बाबासाहेब आंबेडकरांवर दगडफेक झाली, ते रक्तबंबाळ झाले पण मागे हटले नाहीत.

आज बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. बाबासाहेबांनी १३ ऑक्टोबर १९३५ ला येवला इथं धर्मांतराची घोषणा केली. त्यानंतर तब्बल २१ वर्षांनी म्हणजे १३ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.

धर्मांतरासाठी १९३५  ते १९५६  हा कालखंड आंबेडकरांसाठी काही सोप्पा नव्हता. प्रचंड संयम, त्याग, चिकाटी आणि प्रसंगी समाजातील तथाकथित उच्चवर्णीयांशी लढण्याची तयारी सुद्धा आंबेडकरांनी दाखवली होती.

अशाच एका सत्याग्रहात आंबेडकरांवर दगडफेक झाली होती.

पण यामागे खूप मोठ्या लढ्याची पार्श्वभूमी होती. १९३५ ला ऐतिहासिक धर्मक्रांतीला सुरुवात झाली. १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला इथं भरलेल्या सभेत आंबेडकरांनी

मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही

ही घोषणा केली.

त्याआधी बहिष्कृत भारत मध्ये बाबासाहेबांनी एक अग्रलेख लिहिला होता. त्यात ते म्हणतात,

काळाराम मंदिरासाठी सत्याग्रह करणे अपरिहार्य झाले आहे. आपण लवकरच मंदिर प्रवेशाची चळवळ हाती घेणार. जोपर्यंत हिंदू म्हणून या समाजाचे आहोत तोपर्यंत मंदिर प्रवेश हा आमचा अधिकार आहे व तो आम्ही बजावूनच दम घेऊ.

३ मार्च १९३० रोजी बाबासाहेबांनी नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह सुरू केला. या आंदोलनाचे जबाबदारी दादासाहेब गायकवाडांकडे होती. सत्याग्रहाच्या आधीच एक दिवस राज्याच्या कानाकोपऱ्यातून १५ लोक नाशिकमध्ये दाखल झाले. त्यात अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करायचे ठरले.

३ मार्च १९३० ला सत्याग्रह सुरू झाला.

डॉ. बाबासाहेबांच्या आदेशाने सत्याग्रहींच्या चार तुकड्या करण्यात आल्या. प्रत्येक तुकडीत 150 जण होते. आंदोलक मंदिराच्या चारही दरवाजांवर ठाण मांडून बसले. उत्तर दरवाजावर पतितपावनदास, पूर्व दरवाजावर कचरू साळवे, दक्षिण दरवाज्यावर पांडुरंग राजभोज आणि पश्चिम दरवाज्यावर शंकरदास नारायणदास.

बाबासाहेब स्वतः सारी व्यवस्था पाहत होते.

मंदिर उघडल्यास रामाचे दर्शन घ्यायचे ठरले. या घटनास्थळाला तत्कालीन आयुक्त घोषाळांनी भेट दिलेली. त्यांना बाबासाहेबांनी हा मानवी हक्काचा लढा असल्याचे सांगितले. काही मध्यम मार्ग निघाल्यास सत्याग्रह थांबवू असे ही आश्वासन दिले. यावर घोषाळांनी हॉटसन साहेबास एक पत्र लिहिले.

त्या पत्रात घोषाळ म्हणतात,

हे प्रकरण खूपच गंभीर आहे. देवळाला वेढा घातलाय. मला आंबेडकर भेटले. सत्याग्रही गाणे म्हणत आहेत. घोषणा देत आहेत. त्यात अनेक स्त्रिया आहेत. आंदोलकांचा वेष खादी असून डोक्यांवर गांधी टोप्या आहेत. सत्याग्रहात अडथळा आणणारा कुठलाही हुकूम पाळला जाणार नाही, असे आंबेडकरानी सांगितले आहे. आम्ही गेलो तेव्हा आंदोलक आमच्याशी बसून बोलले. मात्र, बाबासाहेब येताच उठले.
या चळवळीचे स्वरुप धार्मिक असण्यापेक्षा, सामाजिक व राजकीय आहे.

हा सत्याग्रह १९३५ पर्यंत सुरुच होता. यापैकी ९ एप्रिल १९३० ला एक भयंकर घटना घडली. हा रामनवमीचा दिवस होता. या ठिकाणाहून रथयात्रा निघणार होती. सत्याग्रही आक्रमक झाले होते. पोलिसांचा बंदोबस्त ही वाढवण्यात आला होता. संघर्ष होऊ नये म्हणून दोन्ही बाजूच्या नेत्यांनी तोडगा काढला.

रथ पूर्वेच्या श्रीराम मंदिरापर्यंत आणायचा. त्यानंतर सत्याग्रहींनी आणि त्यांनी मिळून ओढायचा.

पण घडलं काहीतरी उलटच. वेळेच्या आधीच रथ ओढायला सुरुवात झाली. सत्याग्रहींना चुकवण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा त्यांनी हा रथ अडवला. आणि इथूनच संघर्षाची ठिणगी पेटली. मारामारी, दगडफेक झाली. घटनास्थळी बाबासाहेबांनी धाव घेतली. दगडांचा वर्षाव सुरू झालेला. तेव्हा भास्कर कद्रे हा भीमसैनिक मंदिरात घुसला. दगडफेकीत सापडून तो रक्तबंबाळ झालेला. त्यामुळे बेशुद्ध पडला.

त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या बाबासाहेबांवर ही दगडफेक करण्यात आली.

बाबासाहेब त्यावेळी मागे हटले नाही. सत्याग्रह सुरूच राहिला, त्यांच्या जखमी अवस्थेत ही. बाबासाहेब त्यावेळेस लढले नसते तर आजही दलितांना दारिद्र्य, अज्ञान आणि सामाजिक अन्याय यांपासून मुक्ती लाभली नसती. आत्मसन्मानाने जगता आलं नसतं,  लोक उपेक्षितच राहिले असते.

हे ही वाचं भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.