रशियाविरुद्ध लढण्यासाठी युक्रेनच्या दोन वर्ल्ड चॅम्पियन्स बॉक्सर्सनं सैन्यात जायचं ठरवलंय
बॉक्सिंग. जीव घेण्या हाणामारीचा खतरनाक खेळ. आपण लहानपणी डब्ल्यूडब्ल्यूएफ बघायचो, त्यातल्या खोट्या मारामाऱ्याही आपल्याला लई बाप वाटायच्या. इथं बॉक्सिंगमध्ये गोष्ट फक्त ठोशांवर असते, पण डब्ल्यूडब्ल्यूएफ पेक्षाही खतरनाक! एखादा ठोसा चेहरा किंवा छातीवर बसतो, तेव्हा अंगावरचं मांस थरथरतं, हाडाला धक्का लागतो आणि आपण कुणालाही सपोर्ट करत असलो, तरी अंगावर शहारा येतो.
हे सगळं बॉक्सिंग पुराण सांगण्यामागं दोन बॉक्सर्स आहेत. ज्यांनी जवळपास १२ वर्ष बॉक्सिंग विश्वावर राज्य केलं. हे दोघं म्हणजे, क्लिट्श्चको ब्रदर्स. थोरला विटाली आणि धाकटा व्लादिमीर. थोरल्याचं वय ५० आणि धाकट्याचं ४५. त्यांचे मेडल्स, स्पर्धा, विक्रम याबद्दल नंतर सांगतो. पण आत्ता हे भिडू चर्चेत आलेत, त्यामागचं कारण लई भारी आहे. त्यांच्या बॉक्सिंगसारखंच अंगावर काटा आणणारं.
हे दोघंही युक्रेनचे. तसं निवांत असणारं युक्रेन आता युद्धाच्या छायेत आहे. रशियन सैन्य फक्त सैनिकी स्थळंच नाही, तर लोकांची घरंही उध्वस्त करतंय. युक्रेनच्या सीमा सोडा, राजधानीही सुरक्षित नाही. या सगळ्या परिस्थितीत क्लिट्श्चको ब्रदर्सनं एक निर्णय घेतला… सैन्यात जायचा.
विटाली क्लिट्श्चको २०१४ पासून युक्रेनची राजधानी कीव्हचा महापौर आहे. युद्धाला सुरुवात झाल्यावर माध्यमांना प्रतिकिया देताना, तो म्हणाला, ”कीव्ह आत्ता धोक्यात आहे. लोकांना पाणी आणि गॅस पुरवणं हे आमचं प्राधान्य आहेच. पण सामान्य नागरीकही देशाच्या रक्षणासाठी तयार आहेत. माझा माझ्या देशावर आणि देशातल्या लोकांवर विश्वास आहे. माझ्यासमोर लढणं हा एकच पर्याय आहे आणि मी लढणार.”
धाकट्या व्लादिमीरनं महिनाभराआधीच सैन्याच्या राखीव तुकडीमध्ये आपलं नाव नोंदवलं होतं. ‘आपल्या देशावरच्या प्रेमासाठी मी लढायला बांधील आहे,’ असं त्यानं सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं होतं.
हा झाला या दोघांचा वर्तमान, पण बॉक्सिंग रिंगमधला इतिहासही अंगावर काटा आणणारा आहे…
विटाली क्लिट्श्चको, याचं बॉक्सिंग रिंगमधलं टोपणनाव होतं, डॉक्टर आयर्नफिस्ट. त्याचे ठोसे इतके जबरदस्त असायचे की जणू काही त्याची मूठ पोलादाची आहे. सुरुवातीला सोव्हिएत युनियनमध्ये कराटे आणि किक बॉक्सिंग खेळायला बंदी होती, त्यामुळं विटालीनं बॉक्सिंगचा मार्ग निवडला. अमॅच्युअर बॉक्सिंगमध्ये त्यानं अनेक मेडल्स आणि स्पर्धा जिंकल्या. पहिल्या मिलिट्री वर्ल्ड गेम्समध्ये त्यानं गोल्ड मेडलही जिंकलं. अमॅच्युअर बॉक्सिंगमध्ये त्याच्या नावापुढं १९५ विजय आहेत, आणि पराभव फक्त दोन.
व्लादिमीर क्लिट्श्चको, याचं बॉक्सिंग रिंगमधलं टोपणनाव होतं, डॉक्टर स्टीलहॅमर. समोरच्या प्लेअरच्या अंगावर हातोडे मारावेत, अशा याच्या फाईट्स बसायच्या. यानंही अमॅच्युअर बॉक्सिंग गाजवली, पण व्लादिमीर लाइमलाईटमध्ये आला तो १९९६ मध्ये. त्यावर्षी अटलांटा ऑलिम्पिकमध्ये त्यानं सुपर हेव्हीवेट गटात गोल्ड मेडल जिंकलं. त्यानंतर दोन्ही भावांची एंट्री झाली ती प्रोफेशनल बॉक्सिंगमध्ये.
१९९९ मध्ये विटालीनं वर्ल्ड हेव्हीवेट चॅम्पियनशिप जिंकली. त्यानंतर सलग दोनदा त्यानं चॅम्पियनशिप राखली. पुढं व्लादिमीरनं विटालीला हरवणाऱ्या ख्रिस ब्यर्डला हरवलं आणि पाच वर्ष चॅम्पियनशिपवर आपलं नाव कोरलं.
मात्र २००८ ते २०१२ हा चार वर्षांचा काळ या दोन्ही भावांच्या वर्चस्वाचा होता. दुखापतीमुळं पाच वर्ष बॉक्सिंग रिंगच्या बाहेर असलेल्या विटालीनं चॅम्पियनशिप (WBC) आपल्या नावावर करत दणक्यात कमबॅक केलं. त्याचवेळी व्लादिमिरच्या नावावर तिन्ही मोठ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप (WBO, IBF, IBO) होत्या. पुढची अडीच वर्ष ही जोडी आलटून-पालटून विजेतेपदं जिंकत राहिली. २०१३ मध्ये विटालीनं प्रोफेशनल बॉक्सिंगमधून निवृत्ती घेतली आणि आपल्या राजकीय कारकिर्दीकडे पूर्ण लक्ष द्यायला सुरुवात केली.
व्लादिमीर मात्र रिंगमध्येच होता, त्यानं २०१५ पर्यंत आपलं अधिराज्य कायम ठेवलं. २०१६ आणि २०१७ मध्ये त्याचा फॉर्म गंडला आणि त्यानंही निवृत्ती जाहीर केली.
धिप्पाड शरीरयष्टी, अफाट दमसास आणि समोरच्याला खेळवत बसण्यापेक्षा नॉकआऊट करायची ताकद यामुळं क्लिट्श्चको ब्रदर्सची एकप्रकारे दहशत होती. आपल्या तगड्या शरीरयष्टीचा योग्य वापर कसा करायचा, हे सुद्धा या जोडीला चांगलंच माहीत होतं. आपल्या प्रोफेशनल करिअरमध्ये विटाली ४७ फाईट्स लढला, त्यातल्या जिंकल्या ४५ (यातही ४१ विजय नॉकआऊटवर) आणि हरला दोन. दुसऱ्या बाजूला व्लादीमीरनं फाईट्स लढल्या ६९, यातल्या जिंकल्या ६४ (५३ नॉकआऊट) आणि हरला फक्त पाच. थोडक्यात फक्त सात फाइट्स हरणाऱ्या क्लिट्श्चको ब्रदर्सनं एक काळ गाजवलाय आणि देश संकटात असताना युद्धात उतरत आपलं देशावर असलेलं प्रेमही दाखवून दिलंय.
हे ही वाच भिडू:
- २०१४ मध्ये कुठलंही युद्ध न करता रशियानं युक्रेनचा एक भाग गिळंकृत केला होता..
- क्युबन मिसाईल क्रायसिसच्या १३ दिवसांच्या आणीबाणीनं जगात तिसरं महायुद्ध पेटवलं असतं…
- रशिया-युक्रेन युद्धामुळं डिझेल-पेट्रोलच्यापलीकडे या गोष्टी आपल्या घरातलं बजेट बिघडवू शकतात