने सन्मानित केलं होतं. मृत्यूनंतर सैन्यदलाला दिला जाणारा सन्मान देऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. २०१६ साली ‘हॉकी इंडिया’ने देखील त्यांचा ‘ध्यानचंद जीवनगौरव’ पुरस्कार देऊन गौरव केला. पण जिवंत असताना मात्र त्यांच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष झालं.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.