याच ९० मिनटात आधुनिक जर्मनचा जन्म झाला होता. 

प्रत्येक देशाच्या इतिहासात अशी एक घटना असते जी वर्षानुवर्षे  त्या देशात राष्ट्रवादाची भावना जागवती ठेवायचं काम करत असते. येणाऱ्या पिढी दर पिढीमध्ये ही घटना परिकथेसारखी सांगितली जाते.

सध्याच्या जर्मनीच्या बाबतीत ही कथा फक्त ९० मिनिटांमध्ये फुटबॉलच्या ग्राउंडवर घडलेली आहे.

मिरॅकल ऑफ बर्न.

दुसऱ्या महायुद्धातील पराभवानंतर जर्मनीचे अनेक तुकडे पडले. पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी, नाझी पार्टीचे समर्थक आणि नाझीचे विरोधक. शिवाय स्वतःला कम्युनिस्ट म्हणवून घेणारे वेगळेच. अशा वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये जर्मन समुदाय विभागला गेला होता. परंतु या सगळ्यांना एकाच धाग्यात बांधून ठेवणारी एकच गोष्ट त्यांच्यात समान होती ती म्हणजे कोणीही आता ‘जर्मन’ राहिलेला नव्हता. एका माणसाच्या विकृतीची शिक्षा पूर्ण देशाला भोगायला लागली होती. जगभरात विशेषतः यूरोपमध्ये जर्मन लोकांना अपमान सहन करावा लागत होता.

याचकाळात एक अशी घटना घडली जी जर्मनीच्या इतिहासात ‘मिरॅकल ऑफ बर्न ‘ या नावाने ओळखली जाते.

१९५४ च्या फुटबॉल वर्ल्ड कपचे आयोजन स्वित्झर्लंडमध्ये करण्यात आले होते. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळातली ही पहिलीच अशी जागतिक स्पर्धा होती की ज्यामध्ये जर्मनीचा सहभाग होता. १९५० च्या वर्ल्ड कपमध्ये जर्मनीच्या सहभागावर देखील बंदी घातली गेली होती. १९५० चा जर्मनी आतासारखा एकसंध नव्हता त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये भाग घेतलेली टिम जर्मनीची नसून “पश्चिम जर्मनीची” होती.

या टिमकडून वर्ल्ड कप जिंकण्याची अपेक्षा कोणालाही नव्हती.  जवळपास १० वर्षानंतर एवढ्या मोठ्या स्पर्धेत आपण सहभागी होतोय हिच गोष्ट जर्मन टिमसाठी महत्वाची होती. परंतू जर्मनी या स्पर्धेतील सर्वात मोठी अंडरडॉग टिम ठरली. वर्ल्ड कपची पात्रता फेरी कशीबशी पार करणाऱ्या या टिमने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत वर्ल्ड कप जिंकला. तोही बलाढ्य हंगेरीला हरवून.

puscas
फेरेंस पुस्कास

फेरेंस पुस्कासच्या हंगेरी टिमचा याकाळात प्रचंड दबदबा होता. हा तोच खेळाडू आहे ज्याच्या नावाने आज फुटबॉलमधील सर्वोत्कृष्ट गोलसाठीचा ‘पुस्कास अवॉर्ड ‘ दिला जातो. जर्मनी विरुद्धची फायनल हरण्याआधी जवळपास ४ वर्षे ही टिम अजिंक्य होती. ‘गोल्डन टिम’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या संघाने ३० आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी एकही सामना  गमावलेला नव्हता. याउलट याच हंगेरीविरुद्ध  वर्ल्ड कपच्या साखळी सामन्यात जर्मनीचा ८ – ३ असा दारुण पराभव झालेला होता.

कदाचित यामुळेच असेल पण जर्मनी विरुद्धची ही फायनल हंगेरी सहज जिंकणार असाच सर्वांचा समज झाला होता. इतकंच काय तर हंगेरीच्या स्वित्झर्लंडमधील प्रतिनिधींनी मॅचनंतर खेळाडूंच्या स्वागताची संपूर्ण तयारी करून ठेवली होती.

रोमहर्षक आणि उत्कंठावर्धक अंतिम सामना.

german
विश्वविजेता जर्मन संघ

४ जुलै १९५४. स्वित्झर्लंडमधील बर्न येथे हंगेरी विरुद्ध पश्चिम जर्मनी ही फायनल मॅच.

मॅचची सुरुवात अपेक्षेप्रमाणेच झाली. सहाव्याच मिनिटाला पुस्कासने हंगेरीचा पहिला गोल केला तर आठव्या मिनिटाला हंगेरीने जर्मनीवर २-० अशी आघाडी घेतली. तरीदेखील मैदानावरच्या जर्मन फॅन्सनी अपेक्षा सोडल्या नव्हत्या. जर्मन खेळाडूंनी देखील आपल्या पाठीराख्यांना निराश केलं नाही.

१८ व्या मिनिटापर्यंत दोन गोल करून जर्मनीने २ – २ अशी बरोबरी केली.

आता हंगेरीवरचं दडपण स्पष्ट दिसायला लागलं होतं. त्यांचा अटॅक वाढला असला तरी गोल करायला अपयश येत होतं. मॅच संपायला फक्त सहा मिनिटे बाकी असताना जर्मनीला हंगेरीचा डिफेन्स तोडण्यात यश आलं. या मॅचनंतर जर्मनीचा ‘नॅशनल हिरो’ म्हणून समोर आलेल्या राहणने जर्मनीकडून तिसरा आणि मॅचमधील वैयक्तिक दुसरा गोल केला.

अवघ्या दोनच मिनिटात पुस्कासने गोल करून पुन्हा एकदा बरोबरी साधली. जर्मनीच्या तोंडातला विजयाचा घास हिरावला जातोय असं वाटायला लागलं असतानाच रेफरीने पुस्कासचा तिसरा गोल ऑफसाईड देऊन रद्द केला.

फायनल शिट्टी वाजली आणि संपूर्ण मैदान एका अशक्य घटनेचं साक्षीदार बनून गेलं. दहा वर्षे फुटबॉलपासून अलिप्त राहिलेल्या जर्मनीच्या संघाने आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट संघाला हरवून वर्ल्ड कप जिंकला होता. बर्नमध्ये खरोखरच एक चमत्कार घडला होता.

जर्मनीसाठी हा विश्वविजय एवढा महत्वाचा का..?

त्यानंतर जर्मनीच्या संघाने १९७४, १९९० आणि अलीकडेच २०१४ चा फुटबॉल वर्ल्ड कप जिंकला.

असं असूनही १९५४ च अजिंक्यपद जर्मन लोकांसाठी अजून देखील खास आहे. कारण याच मॅचनंतर जर्मन लोक जगाला अभिमानाने आपली ‘जर्मन ओळख’ सांगू लागले.

गेल्या २० वर्षातील ही पहिली अशी घटना होती की ज्यामध्ये कोठेही नाझी सैन्याचा हस्तक्षेप नव्हता. या विजयाच्या जल्लोषामध्ये ते इतर जगाला समाविष्ट करून घेऊ शकत होते. हिटलर, नाझी सैन्य आणि युद्ध सोडून पहिल्यांदाच परदेशी माध्यमे जर्मनी विषयीच्या कुठल्यातरी सकारात्मक घटनेबद्दल बोलत होते.

हिटलरच्या अस्तानंतर बंदी घालण्यात आलेलं जर्मन राष्ट्रगीत चक्क आंतरराष्ट्रीय पातळीवर जर्मन लोकांकडून निर्भीडपणे  गायलं जात होतं, ज्याला स्वित्झर्लंडचं बँड पथक उत्साहाने साथ देत होतं. जर्मन रेडिओवर पूर्व किंवा पश्चिम नाही तर फक्त “जर्मनी” जिंकली अशी बातमी सांगितली जात होती.

जगावर दुसरं महायुद्ध लादणारा देश ही ओळख पुसली जाऊन आपली दुसरीही ओळख निर्माण होऊ शकते हा आत्मविश्वास या विश्वविजयाने जर्मन जनतेला दिला होता.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.