अवघ्या 20 वर्षाच्या शेतकऱ्याच्या पोरानं सुरू केलीय राज्यातली पहिली विना-अनुदानित चारा छावणी.

नुकतीच लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली. त्यानंतर राजकीय पक्ष जोमानं तयारीलासु्द्धा लागले. जनतेचे, शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेणारे नेते उमेदवारीसाठी दिल्ली-मुंबई दरबारी उठबस करायला लागलेत. माध्यमांमध्ये चर्चा, शक्यता, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत फक्त निवडणुकीचीच चर्चा सुरूय.

मात्र हे एकीकडं सुरू असतांना महाराष्ट्रातला शेतकरीवर्ग वेगळ्याच संकटाचा सामना करतोय. सध्या महाराष्ट्राच्या अनेक भागात भीषण दुष्काळ पडलेला आहे. या दुष्काळाच्या कचाट्यात शेतकरी अडकलाय. हंडाभर पाण्यासाठी मराठवाडा, लातूर, अहमदनगरमधील काही तालुक्यांतील लोकांना वणवण करावी लागतेय. शासनानं गंभीर आणि मध्यम स्वरूपाचा दुष्काळही जाहीर केलाय मात्र मदतीसाठी प्रशासनाचे कागदी घोडे अजूनही नाचतायेत.

दुष्काळानं होरपळून निघणारा शेतकरी, ओसाड पडत चाललेलं गाव. पाणी आणि चाऱ्याच्या कचाट्यात अडकडून जनावरांची होणारी फरफट. हे सगळं शरद मरकडला पाहवत नव्हतं. त्यामुळे ह्या शेतकऱ्यांच्या पोरानं अवघ्या 20 वर्षी आपल्या हिंमतीवर महाराष्ट्रातील पहिली चाऱ्यांची छावणी सुरू केली. त्यांची मुलाखत आम्ही बोल भिडू कार्यकर्त्यांनी घेतली. वाचा त्याच्या संघर्षाची ही कहाणी.

शरद मुळचा पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे या गावचा. पाथर्डी तालुका हा नेहमीच दुष्काळाच्या कचाट्यात अडकलेला. जिल्हाच्या शेवटच्या टोकाला आणि मराठवाड्याच्या सीमेला लागून असल्यामुळं अनेक सुख-सुविधांपासून पहिल्यापासूनच वंचित. पाथर्डी तालुक्याला दुष्काळ काही नवा नाही मात्र आत्ताचा दुष्काळ 1972 च्या दुष्काळाची आठवण करून देतोय.

शरद सांगतो, मी सध्या इंजिनीअरीयच्या शेवटच्या वर्षाला आहे. यावर्षी महाराष्ट्राच्या अनेक भागात दुष्काळ पडला आणि या दुष्काळात आमचा भागही होरपळू लागला. यंदा पावसानं पाठ फिरवल्यामुळे अनेकांच्या शेतात काही पिकलं नव्हतं. जुन्या चाऱ्यावरच शेतकरी आपलं जनावरं कशीबशी जगवत होती.

दिवसेंदिवस पाण्याची टंचाई भासायला लागली. पिण्याच्या पाण्याचे टॅकरही सुरू झाले मात्र जनावरांची फरफट व्हायला लागली. जनावरांचे खायचे वांदे व्हायला लागले. गावातली लोकं जनावरं खटकला देऊ लागली. पोटच्या पोरांप्रमाणं जगवलेली दावणीची जनावरं खटकाच्या दारात जाऊ लागली. हे कुठं तरी मनाला अस्वस्थ करणारं होतं. त्यातूनच ही चारा छावणी उभा राहिली.

सुरूवातीचे दिवस

शरद मरकडची घरची परिस्थिती अगदी बेताची. वडील शेतकरी. घरी जेमतेम दोन-चार एकर शेती. सगऴी शेती पावसाच्या पाण्यावर अंबलबून. महिन्यांचा कुटुंबाचा खर्च कसाबसा भागायचा. अशा परिस्थितीत छावणी काढणं म्हणजे खुप धाडसाचं काम होतं.

जिथं स्वत:चेच खायचे वांदे होते, तिथं लोकांचे जनावर दारात आणून जगवायचा विचारही डोक्यात येऊ शकत नाही.

शरद सांगतो, हे मात्र सगळं कुठंतरी मनाला खात होतं, डोळ्यादेखत कसायच्या दारात जनावर जात होती ते पहावत नव्हतं. त्यामुळे ठरवलं, सरकारची मदत भेटेल नाही भेटेल हे माहित नाही पण आपल्या परीनं जेवढं काही आपल्या शेतकरी बापासाठी करता येईल ते करायचं.

वडिलांचे बँकेत काही पैसे होते. त्यांना छावणीबद्दल सांगितलं. त्यांनी सुरूवातीला काही पैसे दिले. पहिल्यापासून शेतकऱ्यांसाठी आणि स्वाभिमानी पक्षात काम करत असल्यामुळं अनेकांचा माझ्यावर विश्वास होता. छावणीसाठी आमच्या भावकीतल्या वसंतदादांनी रस्त्यालगतची त्यांची जमीन दिली. मित्रांनी मदत केली. प्रत्येकानं कामाची जबाबदारी घेतली त्यातून या छावणीचा जन्म झाला.

54258245 1066106230249089 5781255366029344768 n

अनेकांचा सहभाग लाभला

राज्यात त्यावेळी एकही छावणी नव्हती त्यामुळे सुरूवातीला मराठवाड्यातूनही भरपूर जनावरं आली. आसपासच्या गावातूनही यायला लागली. एवढा खर्च झेपण्यासारखा नव्हता. त्यामुळे प्रत्येकाचे दोनच जनावर घ्यायचे आणि ज्याची परिस्थिती खुपच गरिब असेल त्याचे चार घ्यायचे. एखादं महिना हे व्यवस्थित सुरू होतं. शासनाची अद्यापही काही मदत नव्हती.

त्यामुळे जवळपासचे पैसे संपले होते. परत जनावरं उघड्यावर येण्याची वेळ आली होती. मात्र ज्यांची जनावरं होती त्या शेतकऱ्यांनी धीर दिला. आपण लोकांसमोर हात जोडू जनावरं जगवण्यासाठी पैसे मागू.

पैशांसाठी तीसगावमध्ये फेरी काढली तेव्हा लोकांनी तब्बल 50 हजारांची मदत केली. त्यावेळी खरंच मला माझ्या कामाची पोचपावती मिऴतेय असं वाटत होतं.

कारण साध्या टपरीच्या मालकापासून ते मोठ्या दुकानाच्या दुकानदारानं आम्हाला सढळ हातानं मदत केली होती. टॅकरवाला आमचा मित्र सत्यवान आणि कैलास मोफत पाणी आणून देत होते. ज्याच्याकडून उधारीवर टँकर भरून आणले त्या लक्ष्मण मरकडनं पाण्याचा रूपया घेतला नाही. कळत नकळत लोक मदत करत होती. धीर देत होती. काहींनी तर आपल्या लग्नाचा खर्च टाळून आम्हाला मदत केली. त्यामुळे कुठंतरी ही छावणी तग धरून उभी राहिली.

यावेळी अनेक मातब्बर नेत्यांनी छावणीला भेट दिली, आश्वासनाची गाजरं दाखवून निघून गेली. एक दोघांनी मदतही केली. मात्र, तरीही जनावरांच्या जगण्याचा संघर्ष चालूच होता.

नगर जिल्ह्यातील सगळ्यात जास्त म्हणजे 45 चारा छावण्या सध्या एकट्या पाथर्डीत सुरू झाल्या आहेत.

मात्र, याबद्दल बोलतांना शरद सांगतो, मी माझ्या खिशातल्या पैशातून, लोकसहभागातून गेल्या तीन महिन्यापासून छावणी चालवतोय. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी माझ्या छावणीला मान्यता दिली नाही. प्रस्ताव सादर केला मात्र शिफारश आण असं सांगण्यात आलं. त्यावेळी मी सांगितलं होतं,

पालकमंत्री यांच्या शिफारशी जर छावण्या मंजुर करण्यासाठी लागत असेल,

तर जमीन विकून छावणी पाऊस पडेपर्यंत चालवीन, पण त्यांच्या दारात शिफारशीसाठी कधी जाणार नाही. मी स्वाभिमानाने तीन महिने छावणी चालवली आहे.

मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं ज्या छावणीत अजून एकही जनावर दाखल नाही, त्या छावणीला मान्यता दिली जाते. मी तीनशेक जनावारे सांंभाळतोय तरी मान्यता दिली गेली नाही. शासनाने माझ्यावर नव्हे, तर या छावणीतील शेतकऱ्यांच्या जनावरांवर अन्याय केला आहे.

मान्यता देत नाही म्हणून आत्मदहनाचा इशारा दिला त्यासाठी पोलिसांनी एकरात्र जेलमध्ये डांबून ठेवलं. मात्र, त्यानंतर शेतकऱ्यांचा आवाज वाढतोय पाहिल्यानंतर या छावणीला आत्ता कुठं मान्यता भेटलीय. मात्र पैसेे अजून काही भेटले नाहीत.

54462951 2066338893483955 6724382948180623360 n

शरद मरकड अवघ्या 20 वर्षाचा आहे. गेल्या तीन महिन्यापासून काॅलेज सांभाळून शेतकऱ्यांचे जनावरं जगावेत म्हणून तो झटतोय. सध्या या छावणीत जवळपास 335 ते 340 च्या आसपास जनावरं आहे. त्या जनावरांची योग्य ती दखल घेतली जातेय. या छावणीमुळे अनेकांच्या जनावरांना हक्काचं घर मिळालंय. मात्र शरदचा शेतकऱ्यांसाठीचा संघर्ष मोठा आहे. तसंच त्याच्या या संघर्षांत अनेकाचं सहकार्य आहे.

शरद मरकड- 9689225194

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.