प्राण्यांमध्ये सुद्धा भेदभावाचं राजकारण खेळलं जातं असं एका रिसर्च मधून समोर आलंय

भेदभाव करणं  हा माणसाचा स्वभावच आहे. कोणत्याही गोष्टीबद्दल हा भेदभाव मग चालू शकतो. अगदी घरी काही तरी खाऊ आणला की आपल्या भावाला आपल्यापेक्षा जास्त तर दिलं नाहीये ना? इथून भेदभावाचे तर्क लावायला सुरुवात होते. आणि पुढे जाऊन मग जात, धर्म, वर्ग, राज्य, देश अशा पातळीवर भेदभावाची भावना पसरत जाते. पण भेदभाव ही गोष्ट फक्त माणसांत होत नसून  प्राण्यांमध्येही होते असं तुम्हाला कळलं तर!

हो. प्राण्यांमध्ये असं भेदभावाचं राजकारण खेळलं जातं भिडूंनो. विषमता म्हणजेच उच-नीच असा फरक करणं ही गोष्ट केवळ माणसांपुरती मर्यादित नाहीये, असं नुकतंच एका अभ्यासातून समोर आले आहे. सस्तन प्राणी, मासे, पक्षी आणि अगदी कीटकांना वारशाने मिळालेली संपत्ती आणि क्षमता यांचा फायदा होत असल्याचं दिसून आलं आहे.

ज्याप्रकारे माणसांमध्ये पिढ्यानपिढ्या गोष्टी पुढे दिल्या जातात, ज्याला आपण वारसा असं म्हणतो मग त्यात संपत्ती, सत्ता, राहणीमान आणि प्रतिष्ठा यांचाही समावेश होतो, त्याचप्रमाणे प्राण्यांमध्ये संपत्ती आणि संसाधनांचे आंतरपिढी हस्तांतरण होत असतं, असं संशोधकांनी शोधून काढले आहे. प्राण्यांच्या पूर्वजांची कामं, त्यांचं स्टेटस आताच्या जिवंत प्राण्यांवर परिणाम करत असतं. त्यामुळेच काहींचं जीवनमान समान प्रजातीच्या इतर सदस्यांपेक्षा चांगलं असतं.

अगदी अन्न आणि निवारा यामध्येही ते वरचे समजले जातात, ते फक्त त्यांच्या पालकांच्या स्टेटसमुळे.

या अभ्यासात असं दिसून आलंय की, लाल खारीच्या काही प्रजाती त्यांनी साठवलेले नट आणि पाइनकोन त्यांच्या संततीला देतात, ज्यामुळे त्यांना प्रौढ जीवनात अंगभूत फिटनेसचा फायदा होतो आणि पिढ्यानपिढ्या असं चालूच असतं. तितरसारख्या पक्षांमध्ये तर काही वेगळंच घडतं. संभोगाचं  यश हे अनेकदा त्यांच्या पालकांच्या प्रभावावर अवलंबून असतं.  एखाद्या तितर पक्षाचे पालक जिवंत असतील तर त्यांना संभोगासाठी पहिला मान मिळतो.

तरसांमध्ये आईचा मान मोठा असतो. तरसांना  त्यांच्या आईकडून वारशाने दर्जा मिळत असतो. ही उच्च दर्जाची कुटुंबं मोठी असतात आणि इतर कुटुंबांपेक्षा जास्त जगतात. शिवाय अशा मोठ्या कुटुंबाना संसाधनांमध्ये सर्वाधिक प्रवेश असतो. इतकंच नाही तर अगदी पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांमध्येही रँक आणि विशेषाधिकार असतात, असंही अभ्यासात दिसून आलं आहे.

शिकारी मासे जेव्हा शिकार करायला येतात तेव्हा क्लाउनफिशला म्हणजेच जोकर माशाला समुद्रातील अॅनिमोन्समध्ये (लपण्यासाठीचे दगड) लपण्यासाठी पहिला प्रेफरन्स दिला जातो. हा अधिकार त्यांना वारशाने मिळतो. किटकांच्या जगात, काही गांधीलमाशांना त्यांच्या पालकांकडून घरटी मिळतात. अशा गांधीलमाशांना जास्त संतती होण्याची अधिक शक्यता असते. तर ज्यांना घरटी मिळण्याचा अधिकार नाहीये त्यांना जास्त संततीचा अधिकारही नसतो.

सांस्कृतिक आणि ऐतिहासिक घटक मानवी समाजातील विशेषाधिकाराच्या अभिव्यक्तीला आकार देतात. तर प्राणी समाजात, संपत्ती ही पालकांची काळजी किंवा सोशल नेटवर्क्सच्या ट्रान्सजनरेशनल प्रभावाच्या रूपात येते, शिवाय भौतिक संपत्तीचे थेट हस्तांतरण देखील होतं.

अभ्यासानुसार, चिंपांझी आणि कॅपुचिन माकडांना स्टेटसपेक्षा जास्त वारसा मिळतो. त्यांचे पालक नट क्रॅकिंगसाठी साधने त्यांना देतात. याचा अर्थ असा नाही की त्यांच्याकडे अन्नपदार्थ अधिक चांगल्या प्रकारे उपलब्ध आहेत, तर ते त्यांच्या संततीला साधने कशी वापरायची याबद्दलचे ज्ञान देत असतात.

आता एवढ्या सगळ्या गोष्टींवरून कळलंच असेल की प्राण्यांमध्येही भेदभाव हा परंपरा आणि वारशाने कसा पुढे येतो. त्यांच्यातही ‘तू बडा, मै बडा – तू पेहले, मै पेहले’ असं चालू असतं.

अगदी कुत्र्यांचंच घेतलं तर एखादा कुत्रा दुसऱ्या कुत्र्याच्या इलाक्यात आला तर त्याला हाकललं जातं. अनेकदा पाळीव कुत्रा इतर मोकाट कुत्रांसमोर ऐटीत चालताना आपण बघतो. अशा छोट्याछोट्या गोष्टींतून हा मुद्दा समोर येतो, जो आपल्या नजरेतून सहज निसटतो. पण ही तर सुरुवात असते. यामागेही खूप खोल विषय आहे हा ‘भेदभाव आणि वर्चस्ववाद’.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.