डोनाल्ड ट्रंप यांच्या यात्रेत हरवलेल्या जुळ्या बहिणीला भेटलात का..?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे नेहमीच कुठल्या ना कुठल्या अतरंगी कारनाम्यासाठी चर्चेत असतात. कधी ते महिलांविषयक वादग्रस्त विधाने करतात तर कधी महिलांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडतात. गेल्या काही दिवसात ते जरा शांत आहेत, असं वाटत असतानाच आता ते सोशल मिडीयावर परत धुमाकूळ घालताहेत. विशेष म्हणजे यावेळी देखील एक महिलाच आहे, जिच्यामुळे ट्रंप सोशल मिडीयावर ट्रेंड करताहेत. बरं ही महिला काही त्यांच्या अमेरिकेतील नसून दुरदेशीच्या स्पेनमधली. त्यातली त्यात बरी गोष्ट एवढीच की यावेळी ते कुठल्याही वादात अडकलेले नाहीत, तर एका गमतीशीर कारणामुळे ट्रंप चर्चेत आले आहेत.

डॉलोरेस लेईस अंटेलो या महिलेमुळे डोनाल्ड ट्रंप सध्या सोशल मिडीयावर चर्चेत आहेत. त्या स्पेनमध्ये राहतात आणि बटाट्याची शेती करतात. स्पेनमधील ‘ला वोज दे गॅलिशिया’ (La Voz de Galicia) या स्थानिक वृत्तपत्राने त्यांच्यावर एक छोटासा लेख छापला ज्यात त्यांच्या शेतीतील साध्या अन सरळ  जीवनशैलीची माहिती देण्यात आली. लेखानिमित्त त्यांना भेटायला गेलेल्या पत्रकाराने डॉलोरेस यांचा शेतात काम करतानाचा, हातात फावडं असणारा फोटो इंस्टाग्रामवर अपलोड केला आणि क्षणार्धात तो व्हायरल व्हायला लागला.

amazing Belgium
Twitter

हा फोटो इंस्टाग्रामवर अपलोड झाल्यानंतर त्या एका रात्रीतच प्रसिद्ध झाल्या आहेत. अनेकांना त्यांच्यामध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांचं दर्शन झालं. लोक मोठ्या प्रमाणात हा फोटो शेअर करू लागले. काही जणांना त्या ट्रंप यांच्या यात्रेत चुकलेल्या जुळ्या बहिण वाटल्या, ज्या स्पेनमध्ये सापडल्यात  तर काहींना अमेरिकेच्या परराष्ट्र धोरण आणि आंतरराष्ट्रीय राजकारण यांवर डॉलोरेस यांना नेमकं काय वाटत, हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. त्यांना मात्र आपल्या शेतीशिवाय दुसऱ्या कुठल्याही गोष्टीत कसलाच इंटरेस्ट नाहीये.

डॉलोरेस लेईस अंटेलो एका रात्रीत सोशल मिडीयावर प्रसिद्ध झाल्या असल्या तरी त्या स्वतः मात्र मोबाईल फोन वापरत नाहीत. मोबाईल फोनच वापरत नसल्याने ऑनलाईन जगात नेमकं काय चाललंय, याविषयी आपल्याला फार काही माहित नाही. मात्र हा फोटो व्हायरल होत असल्याचं आपल्या मुलींकडून समजलं असल्याचं त्यांनी ‘ला वोज दे गॅलिशिया’शी बोलताना सांगितलं. केसांच्या रंगामुळे हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असावा असं देखील त्या म्हणाल्या.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.