लक्षात घ्या, महाराष्ट्रात पहिला सुशिक्षितांचा मोर्चा काढणारा नेता पदवीधर आमदार नव्हता..

एका बाजूला राजकारण आणि दूसऱ्या बाजूला बेरोजगारी. महाराष्ट्राच सध्याचं चित्र हेच आहे. रोज एक कंपनी बंद पडत असल्याची बातमी येते. राजकारणाने रंग भरल्यामुळे त्या बातम्या देखील छापून यायच्या कमी झाल्या. 

राजकारणामुळे झेंडे उचलण्याचा नवा व्यवसाय सुशिक्षित बेरोजगारांना मिळत असला तरी तो फक्त महिनाभरचा ठरतो.

ज्यांना झेंडे उचलता येत नाहीत असे बेरोजगार दिवसभर एकमेकांच्या फेसबुक फोटोंना लाईक करणे, MPSC-UPSC च्या नावाखाली वेळ मारून नेणे, दिवसभर चौकात बसून चला हवा येवू द्या मधले जोक्स मारणे असे उद्योग करत आहेत.

मिळलेली पदवी काहीच कामाची नाही अस वाटत असताना मात्र निवडणूक येते आणि पदवीला किंमत मिळते. निवडणूक संपली की पुन्हा पदवीची किंमत शून्य. 

खास आपल्या पदवीमुळे मत देता आल्याचं पदवीधरांना कौतुक वाटतं, पदवीधर आमदार काहीतरी करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते पण पुन्हा पहिले पाठे पच्चावन्न अस चित्र उभा राहतं.

अशा वेळी एका माणसाबद्दल सांगू वाटतं,

या माणसाने महाराष्ट्रातला पहिला सुशिक्षित बेरोजगारांचा मोर्चा काढला होता, अन् तो काही पदवीधर आमदार नव्हता… 

मोर्चा पण कसा १०० टक्के रिझल्ट देणारा. मोर्चा पाहून आणि नेत्यांच्या कुठलीही तडजोड न करता मागे हटण्याची वृत्ती पाहून तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी नोकरभरती सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्यामुळे त्यावेळीच्या सुशिक्षित मुलांना नोकऱ्या मिळू शकल्या. 

महाराष्ट्रातलं पहिलं सुशिक्षीत बेरोजगाराचं आंदोलन माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांनी केलं होतं. नगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यात हे आंदोलन करुन ते यशस्वी सुद्धा करून दाखवलं.

सालं होतं 1977. 

बबनराव ढाकणे त्यावेळी नव्यानेच स्थापन झालेल्या जनता पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी होते. पाथर्डी तालुक्यात डी.एड केलेली अनेक सुशिक्षीत मुले बेकार होती. पाथर्डी तालुका हा दुष्काळी असल्यामुळे नोकरीशिवाय घरची आर्थिक परिस्थिती सुधारणं कठीण होतं. हे बबनराव ढाकणेंनी ओेळखलं. या सुशिक्षीत बेकारांना एकत्र केलं. संघटना तयार केली. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मेळावे, परिषदा घेतल्या. मात्र त्याच्या परिणाम सरकारवर झाला नाही.

त्यामुळे या प्रश्नांसाठी तीव्र आंदोलन करण्याचे बबनराव ढाकणेंनी ठरवलं.

‘नोकरी द्या नाहीतर तुरूगांत ठेवा’ हा नारा दिला. आणि 1 आँगस्ट 1977 रोजी पाथर्डी तालुक्यातून 200 तरूणांना सोबत घेऊन पाथर्डी ते अहमदनगर असं तब्बल 54 किलोमीटर जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा काढला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी बबनराव ढाकणे आणि तरूणांना ताब्यात घेतलं आणि विसापूर जेलमध्ये टाकण्यात आलं. बबनरावांना तुरूंगात टाकलं असल्याची बातमी तालुक्यात समजल्यानंतर अनेक युवक स्वत:ला अटक करून घेण्यासाठी विसापूर जेलमध्ये यायला लागले. त्यामुळे आंदोलन करणाऱ्यांना जेलमध्ये ठेवण्यासाठी जागा कमी पडू लागली. विसापूर जेल तुंडुंब भरलं.

या आंदोलनाची दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी बबनरावांना सोडण्यास सांगितलं.

मात्र जो पर्यंत या सुशिक्षीत बेरोजगारांना नोकरी मिळत नाही तोपर्यंत मी जेलमधून बाहेर पडणार नाही, असा पवित्रा बबनरावांनी घेतला. बबनरावांच्या इच्छेपुढं सरकार हतबल झालं. मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी आदेश काढत पदवीधर नोकर भरती राज्यात सुरू करण्याचे आदेश दिले.

त्यानंतर तब्बल तीन आठवडे बबनरावांसोबत जेलमध्ये असणाऱ्या सुशिक्षीत बेरोजगारांची सुटका करण्यात आली. 

बबनराव ढाकणेंच्या नेतृत्वाखाली केलेलं महाराष्ट्रातील पहिलं सुशिक्षीत बेकारांचं आंदोलन अशा पद्धतीने यशस्वी झालं आणि अनेक पदवीधर युवकांना नोकऱ्या मिळाल्या.

पण आज महाराष्ट्रातील बेरोजगारीचा आकडा ४५ लाख १ हजार ४२६ इतका आहे. माहिती अधिकार मिळालेली ही आकडेवारी आहे. इतकी मोठ्ठी संख्या असताना देखील आज बेरोजगारीवर बोलण्यासाठी एकही नेता पुढे येत नाही याच आश्चर्य वाटतं. 

  • श्रीराम गरड. ( ९५२७०६०८४८ )

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.