नवाज शरीफ यांनी इम्रानचं कर्णधारपद हिसकावलं होतं, आज इम्रान खानने बदला पूर्ण केलाय !

४ ऑक्टोबर १९८७.

लाहोरमधील गदाफी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयम.

विश्वचषकाच्या मुख्य फेरीतील सामन्यांपूर्वी सराव सामने खेळविण्यात येत होते. असाच एक सामना पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा संघ आणि वेस्ट इंडीज यांच्यादरम्यान खेळवला जाणार होता. या सामान्याविषयीचा एक अतिशय रंजक किस्सा इम्रान खानने आपल्या ‘पाकिस्तान- ए पर्सनल हिस्ट्री’ या आपल्या आत्मचरित्रात लिहिलाय.

personal history

इम्रान खान हा त्यावेळी विश्वचषकासाठीच्या पाकिस्तानच्या संघाचा कर्णधार होता. सराव सामन्यापूर्वी ज्यावेळी इम्रान संघाच्या ड्रेसिंगरूममधून बाहेर बाहेर पडत होता त्यावेळी पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाचे सचिव शहीद रफी यांनी इम्रान खानला सांगितलं की पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री ‘नवाझ शरीफ’ हे संघाचे कर्णधार असणार आहेत.

इम्रान खानचा असा समज झाला की जे काही चाललंय ते प्रातिनिधिक स्वरूपाचं असेल. मुख्यमंत्री नवाझ शरीफ ड्रेसिंगरूममध्ये बसून सामना बघतील. पण इम्रानला धक्का त्यावेळी बसला जेव्हा शरीफ़ स्वतः टॉससाठी ड्रेसिंगरूममधून बाहेर पडले.

इम्रानसाठी हा जेवढा धक्का होता तेवढाच तो वेस्ट इंडीजचे कर्णधार सर  व्हिव्ह रिचर्डस यांच्यासाठी देखील होता. नवाझ शरीफ यांनी टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करायचा निर्णय घेतला. इथपर्यंत तरीही गोष्टी ठीकठाकच होत्या.

इम्रान खान आणि संघातील इतर पाकिस्तानी खेळाडूंना नवाझ शरीफ अजून मोठा धक्का देणार होते. हा धक्का म्हणजे शरीफ पाकिस्तानसाठी ओपनिंग करणार होते.

पाकिस्तानचा माजी कसोटी खेळाडू आणि तत्कालीन ओपनर मुदस्सर नझर ओपनिंगसाठी तयार झाला होता. त्याने व्यवस्थित हेल्मेट, पॅड, थाय पॅड, चेस्ट पॅड आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या सगळ्या गोष्टींची तयारी केली होती. तसं करणं आवश्यक देखील होतं, कारण समोर वेस्ट इंडीजचं आक्रमण होतं.

वेस्ट इंडीजच्या बॉलर्सची त्यावेळी अशी ख्याती होती की ते बॉल नाही तर बॉम्बगोळे वाटावेत अशा पद्धतीने आक्रमण करत असत. अशा स्थितीत नवाझ शरीफ यांनी फक्त पॅड बांधले होते आणि डोक्यावर एक हॅट होती.

nawaz sharif
नवाझ शरीफ यांचा क्रिकेट खेळतानाचा प्रातिनिधिक फोटो

शरीफ ज्यावेळी बॅटिंगसाठी मैदानात उतरले त्यावेळी पाकिस्तानच्या संघालाच या माणसाच्या सुरक्षेचं टेन्शन आलेलं. या प्रसंगाविषयी लिहिताना इम्रान म्हणतो की, “ज्यांना क्रिकेटच्या इतिहासाविषयी फारसं माहित नाही त्यांना सांगावसं वाटतं की, हे  वेस्ट इंडीजचं तेच आक्रमण होतं ज्याने अनेक गुणवंत क्रिकेटर्सचं करिअर संपवलं होतं. आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक व्यावसायिक खेळाडूंना देखील ज्यावेळी या आक्रमणाचा सामना करायला लागायचा त्यावेळी त्यांची झोप उडायची.

अशा परिस्थितीत क्रिकेट खेळण्याचा कसलाही अनुभव नसलेले नवाझ शरीफ कुठल्याही संरक्षणाशिवाय मैदानात उतरले होते. त्यामुळे बॉलरने जर एखादा शॉर्ट बॉल टाकला असता तर ते स्वतःला वाचवू देखील शकले नसते. त्यांना गंभीर दुखापत होण्याची  शक्यता लक्षात घेऊन मी आधीच जवळपास कुठली अँम्बुलन्स तयार आहे का याची चौकशी करून ठेवली होती”

शरीफ बॅटिंगसाठी मैदानात उतरले. बॉलरने टाकलेला पहिला बॉल कसा आला नि कसा गेला हे देखील त्यांना समजलं नाही. दुसरा बॉल मात्र शरीफ यांनी बॅट उचलायच्या आधीच शरीफ यांच्या स्टंपसवर जाऊन धडकला आणि पाकिस्तानच्या खेळाडूंनी सुटकेचा निश्वास टाकला.

वेस्ट इंडिजच्या आक्रमणाला कुठल्याही संरक्षक कवचाशिवाय सामोरे जाण्याचा शरीफ यांचा निर्णय अतिशय बालिशपणाचा होता. इम्रानच्याच भाषेत सांगायचं तर शरीफ यांची ही कृती “नुकतंच प्राथमिक शाळेतील शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याने लागलीच पी.एच.डी. चा प्रबंध लिहायला घेण्यासारखी होती.”

या सामन्यात शरीफ यांनी इम्रान खानकडून त्याचं क्रिकेट संघाचं कर्णधारपद हिसकावलं होतं. आज या घटनेच्या जवळपास ३१ वर्षानंतर इम्रान खानने शरीफ यांच्याकडून पाकिस्तान नावाच्या संपूर्ण देशाचंच कर्णधारपद हिसकावून घेत एक वर्तुळ पूर्ण केलंय.

 

Leave A Reply

Your email address will not be published.