संप कधी संपवायचा हे न कळल्यामुळे मुंबईतला “गिरणी कामगार” संपला…!

राज्यातला सरकारी कर्मचाऱ्यांचा संप नुकताच मागे घेण्यात आला, त्याआधी एसटी कामगारांचा संप जवळपास ६ महिने लांबला होता. संपाचं हत्यार उगारल्यावर कधी सरकारकडून मेस्मा लावण्यात येतो, कधी नुसत्या आश्वासनावर बोळवण होते, तर कधी हे संपाचं हत्यारच लढाई जिंकून देतं.

पण राज्यात कुठलाही संप झाला की एका गोष्टीची आठवण हमखास काढली जाते, गिरणी कामगारांचा संप.

गिरणी संपाचं नक्की काय झालं होतं ?

या संपाला अनेक विशेषणं लावली जातात. कामगारांना उध्वस्त करणारा, कामगार संस्कृतीला ग्रहण लावणारा वैगेरे वगैरे.

या संपाचे अनेक टप्पे आहेत. पहिलं म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून या संपाला सुरुवातीला असलेली अपेक्षा, संपाचे नेतृत्व करणारे डॉ. दत्ता सामंत आणि मुख्य म्हणजे या संपकऱ्यांच्या अवास्तव मागण्या. संप संपल्यानंतर झालेला परिणाम. कामगार क्षेत्रात अंडरवर्ल्डचा शिरकाव.

१९८० च्या दशकात मुंबईत गिरणी कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी संपाचं  हत्यार  उगारलं होतं. १८ महिने हा संप चालला होता. गिरणी मालक कोणत्याही परिस्थितीत हे संप मोडून काढण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यांनी साम- दाम- दंड- भेद या साऱ्याचा वापर करायचं ठरवल होतं. कामगारांच्या आंदोलनामध्ये वेगवेगळ्या ट्रेड युनियन सहभागी झाल्यामुळे राजकीय वळण लागत होते. दोन्ही बाजुंनी माघार घेण्याचं नाकारलं होतं. मुंबईमधली परिस्थिती चिघळत चालली होती.

त्याआधी १९७४ मध्ये देखील भाई डांगे यांच्या नेतृत्वात संप झाला होता तेंव्हा ४२ दिवस संप चालला आणि ४ रुपयांनी पगार वाढ झाली होती. अचूक वेळेस डांगे यांनी संप मागे घेतला.  

पण १९८२ च्या संपाच्या आधीच, १९८१ मध्ये बाळासाहेबांनी बोनसच्या मागणीवरून गिरणी कामगारांच्या संपाची ठिणगी पेटवली होती,

ज्यामुळे गिरणी कामगारांना कुठेतरी आशा निर्माण झाली.

बोनसच्या मागणीवरून १५ गिरण्या संप करत होत्या.  सेनेचं कामगार क्षेत्रात वर्चस्व वाढत होतं. त्यातच १ नोव्हेंबर १९८१ ला बाळासाहेबांनी एक दिवस बंद ची हाक दिली. जी प्रचंड यशस्वी झाली होती. तेंव्हा  बाळासाहेब म्हणालेले, कामगारांना २०० रुपये पगारवाढ दिली नाही तर १५ नोव्हेंबरपासून गिरण्या बंद होतील.

बाळासाहेबानाच्या भूमिकेमुळे, गिरणी कामगार खुश होते त्यांना कुणीतरी खमका नेता मिळाला होता पण त्या दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री अंतुले यांच्यात बैठक झाली आणि सेनेने जाहीर केलं आपण संप करणार नाही.

झालं गिरणी कामगारांमध्ये नाराजी पसरली. आणि त्यांनी दुसरा नेत्याचा शोध सुरु केला.

तेच दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते डॉ दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले आणि इंजिनीरिंग आणि इतर उद्योगातील कामगारांना पगारवाढ करण्यात आली होती. हेच गिरणी कामगारांनी हेरलं. त्यांना ४ रुपयांच्या पगारवाढीवर काम करायचं नव्हतं. त्यांनी थेट डांगे यांचं नेतृत्व नाकारत सामंत यांना गाठलं. 

पण सामंत यांनी संपाचं नेतृत्व करण्यास नकार दिला कारण त्यांना गिरणी धंद्यातलं काही कळत नव्हतं असं त्यांनी स्वतः स्टॅंडर्ड मिलचे कामगार मोर्चाला कळवलं होतं. 

पण कामगारांनी गळ घातली आणि सामंत यांच्याकडे नेतृत्व आलं. त्यांनी महाराष्ट्र गिरणी कामगार युनियन’ची स्थापना केली आणि गिरणी कामगारांच्या हट्टापायी १८ जानेवारी १९८२ रोजी अडीच लाख कामगारांनी संप पुकारला. संप सुरु होताच सरकारने हा संप बेकायदेशीर असल्याचं जाहीर केलं. 

सुरुवात होते ती म्हणजे मागण्यांपासून,

या अवास्तव मागण्या कशा पद्धतीने रेटत गेल्या आणि संप ही संपला आणि सर्वच बंद झालं…

संपाची मुख्य मागणी अशी होती कि, मान्यताप्राप्त युनियन सोबत वाटाघाटींची सक्ती करणारा बी.आय.आर. कायदा रद्द करावा. 

  • यासोबतच गिरणी कामगारांचे १५० ते २०० रुपये पगार वाढ व्हावी. तसाच कामगारांना चांगल्या सुविधा मिळाव्यात. 
  • पगारवाढ ही इतर क्षेत्रातील कामगारांएव्हढाच असावा हि मागणी होती.
  • बदली कामगारांच्या प्रश्नाची मागणी या संपाचा कणा ठरली.  एकूण कामगारांपैकी ४० टक्के कामगार हे बदली कामगार होते. त्यांना गिरण्यांत फक्त ४ ते १५ दिवस काम मिळायचं. वर्षांमागून वर्ष जात होते पण गिरणी मालक त्यांना पर्मनंट करत नव्हते. त्यात तरुण कामगार जास्त होते.
  • तसेच रजेसाठी आणि अन्य सुविधांसाठी वर्षाकाठी २४० दिवस भरण्याची सक्ती होती. याबाबतची मागणी अशी होती कि, आजारपणाच्या सुट्ट्या वाढवणं आणि दर वर्षी २० रुपयांनी पगार वाढ करावी.
  • अनुभवाच्या निकषांखाली हि पगारवाढीची मागणी होती, नवीन कामगारांना ७५ रु. पाच ते दहा वर्षांचा अनुभव असणाऱ्यांना १०० रु, दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव असणाऱ्यांना १२५ रु, आणि त्यापेक्षा जास्त अनुभव असणाऱ्यांना १५० रु पगारवाढ अशी मागणी होती.

पण दुर्दैव असं कि, या संपाचा फायदा गिरणी मालकांनाच झाला. मात्र ही गोष्ट संप करणाऱ्या कामगारांना कळली नाही ना नेतृत्व करत असलेल्या सामंत यांना कळली.

तो मुद्दा म्हणजे तंत्रज्ञान.

कामगारांचा संप चालू होता काही गिरण्या बंद पडल्या होत्या पण बाजारात या संपाचा काही परिणाम जाणवलाच नाही. काही गिरणी मालक मात्र हुशार निघाले. यंत्रांची मागणी वाढली. गिरणी मालक भिवंडी आणि इचलकरंजीमधून यंत्रांनी कापड तयार करून घेत होते आणि मिलच्या नावाने विकत होते. त्यामुळे बाजारात कापडाची टंचाई निर्माण झालीच नाही. कामगार संपावर आहेत म्हणून त्यांच्याच उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला पण गिरण्यांना काही फरक पडला नाही. 

तरी संपाच्या दरम्यान तत्कालीन सरकारने ३० रुपयांच्या हंगामी पगारवाढीचा प्रस्ताव ठेवला पण त्यांनी जास्त पगारवाढीच्या हव्यासापोटी कामगारांनी तो प्रस्ताव नाकारला. आणि ही मोठी चूक ठरली. 

पण या संपाचे नंतर दूरगामी परिणाम झाले.. 

या सर्व काळात जमिनीची किंमत वाढली. गिरणी मालकांनी आपल्या गिरण्या बंद केल्या अन त्या जमिनी विकल्या. त्या अजागी आलिशान टॉवर उभारले गेले. राजकारणी नेते, गिरणी मालक आणि रियल इस्टेट एजंट्स यांच्या मिलीभगत झाली. आणि दोन्ही बाजूंनी संप तुटेपर्यंत ताणला गेला आणि संपला.

एक म्हणजे बेरोजगारी वाढली, गिरणी कामगारांमध्ये अंडरवर्ल्डचा शिरकाव झाला

हा संप संपल्यानंतर मुंबईतल्या गिरण्या बंद झाल्या. तेथील अनेक कामगार बेरोजगार झाले. अनेकांचे संसार उघड्यावर पडले. त्यानंतरही अनेक आंदोलने झाली. पण त्यावर तोडगा काय निघाला नाही.

ज्यांच्याकडे शेत जमिनी होत्या ते गावी गेले, ज्यांना काही नव्हतं त्यांनी दागदागिने विकले, स्वतःच्या मुंबईतल्या राहत्या जागा विकल्या. अनेक कामगार मिळेल ते काम करू लागले. बिगारी कामाची भीक मागू लागले. पण यात होरपळलेला तरुण वर्ग गुन्हेगारीकडे वळला. शिक्षण नव्हतं ना रोजगार नव्हता त्यामुळे सहज अन पटकन मिळणाऱ्या पैशाकडे हा तरुण वर्ग आकर्षित होऊ लागला. 

थिएटरबाहेर ब्लॅक तिकिटं विकत अनेक कामगारांची मुलं अंडरवर्ल्डमध्ये सक्रिय झाले. दाऊदच्या गॅंगमध्ये सामील झाले. 

यातलं दोन नावं म्हणजे अरुण गवळी अन अमर नाईक. 

हे दोघेही संपात होरपळलेल्या गिरणी कामगार कुटुंबामधले होते. अरुण गवळी डॉन बनण्याच्या आधी मिल मध्ये काम करत.  यांच्याशिवाय रमा नाईक, बाबू रेशीम अशी अनेक नावं. गिरण्या जशा बंद झाल्या तशी कामगारांची हि मुलं १९९७ पर्यंत अंडरवर्ल्डमध्ये सक्रिय होती. 

थोडक्यात त्या एका संपामुळे आणि अवास्तव मागण्या रेटत राहिल्यामुळे त्याचा परिणाम फक्त कामगार क्षेत्रावरच नाही तर एकंदरीत मुंबईवर झाला होता. थोडक्यात संप कधी संपवायचा हे त्यांना कळलं नाही हा या संपातले गिरणी कामगार त्यानंतर देशोधडीला लागले.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.