शेतकऱ्यांच्या ज्वारीला भाव मिळावा म्हणून या नेत्यांनी शिखर बँकेला देखील झुकवलं होतं

महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने कुणी शेतकऱ्यांचा नेता होता तर ते म्हणजे… दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक !

लोकशाही व्यवस्थेच्या केंद्रस्थानी हा शेतकरीच असावा असं त्यांना मनोमन वाटत असे. “कारखानदार जसा कारखान्यातील माल मेहनताना, भांडवलावरील व्याज आणि नफा लावून उत्पादित मालाचा भाव जसा सांगतो. तसा शेतकऱ्याला सांगता आला पाहिजे. सर्व प्रक्रिया उद्योग शेतकऱ्याच्या मालकीचे असले पाहिजेत” असं ते कायमच म्हणत असायचे. 

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा ते आवर्जून सांगत, “जगात क्रांतीचा रंग लाल मानतात, परंतु त्याची पूर्तता क्रांतीचा रंग हिरवा असल्याशिवाय होणार नाही.” 

जगामध्ये ज्या – ज्या वेळी असे दिसून आले त्या क्रांतिकारक नेत्याच्या नंतरच्या पिढीवर आपल्या नेत्याचे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी येऊन पडली. म्हणून नाईकसाहेबांनी कृषिखात्याची प्रशासकीय पुनर्रचना करण्याचं ठरवलं. 

आपल्या शेतात विक्रमी धान्य उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतामध्ये विविध प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना, कृषिपंडितांना, शेतीनिष्ठ, शेतीभूषण अशा सन्मानदर्शक पदव्या देऊन त्यांचा गौरव आणि प्रतिष्ठा उंचावण्याचे उपक्रम शासकीय माध्यमातून त्यांनी अस्तित्वात आणले. 

‘बंजारा’ या भटक्या समाजात जन्माला आलेल्या नाईकसाहेबांनी बदलत्या काळाची चाहूल ध्यानात घेऊन आपल्या समाजाला शेतीकडे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून पाहण्यास शिकविले.

पिढीजात शेतकरी कुंटुंबात जन्मलेले नाईकसाहेब शेती विषयाकडे आत्यंतिक जिव्हाळ्याने आणि आपुलकीने पाहत असत. राजकीय कर्तृत्वाच्या पायऱ्या चढत जात असतानाही आणि राजकारणाच्या व्यस्ततेतही त्यांची ही आवड कधी कमी झाली नाही.  शेतकऱ्यांच्या जीवनातील साऱ्या अडी अडचणीची, सुख-दुःखाची, न-पावसाच्या खेळीची त्यांना सूक्ष्म जाण होती.

आता वळूया मूळ मुद्द्यावर जेंव्हा शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी नाईकसाहेबांनी काय शक्कल लढवली होती.

नाईक साहेबांच्या पहिल्या मंत्रिमंडळात पी. के सावंत आणि यशवंतराव मोहिते हे कृषिखात्याचे मंत्री होते. ज्वारीचे मोठे उत्पादन झाल्यामुळे ज्वारीचे भाव पडू लागले होते. शेतकरी हवालदिल झाला होता. या घटनेने नाईकसाहेब अस्वस्थ झाले.

यशवंतराव मोहिते यांनी ज्वारी खरेदी करण्याची योजना त्यांच्यासमोर ठेवली. पणन महासंघाने आधारभूत किंमत देऊन ज्वारी खरेदी करावी अशी ती योजना होती. शेकऱ्यांची ज्वारी कमी दराने लेव्हीच्या रुपात धान्य खरेदी करून खरेदी केलेली ती ज्वारी गोरगरीबांना स्वस्त धान्य दुकानातून विकण्याची पद्धत रूढ होती. मोहिते साहेबांनी सूचविलेली योजना नेमकी याच्या विरुद्ध गेली.

त्याकाळी शासनाला आर्थिक शिस्त होती. शासन आर्थिक बाबतीत मोठे व्यवहारी होते. या योजनेमध्ये हा ज्वारी खरेदीचा व्यापार सहकार क्षेत्रामार्फत पणन महासंघाने करावयाचा व त्यासाठी सहकारातील शिखर बँकेने कर्ज द्यायचे, अशी कल्पना होती. नाईकसाहेबांनी अतिशय शांतपणे ही योजना समजावून घेतली. यात शेतकऱ्यांचे हित आहे हे पाहून त्यांना अतिशय आनंद झाला.

पण जरा का या योजनेत तोटा झाला तर शिखर बँक हा तोटा सहन करेल काय? किंवा ज्वारी खरेदीच्या पणन महासंघाच्या व्यवहाराला अर्थसहाय्य करेल काय? ही नाईकसाहेबांना शंका होती.

तेंव्हा शिखर बँकेचे अध्यक्ष सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ हे होते. त्यांच्याशी मोहिते साहेबांनी चर्चा करावी असे नाईकसाहेबांनी सुचविले. गाडगीळांशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनाही आनंद झाला. साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या व्यापाऱ्याच्या तावडीतून शेतकऱ्याची मुक्तता करण्यासाठी सहकार चळवळ आहे. पणन महासंघ आहे तेव्हा शेतकऱ्याला मदत केली पाहिजे हे धनंजयरावांनी मान्य केले. सुदैवाने या व्यवहारात तोटा आला नाही.

आणि सरकारने ज्वारी खरेदी केल्यामुळे ज्वारीचे भाव पडले नाही. हे सर्व नाईकसाहेबांच्या प्रोत्साहनाने आणि क्रियाशील सहकार्याने शक्य झाले. यशवंतराव मोहितेसाहेबांनी सूचविलेली वरील योजना नाईकसाहेबांना इतकी आवडली की, कृषी आणि सहकार या शेतकऱ्यांच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाच्या, जिव्हाळ्याच्या विषयावर त्यांच्याशी चर्चा करीत त्यांच्या कल्पनांचा विचारांचा आदर करीत. त्या कल्पना ते नीट समजावून घेत.

आणि त्यामुळेच शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी धान्य खरेदी करणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले राज्य ठरले.

हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.