बोल्हाई मटण काय असते, या प्रथेमागे कोणती कारणे आहेत..?

बोल्हाई मटण माहिती नाही असा माणूस असू शकतो का?

तर भिडूनों आपलं पुणे म्हणजे जग असतं अस नसतं. पुणे जिल्हा आणि आजूबाजूचा भाग सोडलां तर आईशप्पथ लोकांना बोल्हाई मटण नावाची भानगड माहिती नाही. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातले लोक जेव्हा पुण्यात येतात तेव्हा त्यांना हॉटेलात बोल्हाई मिळेल अशी पाटी दिसते. मग ते चौकशी करतात आणि समजतं ही वेगळी भानगड आहे.

आमच्या अशाच विदर्भातल्या भिडूने थेट फोन करुन विचारलं,

अरे ते बोल्हाई काय असतं?

पहिला आम्हाला पण आश्चर्य वाटलं, नंतर पुण्याच्या बाहेरील लोकांना विचारलं तर कमी अधिक फरकानं लोकांना माहिती होतं. विशेष म्हणजे पुण्यातल्याच लोकांना “बोल्हाई” बद्दल विशेष माहिती नव्हतं.

तर बोल्हाई म्हणजे मेंढींच मटण. सर्वसाधारण महाराष्ट्रात बोकड कापलं जातं. पण ज्यांना बोल्हाई असते ते लोकं बोकड खात नाहीत. त्यांना मेंढीचं मटण खातात. बोकडाच मटण न खाण्यामागे ते सांगतात कि त्यांना बोल्हाई आहे.

बोल्हाई हे पुणे परिसरातली जागृत देवी. बोल्हाईमातेच प्रसिद्ध मंदिर पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई गावात आहे. ही देवी ज्यांना असते त्यांना बोकडाचे मटण चालत नाही.

फक्त बोकडाचे मटण चालत नाही इतक्यावर हा विषय संपत नाही तर बोकडाचे मटण ज्या भांड्यात केले असेल अशी भांडी देखील सदरच्या व्यक्ती वापरत नाहीत. एखाद्या हॉटेलमध्ये बोकडाचे मटण आणि मेंढींचे मटण एकत्रित मिळत असेल तर अशा हॉटेलमध्ये देखील या व्यक्ती जात नाहीत. थोडक्यात काय तर बोकडाचे मटण हा विषय फक्त न खाण्यापुरता मर्यादित नसतो तर अगदी शिवाशिव सारखा प्रकार बोकडाच्या मटणाबद्दल पाळण्यात येतो.

खाली दिलेल्या नकाशात बोल्हाई टाकल्यानंतर किती गोष्टी येतात तुम्ही पाहू शकतात.

पुण्याच्या आसपासच्या परिसरात पुणे शहरात बोल्हाई मातेच्या नावावरून अनेक दुकाने आहेत. आपल्या घराला देवीचे नाव देण्यात आले आहे. एक अंदाज म्हणून हा नकाशा देत आहोत. कारण त्यातून कोणकोणत्या भागातील लोकांना बोल्हाई देवी आहे हे समजून जाईल.

 

आत्ता बोल्हाईदेवी मातेबद्दलची माहिती.

बोल्हाईदेवीचे प्रसिद्ध स्थान वाडेबोल्हाई येथे आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेले भक्तगण इथे दर्शनासाठी येत असतात. मंदिराच्या आवारात पांडवकालीन तळे असून यात हात पाय धुतल्यानंतर त्वचेचे विकार बरे होतात अशी श्रद्धा आहे. चुकून एखाद्याने बोकडाचे मटण खाल्ले तर त्याला हातापायावर चट्टे उठतात. त्याने या पाण्याने हात पाय धुतल्यानंतर मनोभावे माफी मागितल्यानंतरच हे चट्टे दूर होता अशी देखील श्रद्धा आहे.

अश्विन महिन्याच्या रविवारी देवीची यात्रा भरते. बोल्हाई पार्वतीचा अवतार समजली जाते त्यामुळे देवीला बोकड कापले जात नाही. या कारणानेच भक्तगणांना देखील बोकडाचे मटण निषिद्ध असते. इथले मंदिर पांडवकालीन आहे. बोल्हाई देवीचा ओलांडा हा प्रकार इथे असतो. यामध्ये रविवारी मुख्य मंदिरापासून बोल्हाई देवीचे माहेरघर असणाऱ्या डोंदरावरील मंदीराकडे वाजत गाजत पुजारी जातात. त्यावेळी आरती घेवून पुजाऱ्याने आपणाला ओलांडून जावे अशी प्रथा असते. दोन्ही बाजूने रस्त्यावर भाविक लोटांगण घालतात व पुजारी त्यांना ओलांडून जातात. त्याला देवीचा ओलांडा म्हणण्यात येते.

आत्ता ही झाली देवीची माहिती. मुख्य मुद्दा राहतो तो या प्रथेमागच्या कारणांचा. 

देवीला बोकडाचे मटण चालत नाही. त्यामुळे भक्तगण देखील बोकडाचे मटण वर्ज्य मानतात. ही प्रथा नेमकी कशी आली असेल याबाबत आम्ही वेगवेगळ्या लोकांना बोलतं केलं. ज्यांना देवी आहे अशी व्यक्तींसह ज्यांना देवी नाही अशा व्यक्तींपर्यन्त प्रत्येकाच म्हणणं हेच होतं की ती प्रथा आहे आणि आम्ही पाळतो. एखाद्या दूसऱ्या व्यक्तीने बोकडाचे मटण खाल्यानंतर त्यांच्या अंगावर उटलेल्या चट्यांबद्दल देखील सांगितलं. काही जणांनी प्रयोग म्हणून बोकडाचे मटण खाल्ले पण चट्टे उठल्यानंतर देवीचा प्रकोप समजला आणि माफी मागितल्याची कबूली दिली.

म्हणून हा विषय काही अभ्यासू लोकांना विचारला.

बरेच प्राध्यापक, जेष्ठ पत्रकार अशा लोकांना विचारल्यानंतर त्यांनी दोन शक्यता व्यक्त केल्या एक म्हणजे भौगोलिक परिसराचा अभ्यास करता पुर्वीच्या काळी इथे मेंढ्याचे प्रमाण जास्त असावे. तुलनेत शेळ्या कमी असाव्यात. शेळी ही गरिबाची गाय समजली जाते. हा परिसर मुख्यत: डोंगराळ आहे. इथे शेळी वाचली तर एखाद्या गरिबाच्या संसाराचा गाडा हाकला जावू शकतो. अनेक प्रथा परंपरांचा संबध हा मानवाच्या जिवनातून जन्माला येतो. त्या काळची गरज म्हणून ही प्रथा समोर आली असावी अशी शक्यता मांडली जाते. पण हा फक्त अंदाज आहे.

दूसरी शक्यता अशी देखील सांगण्यात येते की,

प्रत्येक भौगौलिक क्षेत्रात अनुवंशिक जीन्स तयार होतात. त्या त्या भागामुळे त्या त्या भागातील, परिसरातील व्यक्तींना एखाद्या गोष्टीची अलर्जी असू शकते. तिथल्या वातावरणामुळे सर्वच लोकांच्या जिन्समध्ये असे बदल घडून येतात. बोकडाचे मटण खाण्यामुळे या परिसरातील लोकांच्या अंगावर चट्टे उटतात त्यामागे देखील असेच कारण असावे. पण ही देखील शक्यताच झाली. याचे ठोस कारण मात्र आम्हाला कुणाकडूनही मिळाले नाही.

हे ही वाच भिडू. 

2 Comments
  1. जनक कदम पाटील says

    पुणेकरांनी सगळे जगाचे ज्ञान आपल्यालाच असल्याचा आव थोडा कमी करावा….. महाराष्ट्रात इतर ठिकानि पण बोल्हाईचे मटन काय आहे हे माहीत आहे…तुळजापूरला या म्हणजे समजेल…..
    आम्हीच जास्त सुजाण आणि अभ्यासू असल्याचा घमंड पुणेकरांचा कधी जाणार कुणास ठाऊक.. ही कोंमेंट वाचून किती जणांच्या बुडाला मिरची झोंबणारा आहे ते कळलेच…????????

  2. Vikas waje says

    आमचे गाव पुसाणे ता.मावळ जि.पुणे असुन बोल्हाई मातेचे आम्ही परंपरागत मानकरी आहोत आमच्या गावामध्ये शेळी किंवा बोकड खाणे दुर आम्ही पाळत सुध्दा नाही

Leave A Reply

Your email address will not be published.