शशी थरुर यांच्या पराभवामुळे काँग्रेसनं या गोष्टी गमावल्यात…

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक झाली, मल्लिकार्जुन खर्गे जिंकले आणि शशी थरुर यांचा पराभव झाला. या निकालानंतर वेगवेगळ्या चर्चा रंगतायत.

या चर्चांमध्ये एक चर्चा आहे ती म्हणजे शशी थरूर हे बेस्ट पर्याय का होते आणि त्यांच्या अध्यक्ष न होण्यानं काँग्रेसनं कोणत्या गोष्टी गमावल्या आहेत.

हेच मुद्दे जरा खोलात समजून घेऊया आणि पाहूया शशी थरूर अध्यक्ष न झाल्यानं कॉंग्रेसनं काय गमावल्या आहेत ?

पहिलं म्हणजे, शशी थरूर हे दक्षिणेतले आहेत आणि काँग्रेसला दक्षिण भारतातून मिळणार सपोर्ट नेहेमीच महत्वाचा ठरलाय….

जेंव्हा जेंव्हा काँग्रेस पक्ष अडचणीतुन जात होता तेंव्हा दक्षिण भारताने काँग्रेसला साथ दिली.  इंदिरा गांधी देखील तेलंगणातून मेडक मतदारसंघातून निवडून आलेल्या, २०१९ मध्ये राहुल गांधींना अमेठीत पराभव स्वीकारावा लागला होता मात्र तेच केरळच्या वायनाडमधून ते जिंकून आले होते.  आणखी एक म्हणजे २००४ मध्ये मिळालेला विजय. 

२००४ च्या लोकसभा निवडणुकीतून देशभर अटल बिहारी वाजपेयेंचीच हवा होती. म्हणजे सर्वे आणि पब्लिक रेटिंग्स देखील सांगत होते कि भाजपची सत्ता येईल पण निकाल लागला आणि अनपेक्षितपणे काँग्रेस जिकून आली ते साऊथच्या जोरावर. वाय.एस.आर यांनी तेव्हाच्या एकत्र असलेल्या आंध्रातून २९ काँग्रेसचे आणि सात इतर अशी ३६ खासदारांची रसद काँग्रेसला पुरवली होती ज्यामुळे टोटल टॅलीमध्ये भाजपपेक्षा काँग्रेसला ७ जास्त जागा मिळवता आल्या होत्या. 

त्याचबरोबर तामिळनाडूतून डीएमकेसोबत मिळालेल्या ३९ जागा या दोन राज्यातील जबरदस्त कामगिरीमुळे काँग्रेस १४५ जागांसह सगळ्यात मोठा पक्ष ठरला आणि यूपीएच्या मित्रपक्षांबरोबर काँग्रेस पुन्हा सत्तेत परतली होती…मात्र २०१४ मध्ये इथे काँग्रेसचा बुरुज ढासळला. म्हणूनच काँग्रेस २००४ मध्ये साऊथच्या जीवावर जो पराक्रम काँग्रेसने केला तो पुन्हा रिपीट करण्याच्या तयारीत आहे. 

म्हणूनच राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला सुरवात दक्षिणेत कन्याकुमारीतून झालीये.  यात्रेचा प्रवास दक्षिण भारत ते उत्तर भारत असा आहे. यात्रेचे अपडेट्स पाहिलेत तर दक्षिणेत या यात्रेला भावनात्मक स्वरूप मिळालंय.

२०२४ च्या निवडणुकीच्या स्ट्रॅटजीमध्ये काँग्रेसने दक्षिणेला जास्त महत्व दिलं आणि याच दक्षिणेतून शशी थरूर येतात. २००९ मध्ये त्यांनी राजकारणात उडी घेतली. केरळच्या तिरुवनंतपुरम या लोकसभा मतदारसंघातून शशी थरूर यांनी २००९ -२०१४ आणि २०१९ असे सलग खासदार म्हणून निवडून येत राहिले. आता अध्यक्षपदावर शशी थरूर निवडून आले असते तर दक्षिण भारतात काँग्रेसच्या बळकटीकरणाला हातभार लागला असता.  

दुसरं म्हणजे, शशी थरूर यांचं दरबार राजकारणाच्या पलिकडचा व्यक्ती असणं महत्वाचं ठरलं असतं

म्हणजेच मल्लिकार्जुन खर्गे, दिग्विजय सिंह दरबारी राजकारणी म्हणले जातात. म्हणजेच गांधी घराण्याच्या खास मर्जीतले.  गांधी घराण्याच्या बाहेर जेव्हा जेव्हा पक्षाध्यक्षपद देण्याच्या चर्चा झाल्या. तेव्हा तेव्हा गांधी घराण्याने ते नाव आपल्याच मर्जीतील असावं याची पुरेपूर काळजी घेतली. केसरी यांचं नावसुद्धा याच कारणासाठी पुढे करण्यात आलं होतं.

पण यात शशी थरूर कुठंच येत नाहीत..जरी ते काँग्रेसी असले तरीही गांधी घराण्याच्या निष्ठेपेक्षा संयुक्त राष्ट्रातील त्यांचा अनुभव, त्यांचे वक्तृत्वगुण यामुळेच त्यांनी काँग्रेसमध्ये महत्वाचं स्थान मिळवलं. दुसरं म्हणजे थरूर जी-२३ मधील निवडक नेत्यांपैकी एक आहेत…ज्यांना गांधी घराण्याबाहेरचं नेतृत्व हवं होतं… आत्ता अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी उभं राहण्याच्या मागे देखील शशी थरूर यांनी काँग्रेसची अंतर्गत लोकशाही बळकट करण्याचं कारण दिलं होतं. त्यामुळे जर त्यांची अध्यक्षपदी नेमणूक झाली असती तर गांधी घराण्याचा शब्दच प्रमाण असेल अशी जी सध्याची सिस्टिम आहे ते शशी थरूर यांच्या कार्यकाळात झालं नसतं हे एवढं नक्की.

तिसरं म्हणजे, नरेंद्र मोदींना, त्यांच्या धोरणांना काऊंटर करण्यासाठी intellectual नेत्याची गरज आहे, ज्यात काँग्रेसच्या इतर नेत्यांपेक्षा शशी थरूर महत्त्वाचे ठरले असते.

शशी थरूर यांच्या official website वर तुम्ही चक्कर मारली तर कळेल कि काय लेव्हलचा intellectual माणूस आहे हा. त्यांची कारकीर्द देखील तितकीच वजनदार राहिलीय. त्यांनी युनायटेड नेशन्समध्ये ३० वर्ष काम केलं आहे. 

व्हिएतनामच्या बोट पीपल क्रायसिसच्या वेळेस थरूर यांनी महत्वाची भूमिका बजावलेली. जगभरात युद्धजन्य स्थिती निर्माण होऊ नये म्हणून शांततेसाठी प्रयत्न करणाऱ्या पीस किपींग कमिटीचे ते हेड होते..युनायटेड नेशन्समध्ये असे अनेक पदं त्यांनी भूषवली..शिवाय आंतरराष्ट्रीय संबंध आणि घडामोडींमध्ये डॉक्टरेट पदवी मिळवणारे शशी थरूर थोडक्यात आंतराष्ट्रीय राजकारण कोळून प्यालेला माणूस म्हणता येईल. 

त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाची मजबूत समज थरूर यांना इतरांपेक्षा वरचढ ठरवते. तसेच राष्ट्रीय राजकारणातला अनुभव पाहायचा असेल तर सलग ३ वेळेस खासदार पद, UPA सरकारमध्ये थरूर यांनी परराष्ट्र राज्यमंत्री आणि मानव संसाधन विकास मंत्रीपद संभाळलय.

सोनिया गांधी यांनी २००४ मध्ये पंतप्रधान म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या विद्वानाची म्हणजेच मनमोहन सिंह यांची निवड केली होती. त्याच निकषात शशी थरूर बसतात.  

शशी थरूर हे भाजपच्या नेत्यांना आंतरराष्ट्रीय राजकारण, अर्थशास्त्र, गवर्नन्स, बेरोजगारी प्रत्येक विषयांवर खुल्या चर्चेचे आव्हान देतात. दुसरं म्हणजे सोशल मीडिया समजलेले पहिले नेते शशी थरूर म्हणलं तरी चालेल. कारण २०१३ पर्यंत इतर नेते नव्याने ट्विटरवर येत होते तेंव्हा १ लाख फॉलोअर्सचा टप्पा गाठणारे शशी थरूरच होते. या आघाड्यांवर त्यांना काँग्रेसला काउंटर करता आलं असतं. 

या सगळ्यात महत्वाचं म्हणजे, शशी थरूर यांचे सॅाफ्ट हिंदूत्व देखील काँग्रेसला मदतीचं ठरलं असतं…

हिंदू अस्मिता ही भारताच्या निवडणूकीच्या राजकारणात नेहमीच निर्णायक राहिली आहे. विशेषत: भाजप कायमच हिंदुत्वाचा मुद्दा पुढं करत राजकारण आली. काँग्रेस जेव्हा जेव्हा भाजपच्या आणि संघाच्या हिंदुत्वावर टीका करते तेव्हा काँग्रेस हिंदुविरोधी असल्याची प्रतिमा भाजपकडून उभी केली जाते. ज्याचा परिणाम अर्थातच काँग्रेसच्या मतांवर झाला आणि अजूनही होतोय. पण थरूर कायमच सांगत आलेत कि भाजप आणि संघ ज्याप्रमाणे हिंदुत्वाचं कार्ड खेळतंय ते हिंदुत्व खरं नाही. 

हिंदुत्वाबद्दल क्रिटिक करतांना विवेकानंदांचे हिंदुत्व सहिष्णुता आणि स्वीकृतीबद्दलच होतं तर टिळकांचे हिंदुत्व राजकीय विचारांनी प्रेरित होतं असं मत मांडत ते विवेकानंदांच्या हिंदुत्वाला सपोर्ट करते आलेत. पण तेच दुसरीकडे त्यांनी वेळोवेळी हिंदुत्वावर टीका करताना हिंदुत्व आणि हिंदू धर्माचे अनुयायी असल्याचं देखील समर्थन केलेलं आहे. त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवर अनेकदा ते अमुक मंदिरात दर्शन घेतल्याचं, हिंदू धर्मातील प्रथा पाळल्याचे फोटो शेअर करताना दिसतात. 

भाजप आणि संघांची हिंदू धर्माची व्याख्या बेगडी असल्याची टीका करत शशी थरूर यांनी हिंदू उदारमतवादी आणि पुरोगामी व्हर्जन दाखवण्यासाठी लिहलेलं  ”why i am hindu ” हे पुस्तक चांगलंच चर्चेत राहिलं होतं.

सॉफ्ट हिंदुत्वासोबत त्यांनी मराठा साम्राज्याची जी थिअरी मांडली होती की, 

जर ब्रिटिश भारतात आले नसते तर भारतावर मराठा साम्राज्य असतं, कारण दक्षिणेला तंजावर पर्यंत मराठा साम्राज्य पसरले होते तर उत्तरेला मराठा दिल्लीपर्यंत पोहचले होते. तिथं असणारा मुघल सम्राट हा मराठ्यांच्या अधिपत्याखाली असायचा. तो जरी मुघल म्हणून उत्तरेत राज्य करत असला तरी त्याला सगळे आदेश मराठा साम्राज्यकडून दिले जायचे. उत्तरेत नाव मुघलांचे असले तरी खर राज्य मराठेच करत होते त्यामुळे इंग्रज नसते आले तर आज भारतावर मराठ्यांचं राज्य असतं ही त्यांनी मांडलेली थिअरी चर्चेत राहिली.

शेवटचा मुद्दा म्हणजे, शहरी भागातून काँग्रेसची झालेली पिछेहाट पाहता शहरी मतदार खेचायचा असेल तर शशी थरूर अध्यक्ष बनणं गेमचेंजर ठरलं असतं…

काँग्रेसकडे शहरी मतदार खेचला जाण्यासाठी शशी थरूर यांचं व्यक्तिमत्व महत्वाचं ठरतं. संयुक्त राष्ट्र, भारतीय संसद, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, क्रिकेट, ट्विटर आणि राजकारण अशा सगळ्याच क्षेत्रात असलेला त्यांचा अनुभव.  शशी थरुर यांचं ट्विटर आणि त्यांची ऑफिशयही वेबसाईट, त्यांनी गाजवलेल्या वादविवाद स्पर्धा, त्यांनी लिहिलेली पुस्तकं, त्यांचं इंग्लिश ज्याचा भारतातील शहरी माध्यमवर्गावर प्रभाव पाडतो येऊ शकतो. 

२०१४ आणि २०१९ च्या मोदी लाटेतही शशी थरूर निवडून आलेले. त्यामुळे शहरी भागातून पुढे जायला काँग्रेससाठी थरूर उपयोगी पडतील…या सगळ्या मुद्द्यांमध्ये त्यांचं वय देखील मेन फॅक्टर ठरतो.  खर्गेंच वय ८० आहे तर थरूर यांचं ६६ आहे.

एकूणच पक्षाला नूतनीकरणाची गरज असताना थरूर त्यांच्या कारकीर्द आणि अनुभवाच्या जोरावर पक्ष आणि देशासाठी नवं व्हिजन घेऊन आले असते, पण आता निकाल लागला आहे.

हे ही वाच भिडू: 

Leave A Reply

Your email address will not be published.