शिक्षणसम्राट तानाजी सावंतांची रेकॉर्डब्रेक कारकीर्द पाहता त्यांना अंगठाछाप मंत्री म्हणावं का ?

घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर अशा दौऱ्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे प्रचंड ट्रोल झाले होते. हा एक विषय थांबत नाहीये तोवर त्यांच्या नावे एक मेसेज मिडीयामध्ये व्हायरल झाला. यामध्ये तानाजी सावंत यांनी ससून हॉस्पिटलमधील डॉक्टरांना हाफकिन नावाच्या माणसाकडून औषध घेणं बंद करा असा सल्ला दिल्याचा दावा केलाय. त्यांच्या याच सल्ल्यावरून त्यांना ट्रोल करण्यात येतंय. हाफकिन हा माणूस नसून शासकीय संस्था आहे आणि हे आरोग्य मंत्री असुनही मंत्रीमोहोदयांना कळू नये का असा प्रश्न विचारला जातोय.

आता हे ट्रोलिंग सुरू झाल्यावर तानाजी सावंत चिडले आणि, “मी काय तुम्हाला अंगठाछाप मंत्री वाटलो का? मी उच्चशिक्षित आहे. मी डॉक्टर आहे, पिएचडी होल्डर आहे तसेच रँकर आहे. आयुष्यभर घासलेलं आहे. एकदा मी किती संस्था चालवतो, किती कारखाने चालवतो, याची माहिती घ्या” अशा शब्दांत त्यांनी मिडीयावाल्यांना आणि ट्रोलर्सना सुनावलं. 

असो तर कोणत्याही व्यक्तीला ट्रोल करण्याआधी त्या व्यक्तीबाबत माहिती जाणून घेणं महत्वाचं असतं.

म्हणूनच आज तानाजी सावंत यांचं शिक्षण किती आहे ? ते राजकारणात कसे आले? त्यांच्या किती दर्जेदार संस्था आहेत, किती कारखाने आहेत याची माहिती घेऊयात.

तानाजी सावंत हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकाव इथले. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. शालेय शिक्षण तिथेच झालं. त्यानंतर १९८२ मध्ये त्यांनी सोलापूरच्या गव्हर्नमेंट कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगचा डिप्लोमा पूर्ण केला. पुढे १९८६ मध्ये कराडच्या गव्हर्नमेंट कॉलेजमधून इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं.

त्यानंतर पुण्यातल्या भारती विद्यापीठात काही काळ इंजिनिअरींगचे लेक्चरर म्हणून नोकरी केली. त्यांच्या शिक्षणासंदर्भातली माहिती निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दिलेली आहे..१९९० साली सावंत यांनी गिरीराज प्रमोटर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंस्ट्रक्शन कंपनी सुरु केली.

त्यानंतर १९९८ साली त्यांनी जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ नावाने स्वतःचा धर्मादाय ट्रस्ट नोंदवला.  जयवंत शिंक्षण प्रसारक मंडळ अर्थातच JSPM. JSPM द्वारे २००१ मध्ये ताथवडे येथे त्यांनी राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनीअरींग ही व्यावसायिक संस्था सुरू केली. २००१ ते २०१४ या काळात त्यांनी पुणे शहरात आणि आसपास सहा कॅम्पस उघडले. यातल्या ५ ब्रांच पुण्यात ताथवडे, हडपसर, वाघोली, बावधन आणि नऱ्हे मध्ये आहेत तर एक सोलापूरच्या बार्शीत आहे.  

इंजिनिअरींग, मेडिकल, फार्मसी, मॅनेजमेंट अशा सर्वच क्षेत्रातले एकूण ५८ अभ्यासक्रम JSPM द्वारे शिकवले जातात. यासोबतच सावंतांनी पुणे जिल्ह्यात अनेक प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांची स्थापना देखील केली आहे.  JSPM ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे इंजिनिअरिंग कॉलेजस पुण्यातील सर्वोत्तम इंजिनिअरिंग कॉलेजच्या यादीत गणले जातात. सोबतच ही संस्था संशोधन क्षेत्रात देखील पुढे असते.

आणि याच JSPM संस्थेचे तानाजी सावंत हे संचालक आहेत.

व्यावासयिक म्हणून काम करताना सांवतांनी र २००९ मध्ये जयवंत टेक्नीकल कॅम्पसमधून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले. तर २०१८ मध्ये स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी PhD पूर्ण केली आणि डॉक्टरेट मिळवली.

शिक्षण क्षेत्रच नाही तर साखर कारखानदारी क्षेत्रातील मोठं नाव म्हणून तानाजी सावंत यांच्याकडे बघितलं जातं.
२००८ मध्ये त्यांनी भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड नावाने उस्मानाबादच्या सोनारीमध्ये साखर कारखाना सुरू केला आहे. ते भैरवनाथ साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन आहेत. काहीच वर्षांपूर्वी सोलापूर मंगळवेढ्यात लवंगीच्या माळरानावर कारखाना उभारणीचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला होता. 

सोबतच सावंत हे उस्मानाबादमध्ये वेगवेगळ्या साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. सावंत यांनी आतापर्यंत पाच साखर कारखाने स्थापन केले असून ते उत्कृष्ट उत्पादकतेसह कार्यरत आहेत. याशिवाय भैरवनाथ अॅग्रो प्रोसेस लिमिटेड, गिरीराज प्रमोटर्स प्रायव्हेट लिमिटेड, न्यूट्रीफास्ट ऍग्रो इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थांचे ते संचालक आहेत.

शिक्षण आणि सहकार क्षेत्रानंतंर तानाजी सावंताची राजकारणात एंट्री कशी आणि कुठून झाली तेही बघूया,

तानाजी सावंतांच्या राजकारणातल्या एंट्रीला त्यांचे बंधू शिवाजी सावंत यांची राजकीय व सामाजिक पार्श्वभूमी होती. शिवाजी सावंत हे शिवसेनेचे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख होते, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते होते. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी दोन वेळेस शिवसेनेकडून तिकीट मिळवलं होतं मात्र त्यांचा दोन्ही वेळेस पराभव झालेला. 

याच दरम्यान तानाजी सावंत देखील शिवसेनेतून स्थानिक राजकारणात हळूहळू सक्रिय होत होते. सुरुवातीला त्यांचं राजकारण हे सोलापूरशी मर्यादित होतं. मग त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात साखर कारखाना काढला. आणि तिथूनच त्यांनी आपल्या राजकीय करिअरला सुरुवात केली.

स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१४ साली त्यांनी पहिल्यांदा शिवसेनेकडे उस्मानाबादच्या लोकसभेचे तिकीट मागितले. 

पण सेनेने तिकीट नाकारले. मग तानाजी सावंत यांनी बंडखोरी करण्याचा इशारा दिला. शिवसेनेपासून ते काही काळ दूर गेले.  पण काही काळानंतर उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने २०१५-१६ मध्ये ते परत शिवसेनेशी जोडले गेले. या काळात सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे संपर्कप्रमुख म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं. 

परांड्यात त्यांनी शिवजलक्रांती नावाचा एक मोठा प्रोजेक्ट हाती घेतला होता. जवळपास १०० किलोमीटरच्या परिसरात त्यांनी जलयुक्तची कामं केली तीही स्वखर्चाने. याच प्रोजेक्टला त्यांनी “बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांती” असं नाव दिलं, त्या कार्यक्रमाला त्यांनी उद्धव ठाकरेंना बोलावलं होतं. त्यामुळे ते मातोश्रीच्या अगदी जवळ गेले आणि ठाकरेंच्या विश्वासू गटात सामील झाले.

शिवजलक्रांती योजनेत ‘चमकदार’ कामगिरी केल्यानंतर २०१६ मध्ये त्यांन उपनेतेपद दिलं गेलं.  लागलीच त्याच सालात ते विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले. तसेच २०१७ मध्ये उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख नियुक्त केलं. 

तर आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये फडणवीस सरकारच्या काळात त्यांना जलसंधारण मंत्रीपद देण्यात आलं. याच काळात तिवरे धरण फुटलं त्यात १९ जणांचे प्राण गेले होते तेंव्हा, “या धरणफुटीला खेकडे जबाबदार आहेत’ या सावतांनी केलेल्या विधानावर मोठ्या प्रमाणात टिका झाली

त्या नंतर राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणूका पार पडल्या. या निवडणुकीत भूम-परांड्यातून शिवसेनेकडून तानाजी सावंत निवडून आले. पण तरीही तानाजी सावंतांना महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी काय मिळाली नव्हती. 

त्यांनी मंत्रिपद मिळावं म्हणून सोलापूरच्या स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून वरिष्ठ नेत्यांवर दबावतंत्राचा वापर केला म्हणतात पण त्याचा काही फारसा परिणाम झाला नाही. म्हणून ते नाराज होते त्याची परिणीती म्हणजे त्यांचं बंड…!

या बंडांनंतर मात्र त्यांना शिंदे – फडणवीस सरकारमध्ये आरोग्यमंत्रीपद मिळालं.. आणि त्यानंतर सुरू झालेलं हे ट्रोलिंग. तुम्हांला काय वाटतं ? तानाजी सावंत यांचं सहकार क्षेत्रातील आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदान आणि त्यांचं शिक्षण बघता त्यांना अंगठाछाप मंत्री म्हणावं का? आम्हांला कमेंट करून सांगा.

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.