युट्यूबने भारतीय अर्थव्यवस्थेत जवळपास ६,८०० कोटी रुपयांचं योगदान दिलंय

येणारा काळ हा डिजिटल मीडियाचा असणार, असं आपण नेहमीच एकतो, बोलतो. आत्ता सुद्धा बघा ना, तुम्ही आणि मी संवाद साधतोय, हे माध्यम देखील डिजिटलच आहे. यात वेगवेगळे प्रकार आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, स्नॅपचॅट, स्काईप, वेबसाईट आणि असं बरंच काही सोशल मीडियामध्ये येतं. यातील बरेच सोशल मीडिया आपण वापरत नसलो किंवा अनेकांना माहित नसले तरी यात एक असं माध्यम आहे जे प्रत्येकालाच माहिती आहे आणि लहान लेकरांना सुद्धा ते सहज चालवता येतं. 

हे माध्यम म्हणजे युट्यूब. 

कोणतीही माहिती हवी असेल तर एकतर लोक ‘गुगल’ करतात किंवा दुसरं म्हणजे ‘युट्यूब’ बघतात. लहान लेकरांच्या बालगीतांपासून ते आजी आजोबांच्या किर्तनापर्यंत प्रत्येक गोष्ट तुम्हाला युट्यूब पुरवतं. म्हणूनचं युट्यूबचं फॅड जगभरात वाढताना दिसतंय. इतर देशांचं सोडा, भारतात तर युट्युबचं वेड इतकं वाढलंय की चक्क भारताच्या जीडीपीमध्ये युट्यूबमुळे कोटींची वाढ झालीये. हो, तुम्ही ऐकलत ते खरंच आहे. 

आता आम्ही हे कोणत्या आधारावर सांगतोय? किती कोटींची वाढ झाली आहे? आणि नेमकं हे कसं शक्य झालंय? हे जाणून घ्यायचं असेल तर ही स्टोरी शेवटपर्यंत नक्की वाचा. 

हे समोर आलं आहे ते ऑक्सफर्ड युनि्व्हर्सिटीच्या एका रिपोर्टमधून. 

ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स या स्वतंत्र सल्लागार कंपनीच्या ‘असेसिंग द इकॉनॉमिक, सोशल अँड कल्चरल इम्पॅक्ट ऑफ यूट्यूब इन इंडिया’ या स्टडी रिपोर्टमध्ये यासंदर्भातील सविस्तर आकडेवारी देण्यात आलीये. ज्यामध्ये युट्यूबने २०२० मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत म्हणजेच जीडीपी मध्ये जवळपास ६,८०० कोटी रुपयांचे योगदान दिलंय, असं सांगितलं आहे. 

शिवाय त्याच वर्षी भारतात सुमारे ६ लाख ८३ हजार ९०० लोकांना पूर्णवेळ नोकऱ्या देण्यातही युट्युबने भूमिका बजावली असल्याचं या रिपोर्टमधून जाहीर झालंय. स्वतः युट्युबनेच हा रिपोर्ट प्रसिद्ध केलाय.

आता हे कसं शक्य झालंय हे ही सांगतो…

अलीकडेच साऊथ सुपरस्टार अलुअर्जुनचा पुष्पा चित्रपट प्रदर्शित झाला बघा. यातील श्रीविल्ली गाणं तर इतकं गाजलं की त्याचे वेगवेगळ्या भाषेतले व्हर्जन्स आले. आणि या सगळ्या श्रीवल्ली व्हर्जन्सला राडा करण्याचं प्लॅटफॉर्म दिलं ते युट्युबने. मराठी श्रीवल्लीने तर महाराष्ट्रात पार धुमाकूळ घातला. त्यातील नायक आणि नायिकेला भरभरून प्रेम आणि फेम मिळालं. पण हे काही एकटेच नाहीये, अशा अनेकांना युट्युबने प्रसिद्ध केलंय.

त्यात भर पडली कोरोना काळाची. कोरोना काळात युट्युबच्या वापरात भरमसाठ वाढ झाली. कुणासाठी माहिती घेण्याचं तर कुणासाठी माहिती देण्याचं युट्युब हक्काचं स्थान बनलं. प्रत्येक गल्लीतून एखादं पोर तर सापडायलाच लागलं ज्याचा दिवस न दिवस युट्युबवर जातो. 

यूट्यूबच्या याच वाढलेल्या वापराचा फायदा भारताच्या जीडीपीला झालाय. 

सरकारने गेल्या वर्षी जाहीर केलेल्या अंदाजानुसार, देशात युट्युबचे ४४.८ कोटी वापरकर्ते आहेत. तर व्हॉट्सॲपचे ५३ कोटीफेसबुकचे ४१ कोटीइन्स्टाग्रामचे २१० कोटी आणि ट्विटरवरचे १७.५ कोटी वापरकर्ते आहेत. पण यामध्ये युट्युब हे व्हिडीओ शेअर करण्याचं माध्यम असून त्यामुळे जास्त कमाई करता येते. म्हणूनच भारतातील १ लाखांहून जास्त सदस्यांसह चॅनेलची संख्या आता ४० हजारांवर उभी आहे. 

वर्षानुवर्षे यात जवळपास ४५ टक्क्यापेक्षा जास्त वाढ होतीये, असं रिपोर्टमधून स्पष्ट होतंय. तर कमीत कमी १ लाखांहून जास्त कमाई करणाऱ्या चॅनेलची संख्या दरवर्षी 60% वाढली आहे.

भारतातील जवळपास ८० टक्क्यांपेक्षा जास्त उद्योजकांनी सांगितलं की, त्यांच्या व्यावसायिक उद्दिष्टांवर  या प्लॅटफॉर्मचा खरंच सकारात्मक परिणाम झाला आहे. तर अहवालानुसार, जवळपास ९२ टक्के लहान आणि माध्यम उद्योजकांनी देखील होकारार्थी उत्तर दिलंय की,  युट्युब त्यांना जगभरातील नवीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत करतं.

युट्युबचा अर्थव्यवस्थेत प्रत्यक्ष परिणां जसा होतो तसाच अप्रत्यक्ष परिणामही होतो. तो म्हणजे कन्टेन्ट तयार करताना, निर्माते एक प्रकारची साखळी तयार करतात. एक व्हिडीओ तयार करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आणि सेवांवर पैसे खर्च करतात, जसं की व्हिडीओ एडिटर, ग्राफिक डिझायनर, प्रोड्युसर. ज्यामुळे अप्रत्यक्ष आर्थिक परिणाम देखील होतो. 

ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने कंटेंट शेअर केल्यानंतर मिळालेल्या कमाई व्यतिरिक्त जी कमाई युट्युबमुळे होते, त्याचाही उल्लेख यात केलाय. यामध्ये उत्पादनांची वाढलेली विक्री, ब्रँड पार्टनरशिप किंवा लाइव्ह परफॉर्मन्स यांचा समावेश होतो. अशाप्रकारे युट्युब रेव्हेन्यू उद्योजकांसाठी नोकऱ्या आणि उत्पन्न निर्माण करतं, असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. 

युट्युबचे प्रादेशिक संचालक अजय विद्यासागर यांच्यानुसार, सध्या स्मार्टफोनची वाढती विक्री आणि परवडणारे डेटा दर यामुळे लोकांचा सोशल मीडिया वापर वाढला आहे. म्हणूनच डिजिटल आणि सोशल मीडिया कंपन्यांसाठी भारत ही एक मोठी बाजारपेठ बनतंय. त्यातच देशातील युट्युब व्यवसायात आर्थिक वाढ, रोजगार निर्मिती आणि सांस्कृतिक प्रभावावरही परिणाम करण्याची क्षमता आहे.

इतकंच नाही तर एक सॉफ्ट-पॉवर म्हणून उदयास येण्याची क्षमता देखील युट्युबमध्ये आहे. तर युट्युबसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या कंटेटचा दर्जा देखील सुधारतेय म्हणून आता नेहमीपेक्षा जबाबदारी वाढलीये, असंही विद्यासागर म्हणालेत.

भिडूंनो, कधी विचार तरी केला होता का की, भारताची जीडीपी वाढवण्यात युट्युब सारख्या सोशल मीडियाचा वापर होईल म्हणून. पण असं झालंय. तेव्हा आता जर तुम्ही युट्युब बघताय आणि आई-वडिलांनी जर तुम्हाला त्यावरून रागावलं, तर ही माहीती तुम्ही त्यांना नक्कीच सांगू शकता आणि तुम्ही करताय ते कसं कामाचं आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करू शकता. (वयक्तिक रिस्कवर)

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.