सेहवागने लक्ष्मणला सांगितलं होतं, “तुम्हाला जमलं नाही पण भारताकडून पहिलं त्रिशतक मी मारणार”

२९ मार्च २००४.

हा तोच दिवस होता, ज्यावेळी ‘नजफगडचा नवाब’ ही उपाधी मिरवणाऱ्या विस्फोटक भारतीय बॅट्समन वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत मुलतानच्या मैदानावर ३०९ रन्सची घणाघाती इनिंग खेळून ‘मुलतानचा सुलतान’ ही एक नवीन उपाधी आपल्या नावावर जमा केली होती.

वीरेंद्र सेहवाग त्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा पहिला भारतीय ठरला होता. ३९ फोर आणि ६ सिक्सरच्या मदतीने ३७५ बॉल्समध्ये सेहवागने साकारलेली ही इनिंग इतकी घणाघाती होती की अजूनदेखील भारतीय क्रिकेटरसिक आणि पाकिस्तानचे बॉलर्स सुद्धा ही इनिंग विसरू शकलेले नाहीत.

सेहवागच्या या त्रिशतकाविषयीची रंजक माहिती त्याचा सहकारी आणि भारतीय क्रिकेटमधला व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मणच्या ‘281अँड बियॉड’ आत्मचरित्रातून समोर आलीये. लक्ष्मणने लिहिल्यानुसार सेहवागने लक्ष्मणला आधीच सांगितलं होतं की ‘मी भारताकडून त्रिशतक फटकावणारा पहिला खेळाडू ठरणार’

किस्सा आहे २००१ सालच्या ऑस्ट्रेलीयन संघाच्या भारताच्या दौऱ्यादरम्यानचा.

या दौऱ्यातला बंगळूरू येथे खेळवला गेलेला पहिला एकदिवसीय सामना भारताने ६० रन्सने जिंकला होता. ज्यात सेहवाग ५८ रन्स काढून ३ विकेट घेतना ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला होता. दुसरा मॅच पुण्यातील नेहरू स्टेडियमवर खेळवला जाणार होता. या मॅचपूर्वी लक्ष्मण, सेहवाग आणि झहीर खान एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते.

जेवणाच्या टेबलवर सेहवाग लक्ष्मणला म्हणाला,

“लक्ष्मण भाई, आपको कोलकाता टेस्ट में ट्रिपल सेंच्युरी मारणे का बडा अच्छा मौका मिला था. पर बतकिस्मती से आप उससे चुक गये. अब आप बस रुकिए और देखते रहिएगा. मैं टेस्ट क्रिकेट में ३०० बनाने वाला पेहला इंडियन बनूँगा”

लक्ष्मण लिहितो की खरं सांगायचं तर विरूचं हे बोलणं ऐकून त्याला धक्काच बसला होता. एक असा खेळाडू ज्याने तोपर्यंत फक्त ४ वन-डे मॅचेस खेळल्या होत्या आणि ज्याची कसोटी संघात निवड होण्याची शक्यता देखील दिसत नव्हती, तो कसोटीत ट्रीपल सेंच्युरी मारणारा पहिला भारतीय होण्याची भविष्यवाणी करत होता.

थोड्या वेळासाठी लक्ष्मणला वाटलेलं की सेहवाग गंमत करतोय, पण सेहवाग मात्र आपल्या दाव्याविषयी अतिशय गंभीर होता. पुढे २००४ साली सेहवागने त्रिशतक फटकावलं आणि कसोटी संघातील डेब्यूपूर्वीच केलेली भविष्यवाणी खरी करून दाखवली. विशेष म्हणजे या इनिंग दरम्यान सेहवागने लक्ष्मणचाच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कोलकाता कसोटीतील २८१ रन्सचा विक्रम मोडीत काढला होता.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.