सोलापूरला भुकंपाचे धक्के…!!! कोयनानगर, किल्लारी आत्ता सोलापूर यामागची कारणं काय..

आज सकाळी सोलापूर आणि आसपासच्या जिह्यात ४.६ रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला. या भूकंपाचं केंद्रबिंदू कर्नाटकातील विजापूर शहराच्या जवळ असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राने दिलीय. मात्र या भूकंपामुळे सोलापूर जिल्ह्यात जाणवलेले भूकंपाचे धक्के हे ६५० लाख वर्षांपूर्वीच्या ज्वालामुखीच्या कारणामुळेच बसले आहेत.    

आता आपल्या मनात प्रश्न पडला असेल कि आमच्या भूगोलाच्या मास्तरने दक्खनचा पठार भूकंप अवरोधी असल्याचं शिकवलं होतं ते सगळं खोटं होतं होय. तर नाही

तर यात गडबड अशी आहे..

आपण ज्या दक्खनच्या पठारावर आहोत तो बेसॉल्ट दगडाचा बनलाय खरा परंतु, दक्खनचा पठार तयार होण्यापुर्वी त्याजागी क्रॅटॉन ही जुनी प्लेट होती. त्या प्लेटवर ज्वालामुखीच्या उद्रेकाने दक्खनच्या पठाराची निर्मिती झालीय.

हा नव्याने तयार झालेला दक्खनचा पठार स्थिर असला तरी क्रॅटॉनची प्लेट मात्र स्थिर नाही. म्हणून या क्रॅटॉनमध्ये हालचाली झाल्या कि दक्खनच्या पठारावर भूकंप येतात. 

आता हा क्रॅटॉन कसा असतो. तर दक्खन पठाराच्या दक्षिणेला तमिळनाडू, केरळ, कर्नाटकच्या काही भागासह आंध्र प्रदेशाचा जो दगड आढळतो तोच दगड म्हणजे क्रॅटॉनचा दगड होय. आपण शोले पिक्चरमध्ये पाहिलेला गब्बर ज्या दगडांमध्ये राहायचा ना ते याच क्रॅटॉनचे ग्रॅनाइट दगड आहेत.

दक्खनच्या पठाराखाली असलेल्या क्रॅटॉनच्या दोन प्लेटचं एकमेकींवर घर्षण झालं कि त्या हालचालींमुळे पठारावर भूकंप येतो. 

परंतु मजबूत आणि जाड असलेल्या या दक्खन पठारात काही फॉल्ट सुद्धा आहेत..

दक्खनच्या पठाराची निर्मिती होतांना त्यात काही फॉल्ट सुद्धा तयार झाले होते. याच फॉल्ट्समुळे दक्खनच्या पठारा खालील क्रॅटॉन प्लेटमध्ये काही हालचाल झाल्यास पठारावर भूकंप येतात. या मध्ये मराठवाड्यातील कुर्डुवाडी फॉल्ट आणि कोयना धरणाजवळ असलेलं डोनाचीवाडी फॉल्ट हे यातले प्रमुख फॉल्ट आहेत. 

याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी बोल भिडूने डॉ. आशिष डोंगरे यांच्याशी संपर्क साधला.. 

याबद्दल बोलतांना डॉ. आशिष डोंगरे सांगतात कि..

दक्खनच्या पठारावर स्वतः भूकंप येत नाहीत. दक्खनच्या पठाराखाली असलेल्या क्रॅटॉनमध्ये मुव्हमेंट झाली कि दक्खनच्या पठारावर भूकंप येतात. मात्र दक्खन पठारावर भूकंप येत असले तरी पठाराची जाडी जास्त असल्याने इथे भूकंपाचे प्रमाण कमी आहे. भूकंपामुळे होणारी हानी सुद्धा कमी आहे.” असं ते सांगतात..

याबद्दल अधिक माहिती देतांना ते म्हणाले कि, “या भूकंपाचा आणि यांमागे असलेल्या कारणांचा अभ्यास करण्यासाठी भारत सरकारच्या बोअरहोल जिओग्रॉफिसिस रिसर्च लॅबोरॉटरीची स्थापना करण्यात आली आहे. सध्या यावर संशोधन चालू असल्यामुळे भविष्यात याबद्दल आणखी पक्की माहिती मिळेल.”  

दक्खनचा पठार भूकंप निरोधक असला तरी याला भूकंपाचा इतिहास राहिला आहे.

नाशिक ते पंढरपूर इतक्या विस्तीर्ण प्रदेशावर भूकंप आलाय..

१७६४ साली धोम, वाई, कराडच्या भागात भूकंप झाला होता. या भूकंपाचे धक्के नाशिक, पैठण, पंढरपूर ते मुक्केरी इतक्या विस्तीर्ण प्रदेशाला बसले होते. तसेच २३ फेब्रुवारी १८१२ मध्ये पुण्याला सुद्धा भूकंपाचे धक्के बसले असल्याचे निवृत्त सरकारी इंजिनियर दिपक मोडक सांगतात.

त्यांनतर सप्टेंबर १९६७ मध्ये कोयना धरणाजवळ आलेला मोठा भूकंप आणि सप्टेंबर १९९३ मध्ये आलेला किल्लारी भूकंप तर आपल्याला माहीतच आहे. यावरून हिमालयीन पर्वतरांगांप्रमाणे दक्खनच्या पठारावर वारंवार भूकंप आलेले नसले तरी मात्र याआधीही भूकंप आले असल्याची नोंद आहे.

ज्वालामुखीच्या उद्रेकाने दक्खनच्या निब्बर बेसाल्ट पठाराची निर्मिती झाली परंतु त्याखाली असलेल्या अस्थिर क्रॅटॉन प्लेटमुळे आणि पठारावर असलेल्या फॉल्टमुळे आजही दक्खनच्या पठाराला भूकंपाचे धक्के बसत असतात.. 

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.