चहा विक्रेत्याच्या मुलीला मिळालीये ३ कोटी ८० लाख रुपयांची शिष्यवृत्ती…!!!

 

आताच एक चांगली बातमी मिळालीये. सुदीक्षा भाटी. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील एका चहा विक्रेत्याची मुलगी. तीच्या बारावीतल्या मार्क्सच्या आधारे पुढच्या शिक्षणासाठी तीला थेट अमेरिकेतून शिष्यवृत्ती मिळालीये. शिष्यवृत्तीची रक्कम देखील थोडी-थिडकी नाही तर ३.८ कोटी रुपये इतकी आहे. एका अतिशय गरीब घरातून येणाऱ्या मुलीचं पुढचं आयुष्यच या शिष्यवृत्तीमुळे पुरतं बदलून जाणार आहे.

सुदीक्षा ही सीबीएसई बोर्डाची विद्यार्थिनी. बारावीचा निकाल लागला आणि त्यात तीला मिळाले ९८ टक्के मार्क. या मार्क्ससह ती तिच्या जिल्ह्यातून पहिली आली होती. पण तीचा हा प्रवास अतिशय खडतर राहिलाय. कारण घरची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट होती. तीचे वडील चहा विकून संसाराचा गाडा हाकत होते. बर फक्त आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणं हेच एक आव्हान नव्हतं तर ती सामाजिकदृष्ट्या देखील मागास अशा समाजातून येते. त्यामुळे तिच्यासमोरचं आव्हान दुहेरी होतं. पण कठोर मेहनत आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर तिने हे आव्हान लीलया पेललं.

२००९ साली ‘शिव नडार फाउंडेशन’ने समाजातील गोरगरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या ‘विद्याज्ञान लीडरशिप अकादमी’च्या शाळेतून  सुदीक्षानं बारावीची परीक्षा दिली होती. आता पुढील ४ वर्षे अमेरिकेतील प्रतिष्ठित अशा बॉबसन कॉलेजमध्ये शिकण्यासाठी तिला ३.८ कोटींची शिष्यवृत्ती मिळालीये. या शिष्यवृत्तीमुळेच  आपलं उच्चशिक्षणाचं स्वप्न चांगल्या रीतीने पूर्ण होणं आता शक्य होणार आहे, असं सुदीक्षा सांगते. आपल्या या यशाचं श्रेय ती खडतर आर्थिक परिस्थिती असताना देखील आपल्या शिक्षणाला महत्व देणाऱ्या आपल्या पालकांना देते.

Leave A Reply

Your email address will not be published.