भिडूंनो, उस्मानाबादी मटण म्हणलं की नुसतं तुटून पडायचं!

महाराष्ट्र जसा ऐतिहासिक आणि नैसर्गिक संपदेने संपन्न आहे तसंच महाराष्ट्र खाद्य संस्कृतीने देखील संपन्न आहे. खाण्याच्या अनेक पदार्थांमध्ये जसा पिकांचा समावेश होतो तसाच प्राण्यांचा देखील समावेश होतो. कारण जसे शाकाहारी लोक असतात तसेच मांसाहारी लोकही बरेच खाण्याचे शौकीन असतात. तेही ‘मी माझ्या आवडतीचे चमचमीत पदार्थ हमखास खातो’ असं म्हणतातच. म्हणून तर त्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देऊन खाद्यान्न व्यवसाय आपली उपजीविका चालवतो.

आता बघा, जर तुम्ही कोणत्याही नॉनव्हेज लव्हरकडे गेलात आणि विचारलत की ‘तुझ्या आवडतीचे आयटम सांग”. तर तो नक्कीच दोन-तीन चिकन, मटणाचे पदार्थ सांगेलच. आणि त्यातही जर तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल आणि तुमच्यात मटणाचा विषय निघाला तर ‘उस्मानाबादी बोकड’ ही पहिली पसंती असल्याचं कित्यकांचं उत्तर येणारच.

त्यांचं काय आपल्याच एका भिडूचं सांगतो. आपला एक भिडू मटणाचा लय चाहता. स्टोरी करताना त्याला सहज विचारलं, “काय रं, उस्मानाबादी मटणाबद्दल काय सांगशील?” आणि चटकन त्यांचं उत्तर आलं, “एकंच भावना आहे भाई, उस्मानाबादी मटण म्हणजे तुटून पडायचं!”

यावरून तुम्हालाही या मटणाची थोरवी कळली असणारच आणि जर तुम्ही पण या मटणाचे चाहते असाल तर आपल्या भिडूच्या भावना पोहोचल्या असणारच. शिवाय जर तुम्ही अजूनही हे मटण खाल्लं नसेल तर “काय बाबा, काय प्रकार आहे हा बघावा लागेल” असं म्हणत एकदा ट्राय करायचा विचार आलाच असेल.

अनेक शौकिनांचे लाड पुरवणारं बोकड म्हणजेच ‘उस्मानाबादी बोकड’. फक्त गावच नाही तर शहरांतही हे बोकड इतकं प्रचलित आहे आणि त्याला इतकी मागणी आहे की आता त्याचं नाव भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी देण्यात आलं आहे.  ही शेळीची जात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या महाराष्ट्राच्या भागात तर आढळतेच मात्र महाराष्ट्राबाहेर आंध्र प्रदेश, तेलंगाणा आणि कर्नाटकच्या लगतच्या भागातही आढळते. तर महाराष्ट्रात या शेळीच्या जातीचा प्रसार प्रामुख्याने लातूर, उस्मानाबाद, अहमदनगर, परभणी आणि सोलापूर जिल्ह्यात झालाय. 

ही शेळीची जात मूळ महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील लातूर, तुळजापूर आणि उदगीर तालुक्यातील आहे. तर या जातीचे नाव जिथून त्याचा उगम झाला त्या मूळ ठिकाणावरून पडलं आहे, म्हणजेच उस्मानाबाद.

नेमकं काय खासियत आहे या बोकडाची?

मटणासाठी प्रसिद्ध असलेली उस्मानाबादी शेळीची जात अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे दुधासाठी.  मात्र ही जात मुख्यतः मांस उत्पादनासाठी वाढवली जाते, याचं कारण म्हणजे उत्कृष्ट दर्जाचं मांस. उस्मानाबादी शेळ्या आकाराने मध्यम ते मोठ्या असतात. त्यांचा रंग वेगवेगळा असतो पण बऱ्याच वेळा बोकडाचा रंग काळा असतो. त्यांचे सुंदर असे लांबसडक पाय असतात ज्याने ते ग्राहकांना आकर्षित करतात.

शिवाय अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांचं वजन. बोकडाचं सरासरी वजन सुमारे ३२ ते ३६ किलो असतं. तर सरासरी लांबी सुमारे ६८ सेंटीमीटर आणि छातीचा घेर साधारण सेंटीमीटर असतो. अशा प्रकारे जास्त मांस मिळणार म्हणून लोकं यांना पहिली पसंती देतात. शिवाय एकदा लसीकरण केलं की ही जात रोगांविरुद्ध उच्च प्रतिकार शक्ती दाखवते ज्यामुळे निरोगी मटणाची गॅरंटी असते.

बघूनच तोंडाला पाणी सोडणाऱ्या, रसरशीत रस्याला बघून “बस्स! अब रहा नहीं जाता” वाल्या भावना देणाऱ्या, तोंडात मटणाचा पीस टाकताच ‘आयुष्यात अजून काय हवं’ असे उद्गार काढण्यास भाग पडणाऱ्या, प्रत्येक घासात ‘स्वर्गसुख’ देणाऱ्या आणि पोट भरल्यावरही बोटं चाटून चाटून खाणाऱ्या, अगदी हातावर आलेले रस्स्याचे ओघळ वरपणाऱ्या,  शिवाय “अजून थोडं खाता आलं असतं तर!” असं मनात आपोआप आणणाऱ्या या उस्मानाबादी मटणाची मज्जाच ‘काही और’ आहे बॉस!     

भारतातील नोंदणीकृत शेळ्यांच्या जातींपैकी उस्मानाबादी शेळीला त्यांच्या चांगल्या दर्जाच्या मांसासाठी बाजारात मोठी मागणी आहेच मात्र मांसाव्यतिरिक्त, ही जात उच्च दर्जाची त्वचा देखील तयार करते आणि यालाही बाजारात मोठी मागणी आहे. 

या जातीच्या बोकडाच्या मटणाला जशी मागणी आहे तशीच मादी शेळीच्या दुधालाही प्रचंड मागणी आहे. कारण मादी शेळी ४ महिन्यांच्या स्तनपान कालावधीत सरासरी १ ते दीड लिटर दूध देते. तर या शेळ्या बहुतेक वेळा वर्षातून दोनदा प्रजनन करतात. इतकंच नाही तर जुळे आणि तिळे होणं ही तर कॉमन गोष्ट आहे. 

उस्मानाबादी शेळीला शेतकऱ्यांची पहिली पसंती देखील मानलं जातं.

कारण ते कमी वेळेत जास्त नफा मिळवून देतं तेही आहार आणि काळजी घेण्यासाठी जास्त खर्च न करता. ही जात भारतातील कोणत्याही राज्याच्या हवामान परिस्थितीशी म्हणजेच थंड, अति उष्ण किंवा दमट अशा सगळ्या वातावरणाशी सहज जुळवून घेते. तर त्यांची प्रजनन क्षमता देखील जास्त आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय डॉक्टरांकडूनही व्यावसायिक शेळीपालन व्यवसायासाठी उस्मानाबादी शेळीची शिफारस केली जाते.

मटणासाठी प्रसिद्ध असणाऱ्या बोकडांना नेहमीच जास्त मागणी असते, म्हणून त्याची किंमत प्रति शेळी ४५०० ते ६००० रुपये असू शकते, तर मादी शेळ्यांची किंमत ३५०० ते ४५०० रुपये प्रति शेळी असू शकते. म्हणजेच काय फक्त उस्मानाबादी बोकडच नाही तर मादी शेळ्यांचीही लय हवा आहे. 

याच सगळ्या गोष्टींचा विचार करून देशभरात उस्मानाबादी बोकडाची हवा करण्यासाठी यंदा जीआय टॅगसाठी या उस्मानाबादी शेळीच्या जातीचं नाव देण्यात आलं आहे. देशासह विदेशातील निर्यातीच्या संधी, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रँड विकसित मदत करण्यासाठी आणि उत्पादकाला अधिकचं आर्थिक उत्पन्न मिळण्यास हातभार लागावा म्हणून राज्यातून भौगोलिक मानांकनासाठी या जातीचं नाव देण्यात आलं आहे. तेव्हा आता प्रतिसाद काय मिळतो हे बघणं गरजेचं आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.