लाल चिखलाचा ‘ला टोमॅटिना’ झाला असता तर भारताचा ‘इंडिया’ झाला असता काय ?

शाळेत असताना ‘लाल चिखल’ हा भास्कर चंदनशिव यांचा धडा वाचला असेलच. बाजारात टोमॅटो विकायला घेऊन आलेला शेतकरी बाप शहरातल्या अति शहाण्यांनी दर पाडून मागिल्यामुळे वैतागलेला असतो.

घाम आणि रक्त शिंपून  काढलेल्या टोमॅटोच्या पिकाला ज्यावेळी एक गिऱ्हाईक चार आन्याला किलो हा भाव मागतं त्यावेळी आबाच्या सहनशक्तीचा कडेलोट होतो आणि टोमॅटोच्या डाली रस्त्यावर ओतून आबा दोन्ही हातानी बोंबलत तो त्यावर नाचू लागतो.

आजही तो धडा आठवला तरी अंगावर काटा उभा राहतो. आबाचा लाल चिखल डोळ्यापुढून हालत नाही.

tomato
नोटबंदीनंतरच्या काळात छत्तीसगडमधील शेतकऱ्यांनी आपल्या टोमॅटोवरून ट्रॅक्टर चालवला होता

अनेकदा दर न मिळाल्यामुळे शेतकऱ्याला पिक काढण्यासाठी घातलेले पैसे सुद्धा परत मिळत नाहीत. शिल्लक राहिलेला माल बाजारातून घरी परत नेणे म्हणजे गाडी भाड्याचा डबल भुर्दंड अंगावर येतो. त्यामुळे नाईलाजाने शेतकरी आपला माल तसाच सोडून जातो. त्यामुळे लाल चिखलासारखे प्रसंग बऱ्याचवेळा बाजारात बघायला मिळतात.

असाच लाल चिखल स्पेनमध्ये असतो. मात्र या पाठीमागे शेतकऱ्यांचे अश्रू नसतात तर तो लाल चिखल शेतकऱ्यांना ४ अधिकचे पैसे मिळवून देणारा असतो. स्पेनमधल्या ‘बुण्योल’ या शहरातल्या ‘ला टोमॅटीना’ या उत्सवाचा हा लाल चिखल. गेली ऐंशी वर्षे स्पेनमध्ये हा उत्सव साजरा केला जातो. आपल्यापैकी बहुतेकांनी ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटातून ह्रितिक आणि कतरिना यांना टोमॅटोच्या या उत्सवात रंगलेलं बघीतलेलं असेलच.

कशी झाली उत्सवाची सुरुवात..?

‘ला टोमॅटीना’ हा कोणत्याही धर्माशी संबंधित नसणारा उत्सव. दर वर्षी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या बुधवारी साजरा केल्या जाणाऱ्या या उत्सवात एकमेकांना टोमॅटो मारून धुळवड खेळली जाते. या उत्सवाच्या सुरु होण्यामागे देखील एक मज्जेशीर किस्सा आहे.

१९४५ साली बुण्योलमध्ये एक परेड आयोजित करण्यात आली होती. या परेडमध्ये काही मुलांमध्ये निर्माण झालेल्या वादामुळे एकंच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. या गोंधळामध्ये भाजीपाल्याच्या गाड्यावरच्या भाज्या एकमेकांना फेकून मारण्यात आल्या होत्या.

पोलिसांनी हस्तक्षेप करून शेवटी ही छोटी दंगल आवरली, मात्र गोंधळ घालणाऱ्या मुलांना यात खूप मज्जा आली. या घटनेनंतरच्या पुढच्या वर्षी त्या मुलांनी घरून टोमॅटो आणले आणि एकमेकांवर फेकायला सुरवात केली. पुढे हीच परंपरा होत गेली आणि त्यातून ‘ला टोमॅटीना’चा जन्म झाला.

la tometina
स्पेनमधील ‘ला टोमेटीना’ दरम्यानचे एक दृश्य

स्पेनच्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी हा प्रकार उचलून धरला. शेतकऱ्यांनी हा प्रकार उचलून धरण्यामागे साधं लॉजिक होतं, ते म्हणजे दरवर्षी या उत्सवाच्या निमित्ताने लाखो किलो टोमॅटोची विक्री होऊ लागली होती. यावर्षीच्या २९ ऑगस्टला झालेल्या ‘ला टोमॅटीना’मध्ये जवळपास ४० हजार लोक सहभागी झाले होते. अनेक देशोदेशीचे पर्यटक खास या उत्सवासाठी स्पेनला आले होते.

कसा भरवला जातो हा उत्सव..? 

सिक्युरिटीच्या देखरेखीखाली नियम पाळून हे ‘फ्रेंडली युद्ध’ खेळले जाते. उत्सवाची सुरुवात एका  सायरनने होते. सायरन वाजला की स्क्वाश केलेले टोमॅटो एकमेकांना फेकून मारले जातात. आजूबाजूच्या परिसरात टोमॅटोच्या नद्या वाहतात. स्त्री-पुरुष आणि अबालवृद्ध अतिशय उत्साहाने या उत्सवात सहभागी होतात.  दुसरा सायरन वाजेपर्यंत हा खेळ चालू राहतो. त्यानंतर फेस्टिवल थांबवुन अग्निशामक दलाच्या मोठ्या मोठ्या टँकर्सच्या मदतीने सर्व परिसर स्वच्छ केला जातो.

२००२ पासून या उत्सवाला “फेस्टिविटी ऑफ इंटरनॅशनल टूरिस्ट” हा दर्जा मिळाला आहे. आपल्याकडे जसा होळी, रंगपंचमी तसाच  स्पेनमध्ये ‘ला टोमॅटीना’ साजरा होतो. या उत्सवाची सुरुवात जरी एका दंगलीमधून झाली असली तरी आता मैत्री,बंधुत्व यांचे महत्व सांगणारा खेळ म्हणून जगभर या उत्सवाला ख्याती प्राप्त झाली आहे.

धर्माचा बाजार मांडणाऱ्यांना या उत्सवापासून दूरच ठेवले जाते. जगभरात अनेक देशामध्ये जादा उत्पादन झालेल्या टोमॅटोची विल्हेवाट लावून शेतकऱ्यांना जास्तीचे ४ पैसे पदरात पडावेत म्हणून हा उत्सव आयोजित करण्यात येत आहे. याच धरतीवर इटलीमध्ये संत्र्यांचा उत्सव देखील सुरु करण्यात आलाय.

भारतातही काही वर्षापूर्वी बेंगलोरमध्ये टोमॅटीनाचे आयोजन करण्यात आलं होतं. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री सदानंद गौडा यांनी “टोमॅटोची नासाडी होऊ देणार नाही” अशी भूमिका घेत त्यावर बंदी आणली होती. पण अशा मुख्यमंत्र्यांना दर नाही म्हणून होणारा लाल चिखल दिसला नसेल का ? तो दिसला असता तर शेतकऱ्याच्याच टॉमेटोला चार पैशाचा दर मिळाला असता की.

 

Leave A Reply

Your email address will not be published.