कठोर नियम असताना, ‘चुकून’ एखादं मिसाईल समोरच्या देशात फायर होणं शक्य असतंय का?

तिकडं रशिया-युक्रेनचं युद्ध अजून थांबलेलं नाही, रोज नवं काहीतरी समजतं आणि आपलं टेन्शन वाढतं. नाय म्हणायला आपल्याकडं वातावरण निवांत असल्यानं तसं टेन्शन नव्हतं. पण तेवढ्यात एक बातमी आली, भारतानं पाकिस्तानमध्ये मिसाईल डागलं. आमच्या रुमवरची पोरं, पहिली पेट्रोल भरायला गेली आणि येताना टपरीवर थांबली. उगं युद्ध झालं, तर लोड नको. पण आम्ही सगळी बातमी डिटेलमध्ये वाचली आणि मग समजलं भारतातून मिसाईल चुकून तिकडं गेलं. आता आपण एखाद्या न पटणाऱ्या पोरीला चुकून मेसेज करतो ते ठीक असतंय, पण डायरेक्ट मिसाईलच तिकडं जातंय म्हणल्यावर विषय गंभीर झालाय की.

मॅटर असा झाला, की भारताचं एक मिसाईल पाकिस्तानच्या सीमेत १२४ किलोमीटर आत जाऊन पोहोचलं. त्यानं कुठलीही जीवितहानी झालेली नसली, तरी जगात युद्धाचं वातावरण असताना, भारतानं डायरेक्ट मिसाईल फायर केल्यानं पाकिस्तानचे धाबे दणाणले. त्यांच्या मीडियामध्ये फुल कल्ला झाला. आता तिकडच्या मीडियाला भारतानं कायतर केलंय म्हणल्यावर कसा चेव येतो, हे सगळ्यांना माहितीये. त्यांनी कांगावा करुन झाल्यावर पाकिस्तान सैन्याच्या मीडिया ब्रांच इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे डीजी मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी पत्रकार परिषद घेतली.

इफ्तिखार म्हणाले, ९ मार्चच्या संध्याकाळी भारतातल्या सिरसामधून पाकिस्तानच्या दिशेनं एक सुपरसॉनिक डागण्यात आलं. भारतामधून पाकिस्तानात १२४ किलोमीटर आत मिया चन्नुमध्ये येण्यासाठी या क्षेपणास्त्राला फक्त ३ मिनिटं लागली, यात दारुगोळा किंवा स्फोटकं नसली तरी काही घरांचं नुकसान झालं. याआधी भारताच्या पाणबुड्या कराचीजवळ दिसल्या होत्या. हे क्षेपणास्त्र पाकिस्तानमध्ये आलं तेव्हा दोन्ही देशांची अनेक विमानंही उड्डाण करत होती. भारतानं हे चुकून झाल्याचं सांगितलं असलं, तरी आम्हाला ठोस उत्तराची अपेक्षा आहे.

भारतानं आपली बाजू मांडताना सोप्या भाषेत सांगितलं, ”की बाबांनो आमच्या मनात अजिबात चुकीचा उद्देश नव्हता, जरा रुटीन मेंटेनन्स करताना गडबड झाली आणि मिसाईल चुकून तुमच्याकडं आलं. हे ऍक्सिडेंटल फायरिंगमुळं घडलंय. आम्ही हे प्रकरण सिरीयसली घेतलं असून वरिष्ठ पातळीवर याची चौकशीही होणार आहे.”

आता मिसाईल म्हणजे काय आपण शाळेत उडवायचो तसली कागदी विमानं नसतात, एकाच वेळी कित्येक जीव घेण्याची आणि कित्येक गोष्टी नेस्तनाबूत करण्याची ताकद मिसाईल्समध्ये असते. त्यामुळं साधी मिसाईलची टेस्ट जरी करायची असली, तरी त्यासाठी भरपूर नियम असतात.

भारत पाकिस्तानबद्दल बोलायचं झालं, तर २००५ मध्ये या दोन्ही देशांनी एका करारावर साईन केलेली, त्यानुसार कोणत्याही मिसाईलची चाचणी करण्याआधी समोरच्या देशाला माहिती देणं बंधनकारक असतं. टेस्ट करण्याआधी कुठल्याही देशानं वैमानिकांना आणि नौदलाला अलर्ट करण्यासाठी नोटीस देणं गरजेचं असतं.

कुठल्याही मिसाईलची टेस्ट करताना, काही नियम असतात. मिसाईल जिथून लॉन्च करणार ती साईट सीमारेषेच्या ४० किलोमीटर परिघात नसली पाहिजे, सोबतच जिथं मिसाईल पडणार ती जागा आपल्याच सीमाभागात आणि सीमारेषेच्या अलीकडे ७५ किलोमीटरपर्यंत असायला हवी. थोडक्यात काय तर कुठलंही मिसाईल  टेस्ट करताना, ते आपल्याच सीमाभागात करायचं असतं. जरा टेस्ट म्हणून तुमच्या एरियामध्ये टाकलं असं होत नाही. साहजिकच तांत्रिक चुकांमुळं हे मिसाईल भारताकडून पाकिस्तानमध्ये गेलं.

पाकिस्तानी मीडियानं कालवा केला आणि त्यानंतर हे मिसाईल होतं कुठलं याची जोरदार चर्चा झाली. अनेक तज्ञांनी हे मिसाईल ब्राम्होस असल्याचा दावा केला. पाकिस्ताननं ज्याप्रकारे आपल्या भागात आलेल्या मिसाईलच्या वेगाचं, दिशेचं वर्णन केलं त्यानुसार ती क्षमता ब्राम्होसमध्येच असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. 

मात्र दुसऱ्या बाजूला, ज्या सिरसामधून मिसाईल लॉंच झाल्याचं पाकिस्तानचं म्हणणं आहे, तिथं ब्राह्मोसची चाचणी केली जात नाही. त्यामुळं हे सुपरसॉनिक मिसाईल नेमकं कुठलं होतं याचं कोडं काही उलगडलेलं नाही.

पण मिसाईल मिसफायर कसं काय होतं? जेव्हा मिसाईल लॉंच होतं तेव्हा त्याला डायरेक्शन्स दिलेल्या असतात, टार्गेट सेट केलेलं असतं. त्यानुसारच ते प्रवास करतं, काही मिसाईल्स एकदा हवेत गेली, की त्यांच्यावर कंट्रोल राहत नाही, तर काही मिसाईल्सची दिशा हवेत असतानाही बदलता येते. पाकिस्ताननं केलेल्या दाव्यानुसार हे मिसाईल आधी सरळ येत होतं, त्यानं मधूनच दिशा बदलली आणि पून्हा सरळ येत पाकिस्तानात घुसलं. याचा वेग इतका होता, की त्यांना लवकर ऍक्शन घेता आली नाही.

जर मिसाईलला कोऑर्डिनेट्स देण्यात काही गडबड झाली असेल, एखादा आकडा जरी चुकला असेल तर मिसाईलची दिशा भरकटू शकते. तसाच काहीसा प्रकार चाचणी दरम्यान किंवा तपासणी दरम्यान घडला असल्याची शक्यता तज्ञ व्यक्त करतायत.

जगातलं युद्धजन्य वातावरण, भारत पाकिस्तानमध्ये असलेला अघोषित तणाव आणि त्या सगळ्यात अशी घटना घडल्यानं वातावरण जरा गंभीर झालंय. भारतीय सैन्य नव्या क्षेपणास्त्रांची चाचणी करतंय का? युद्धस्थितीचा अंदाज घेतंय का? असे प्रश्नही लोकांना पडतायत. त्यामुळं आता भारतीय सैन्याकडून काय भूमिका घेण्यात येते, चौकशीमधून काय समोर येतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असेल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.