शेताच्या दांडावर लिंबाची दोन रोपं घावली आणि या माणसाने वाडेगावचं अर्थकारण बदलून टाकलं

जेवणाची चव वाढवायची असेल, सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापर करायचा असेल, शक्तिवर्धक पेये बनवायची असतील किंवा दारू पिल्यानंतर आलेली शक्ती उतरवायची असेल या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट हमखास मदत करते ती म्हणजे लिंबू. लिंबाची असे वेगवेगळे उपयोग असल्यामुळे बारा महिने या पिकाची मागणी असते.

महाराष्ट्रातही असं एक गाव आहे जिथली लिंब देशभरात प्रसिद्ध आहेत. हे गाव म्हणजे ‘वाडेगाव’.

बाळापूर शहर सोडल्यानंतर पातुरकडे जात असताना रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला लिंबाच्या डेरेदार बागा दिसू लागतात आणि हा पट्टा वाडेगावच्या ‘कागदी’ लिंबांचा आहे, हे लगेच ओळखू येतं. एखाद्या गावाची भरभराट करण्यासाठी एक पीक कसं हातभार मला लावतं याचं उत्तम उदाहरण म्हणजेच वाडेगावची कागदी लिंबं.

वाडेगावमध्ये असं एकही शेत नाहीये ज्यात लिंबाच्या बागा दिसणार नाही. आज वाडेगाव आणि या परिसरातील वीस ते बावीस गावं लिंबू पीक वर्षानुवर्ष घेतायेत. शिवाय राज्यात आणि परराज्यात कागदी लिंबांचा प्रसार वाडेगावमधून झाल्याचा दावा इथले शेतकरी करतात.

गावाचं नावलौकिक करणारी ही लिंबं या गावात आणण्याचं श्रेय जातं ते ‘कैलासवासी मोतीरामजी निंबाजी कंडारकर’ यांना.

जर या गावाचा इतिहास बघितला तर १९५५ पर्यंत या गावात वीज पोहोचली नव्हती. त्याआधी सिंचनाच्या फारशा सोयी सुविधासुद्धा नव्हत्या. कंडारकर त्याकाळात भाजीपाल्याची लागवड करायचे. शेतात मोटेने पाणी देण्यासाठी जो दांड होता त्याच्या काठावर काही आंब्याची झाडं लावलेली होती. याच दांडावर लिंबाची दोन झाडं उगवलेली त्यांना दिसून आली आणि ही झाडं त्यांनी पुढे जोपासली.

त्यांनी जवळपास लिंबाची २० झाडं लावली. त्यासाठी १९५५ ला कोल्हापूरमधून दोन डिझेल इंजिन २९०० रुपयांना विकत घेतले. या इंजिनाच्या मदतीने त्यांनी सिंचन सुरू केलं आणि लिंबाची बाग वाढवत नेली. हळूहळू जवळपास २२ एकरांत बाग त्यांनी उभी केली. गावातील ते एकटे शेतकरी होते ज्यांनी हे आव्हान उचललं होतं.

मात्र हे पीक एकट्याला घेऊन जमणार नाही याची जाणीव कंडारकरांना होती. कारण त्याने संपूर्ण गावाची प्रगती होणार नाही. म्हणूनच त्यांनी इतरही शेतकऱ्यांना लिंबू लागवडीकडे वळवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला काहीच शेतकऱ्यांनी धाडस दाखवलं मात्र नंतर लिंबू पिकातून मिळत असलेलं उत्पन्न आणि त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची होत असलेली भरभराट पाहून एक-एक शेतकरी या लागवडीकडे वळू लागला.

जे शेतकरी कंडारकरांकडे रोप घ्यायचे त्यांना ते संपूर्ण मार्गदर्शनही करायचे आणि याचं फलित म्हणजे शेतकऱ्यांकडे पंधरा ते वीस वर्ष कालावधीच्या लिंबू बागा बघायला मिळायच्या. आजघडीला या लिंबामुळे इथल्या शेतकऱ्यांना कधी पैशाची चणचण भासत नाही. शेतकऱ्यांना खरिपातील इतर पिकांवर कीडनाशक फवारायचे असेल, खतासाठी पैसे हवे असतील तर लिंबाच्या चार-पाच गोण्या तोडून बाजारात नेल्या की हातात पैसे येतात.

वाडेगावची आणखी एक ओळख म्हणजे लिंबाची बाजारपेठ. १९९० पासून लिंबाची बाजारपेठ सुरू झाली.

सकाळी लिंबू तोडून प्रतवारी केली जाते आणि भरलेल्या गोण्या दुपारी चारपर्यंत बाजारात आणल्या जातात. दुपारनंतर या बाजारातील हालचाली वाढू लागतात. दिवस मावळतीला जातो तसं बाजारात माल येण्याचं प्रमाण वाढू लागतं. एकदा माल दाखल झाला की लिंबाची बोली सुरू होते. जो व्यापारी जास्त बोली लावेल त्याला लिंबं मिळतात. या बाजारपेठेत वर्षभरात किमान उलाढाल तीस ते चाळीस कोटींपर्यंत असावी, असा अंदाज जाणकार व्यक्त करतात.

वाडेगावची लिंबं देशभरात प्रसिद्ध आहेत. लिंबाच्या अनेक जाती संशोधनातून पुढे आल्या मात्र कागदी लिंबू चवीला ‘काही औरच’ असतो. या लिंबाची साल अगदी पातळ असल्याने त्याला कागदी म्हटलं जातं. ही लिंबं दिल्ली, अमृतसर, कोठा, जबलपूर बाजारपेठांमध्ये चालतात पण हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू या ठिकाणीही चांगलाच भाव खातात, असे व्यापारी सांगतात.

तर लिंबाची बाग वर्षाला खर्च वजा जाता लाख सव्वा लाख रुपये हमखास मिळवून देतात, असं शेतकरी सांगतात.

देशात लिंबू लागवडीत आंध्रप्रदेश नंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो आणि त्यातही वाडेगावची कागदी लिंबं अव्वल आहेत. याच लिंबामुळे आज गावात भरपूर पैसा येतोय. ज्यातून या पिकासाठी लागणाऱ्या निविष्ठा साहित्याचा पुरवठा करणारी दुकानदारी इथे वाढली आहे. तर तीन ते चार राष्ट्रीयीकृत बँकांनी गावात शाखाही उघडल्या आहेत. शिवाय दहा-अकरा पतसंस्था उभ्या झाल्यायेत. हे सर्व घडले ते फक्त लिंबाच्या पैशांच्या उलाढालीतून.

आज गावात कंडारकर यांची तिसरी पिढी लिंबू पिकवते. आणि या सोबतच इतर गावकऱ्यांचा ही यात सहभाग वाढल्याने लिंबाला पिढ्यांची परंपरा लाभली आहे. याच कागदी लिंबाच्या पिकानं वाडेगावात क्रांती घडवून आणली आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.