लक्ष्या आणि मिस्टर बीन सोडले, तर टेडी आवडणारा पोरगा आजवर सापडलेला नाही…

बालपण ही आपल्या आयुष्यातली लय भारी गोष्ट. आपण तरुणपणी कितीही आगाऊपणा केला असला, तरी बालपणीच्या आठवणींची बरोबरी जगात दुसऱ्या कशाचीच होऊ शकत नाही. आता पोरांना बालपणात खेळायला लय गोष्टी होत्या कारण गोतावळाच तेवढा असायचा. पोरींची गोष्टही काय वेगळी नव्हती म्हणा, भातुकली खेळायला किमान २० एक पोरी किरकोळीत जमायच्या, मग काळ बदलत गेला आणि पोरांची खेळणीही. आता पकडापकडी खेळायला १० पोरंही जमत नसतील, पण बाहुली आणि भातुकली एकट्यात का होईना आजही आपलं मार्केट राखून आहेत.

मोबाईलच्या आधी बारक्या पोरांचा सगळ्यात लाडका विषय होता तो म्हणजे टेडी बिअर. बाहुली हातात आल्यावर आईसारखं वागणाऱ्या पोरी, टेडीला मित्रासारखं समजू लागल्या. हळूहळू एकत्र कुटुंब पद्धती लुप्त होऊ लागली आणि एकटं राहणाऱ्या पोरा-पोरींसाठी टेडी हा जिवाभावाचा मित्र बनला.

तुम्ही म्हणाल, रोज हलकंफुलकं लिहिणारा भिडू आज लई डीप जातोय… लोड नका घेऊ, पुढं वाचा…

तर हे टेडीचं फॅड लहान मुलींपासून सुरू झालं आणि मोठ्या पोरींपर्यंत पोहोचलं. त्यामुळं व्हॅलेंटाईन वीक असो किंवा तिचा बर्थडे गिफ्ट म्हणून टेडी दिला की पोरांचा विषय संपायचा. पण तुम्ही कधी विचार केलाय का? की पोरांना टेडी आवडत असेल काय? आवडत असेल तर ते मोकळेपणानं सांगू शकत असतील काय? आणि एखाद्याच्या विषयानं टेडी दिलाच तर पोरं त्याचं काय करत असतील?

आम्हाला पण हे प्रश्न पडले आणि आम्ही उत्तरं शोधायचा प्रयत्न केला..

टेडी बिअर आणि पोरं यांचं कनेक्शन जुळवणारे दोन मेन कार्यकर्ते म्हणजे, झपाटलेला मधला लक्ष्या आणि मिस्टर बिन. लक्ष्या तात्या विंचूशी बोलायचा आणि उद्योग करायचा ते पाहून लय भारी वाटायचं. दुसरा कार्यकर्ता होता मिस्टर बिन, त्या भावाच्या जिंदगीत पण एक मुलगी होती… तरीही हा गडी एकटा असला की त्या टेडीसोबत असायचा. त्याला चादरीत घेऊन झोपायचा, त्याला सीटबेल्ट बांधून गाडीत बसवायचा, जेवायला बसला तरी समोर टेडी ठेवायचा. पण कुठल्याच पोरानं त्याला आयुष्यात कधी जज केलं नव्हतं… लहानपणी पोरांना जितका तात्या विंचू आवडायचा तितकाच मिस्टर बिनही.

आता कट टू, नव्या युगातला टेडी डे…

प्रपोझ डे मध्ये जरा थ्रिल असतंय, हग डे आणि किस डे चा तर विषयच वेगळा असतोय. चॉकलेट डे ला तिला दिलेल्यातलं अर्ध चॉकलेट तरी खाता येतंय, पण टेडी डे हा नेहमीच भाकड दिवस. पोरं पोरींना टेडी देतात… आणि शप्पथ सांगतो काही पोरी पोरांनाही टेडी देतात.

तुम्हाला सांगतो एक किस्सा…

आम्ही चार पोरं एका रुममध्ये राहायचो. त्यातल्या फक्त एकाला गर्लफ्रेंड होती. भावाला रोझ डे ला गुलाब, प्रपोझ डे दिवशी परफ्युम, चॉकलेट डे ला सिल्क असलं मटेरियल मिळालेलं. टेडी डे ला पोरगं भला मोठा टेडी बिअर घेऊन घरी आलं आणि आमच्या बत्त्या डीम झाल्या. त्या पोरीनं प्रेमानं दिलं आणि इथं पोरांनी त्याची उशी केली. पिक्चर बघताना मोबाईलचा स्टॅन्ड म्हणून वापरलं. पुढं कायतरी लडतर झाली आणि ते पोरगंही आम्हा सिंगल लोकांच्या पंक्तीत आलं. आता त्या टेडीचं काय करावं?

काही दिवसांनी चौघातला एक जण गुलुगुलु करायला लागला, त्या भावाला वैनींना काय गिफ्ट द्यायचं सुधरलं नाही… म्हणून आम्ही तोच आलेला टेडी धुवून दिला. हळदी कुंकवाला मिळालेलं सामान बायका जशा फिरवतात, तसंच पोरं या टेडी बिअरचं करतात.

पण जर एखादा पोरगा म्हणला, की त्याला टेडी बिअर आवडतं… तर पोरांनी काय रिऍक्शन दिल्या असत्या…?

आम्ही थेट काही पोरांना विचारलं…

एकाची रिऍक्शन आली तू काय पोरगी आहेस का टेडी आवडायला? दुसरं तोंडावर म्हणलं की, त्यात काय एवढं भावा… पण मागं फिदीफिदी हसलं. अरे पण तुला एवढे मित्र आहेत, मग टेडी कशाला लागतोय असं तिसऱ्याचं म्हणणं होतं. चौथ्याची लाईन जरा अश्लील होती, त्यामुळं ती काय इथं सांगत नाय.

आम्ही लय शोधल्यावर आम्हाला लोकांना टेडी बिअर आवडण्यामागचं सिम्पल कारण घावलं…

टेडी बिअरला आपण जवळ घेऊन झोप शकत असतोय, त्यामुळं आपला एकटेपणा कमी होतो. त्यांच्यात जीव नसला तरी आपला राग, चिडचिड आणि आनंद त्यांच्यापुढं सांगितला तर आपलं मन हलकं होत असतंय. टेडीमुळे आपले हॅपी हार्मोन्स जागृत होतात आणि मनातलं दुःख जरा कमी होतंय… त्यामुळे लोकांना टेडी बिअर आवडतात आणि लोकं त्यांच्यावर पैसेही खर्च करतात.

बास लय लोड दिला… लक्ष्या आणि मिस्टर बिननंतर आवडीनं टेडी बघणारा पुरुष दिसला, तर त्याला उचकवू नका. जशी बाकी दुनिया नॉर्मलाईज केली, तशी टेडी आवडणारी पोरं पण नॉर्मलाईज करुच शकतोय की…!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.