ऑस्ट्रेलियन बॉलर्सची शिकार करणाऱ्या लक्ष्मणला आज भारतीय टीम मिस करत असेल

वांगीपुरापू वेंकट साई लक्ष्मण म्हणजेच आपला व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण. भारतीय फलंदाजीच्या सुवर्ण चौकडीचा महत्त्वाचा सदस्य.

लक्ष्मण म्हणजे देवमाणूस. त्याच्या बॅटिंग मध्ये हिंस्रपणा नसायचा. त्याची बॅटिंग म्हणजे स्टायलीश जंटलमन्स गेम. विनाकारण हवेत बॉल न उचलता गॅप शोधून मारलेले आखीव रेखीव फटके. कुठच्याही साईडला टाकलेला चेंडू आपल्या मनगटाच्या जोरावर वळवून त्याला सीमापार धाडण्यात तो तरबेज होता.

हैदराबादच्या पाण्यातच हा गुण असावा कारण तिथल्याच मोहम्मद अझरूद्दीनने कॉमेंटेटरना “और बॅट्समनने गेंद को अपने कलाइओं के सहारे मोड दिया” म्हणायची सवय लावली होती. लक्ष्मण एका अर्थे त्याचाच वारसदार.

लक्ष्मणला आणखी एका गोष्टीसाठी ओळखलं जातं ते कांगारूच्या शिकारीसाठी.

खरोखरच्या कांगारूच्या शिकारीसाठी नाही तर ऑस्ट्रेलियन बोलर्सच्या शिकारीसाठी लक्ष्मण फेमस होता. ब्रेट ली, मॅकग्रा, शेन वार्न, जेसन गिलेस्पी सारखे वर्ल्ड क्लास बाॅलर. भलेभले फलंदाज त्यांना घाबरायचे. पण हे सगळे व्ही.व्ही.एस.लक्ष्मणला घाबरायचे. कसोटीमध्ये सेहवाग सचिन गांगुली द्रविड यांच्या नंतर ग्राउंड वर उतरणारा लक्ष्मण दिसला की ऑस्ट्रेलियन्स बॉलरच अवसानच गळायचं.

अंडर नाईनटीन च्या वेळेपासून लक्ष्मणचं ऑस्ट्रेलियाशी नेमकं नात काय होत त्याला पण माहित नाही. तो कितीही खराब फोर्म मध्ये असू दे ऑस्ट्रेलिया सिरीज मध्ये तो खेळणार म्हणजे खेळणार. सगळ्यांना खात्री असायची. एकवेळ सचिन द्रविड सेहवाग परवडले पण लक्ष्मण नको असं उघड उघड ऑस्ट्रेलियन बॉलर्स म्हणायचे. त्यांच्याविरुद्ध लक्ष्मण ने कसोटीत ६ आणि वनडे मध्ये ४ वेळा शतक बनवले आहे.

२००१ चा तो ऑस्ट्रेलियाचा सुप्रसिद्ध दौरा कोण विसरेल ?

ऑस्ट्रेलियन टीमसाठीचा तो सुवर्णकाळ होता. सलग १६ कसोटी जिंकून ते दिग्विजयी आहेत या वर शिक्कामोर्तब झाला होता. भारतात आल्या आल्या पहिली कसोटी त्यांनी जिंकली होती.

ईडन गार्डन वर होत असलेल्या दुसऱ्या कसोटी मध्ये सुद्धा त्यांचच वर्चस्व होत. त्यांच्या पहिल्या इनिंगच्या ४४५ धावांच्या डोंगरापुढे आपली टीम फक्त १७१ धावा बनवून कोलमडून गेली. आता विजय म्हणजे फक्त एक औपचरिकता उरली आहे असा समज झालेल्या ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह वाॅने भारताला फॉलो ओन दिला.

भारताची सुरवात चांगली झाली नाही.

शिवसुंदर दास ,सदागोपन रमेश यांच्यापाठोपाठ सचिन सुद्धा स्वस्तात आउट झाला. सचिन गेला की टीव्ही बंद असा तो काळ. कांगारू बॉलर पण थोडे रिलक्स झाले . समोर आजारी असलेल्या द्रविडच्या साथीला नवखा लक्ष्मण  होता. हळहळू इनिंग बनू लागली. आधी विकेट टिकवून डिफेन्सिव खेळणारी हि जोडगोळी कधी रना जमा करू लागली कळालं नाही. सामन्याच्या चौथ्या दिवशी अख्खा दिवसभर त्या दोघांनी केलेली  बॅटिंग बघून कोलकात्याच्या त्या रणरणत्या उन्हात स्टिव्ह वाॅ ला घाम फुटला.

ऑस्ट्रेलियाचे बॉलर ढेपाळले. त्यांच्या तोंडात आलेला घास समोरून निघून जात होता.अखेर द्रविड १८० वर रनआउट झाला. लक्ष्मणने २८१ रन काढले. त्याचे त्रिशतक थोडक्यात हुकले. पाचव्या दिवशी सकाळी भारताने ६६७ धावावर इनिंग डिक्लेअर केली.

लक्ष्मण आणि द्रविडने अनेक जागतिक विक्रम त्या मॅचमध्ये मोडले होते.

फॉलोओन मिळालेली टीम परत जिंकू शकेल यावर कोणाचा विश्वास नव्हता. हरभजन आणि सचिनच्या फिरकीवर भारताने ऑस्ट्रेलियाला शेवटच्या इनिंगमध्ये गुंडाळले आणि इतिहास घडवला. नव्या युगातल्या गांगुलीची ही नवी टीम होती. सहजासहजी हार न मानण्याची वृत्ती या सामन्यात दिसून आली. आणि तीचा खरा हिरो होता लक्ष्मण.

पुढं असं अनेकदा घडलं जेव्हा लक्ष्मण ने अवघड प्रसंगात भारताला मॅच जिंकून दिली. १३४ कसोटी सामन्यात सतरा शतकासह त्याने साडे आठ हजार  धावा केल्या. भारतात एक चुकीची समजूत आहे. कसोटीत तंत्रशुद्ध खेळणाऱ्या फलंदाजाला वनडे किंवा ट्वेंटी २० मध्ये खेळता येत नाही.

याच गैरसमजुतीमुळे लक्ष्मणला वनडे मध्ये संधी जास्त मिळालीच नाही. २०११ मधल्या ऑस्ट्रेलिया सिरीज मध्ये लक्ष्मणने फक्त दोनच अर्ध शतक बनवले आणि त्याला एकही शतक बनवता आले नाही. त्याच वेळी त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरु झाली.

१८ ऑगस्ट २०१२ ला त्याने निवृत्ती जाहीर केली.

स्लीप मध्ये उभा राहून फिल्डिंग करताना सुद्धा जंटलमन स्लेजिंग करणारा, लॉर्डसवर गांगुली शर्ट काढून नाचत असताना त्याचा शर्ट खाली खेचायचं धाडस करू शकणारा, कितीही गडबड असू दे अंघोळ केल्याशिवाय बॅटिंगसाठी न उतरणारा, मॅचच्या आधी खोलीत देवाची पूजा मांडणारा असा हा पापभिरू लक्ष्मण.

त्याच्या तंत्रशुद्ध फलंदाजीला आज सगळेच मिस करत असतील.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.