आमच्या मित्रांनी असाच एक व्हिडीओ व्हायरल केलेला, उमेदवार पडला पण त्यांना अजून लाज वाटते. 

२०१४ च्या लोकसभेच्या इलेक्शन. मोदींच वार होतं तेव्हा. भाजपकडून संजयकाका पाटील उमेदवार होते. तर कॉंग्रेसकडून प्रतिक पाटील निवडणूक लढत होते. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते चांगले मित्र. पण इलेक्शनच्या काळात एकमेकांचे पक्के वैरी. इलेक्शन झालं की परत एकच कट्टा ठरलेला. 

मतदारसंघात धनगर समाजाची मत खूप प्रभावी ठरायची. धनगर समाजाची एकगठ्ठा मते पडली तर उमेदवार लाख दोन लाखांच्या मतांनी निवडून येवू शकत होता. धनगर समाजातील तरुणांची मतं ही कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात गेली होती. पण स्व. वसंतदादा पाटील यांच समाजासाठी देखील मोठ्ठ योगदान होतं. त्यामुळे जुनीजाणती मंडळी कॉंग्रेसच्या आणि दादा घराण्याच्या बाजूने असायची. 

झालं अस की मतदानाला चार दिवस राहिले असतील. इतक्यात एक व्हिडीओ व्हायरल झाला. व्हिडीओ होता कॉंग्रेसचे उमेदवार प्रतिक पाटील यांचा.

यात प्रतिक पाटील म्हणत होते, 

धनगर समाजाचा मेंदू गुडघ्यात असतो. 

बघता बघता व्हिडीओ व्हायरल झाला. धनगरच काय तर मराठा समाजाला सुद्धा राग आला. गुण्यागोविंदाने राहणाऱ्या लोकांना भडकणं कुठल्याही चांगल्या माणसाला पटणार नव्हतं. तिकडून प्रतिक पाटलांनी सारवासारवीचा प्रयत्न केला पण अशा वातावरणात प्रतिक पाटलांकडं लक्ष कोण देणार. व्हिडीओ व्हायरल झाला. धनगर बहुल भागाचा विचार केला तर सहज लक्षात येईल हा व्हिडीओ परिणामकारक ठरला की नाही. 

इलेक्शन संपल्या. प्रतिक पाटलांचा पराभव झाला. पुन्हा दोन्ही गटातले कार्यकर्ते एकत्र बसू लागले. पुलाखालणं पाणी गेलं आणि एक दिवस व्हिडीओचा विषय निघाला. प्रतिक पाटलांच्या गटातला मुलाने दूसरा व्हिडीओ दाखवला.

तोच व्हिडीओ, तिच सभा तेच भाषण. फक्त या व्हिडीओतलं भाषण पुर्ण होतं. 

प्रतिक पाटील म्हणाले होते, धनगर समाजाचा मेंदू गुडघ्यात असतो त्याच्या पुढचं आणि मागचं. 

या भाषणात ते म्हणतं होते, 

विरोधकांना अस वाटतय, धनगर समाजाचा मेंदू गुडघ्यात असतो. पण माझ्या बांधवांना कळतय विकास झाला का नाही. 

फक्त पुढे आणि मागे एकच कट लावून व्हिडीओ फिरला.

हे काम अनेकदा कार्यकर्त्यांकडूनच होतं. नेत्यांना देखील याची माहिती नसते. 

उमेदवार त्यापासून नामनिराळेच राहतात. पण सहज व्हायरल करणाऱ्यांना देखील आत्ताच कळलं होतं आपण किती चुकीची गोष्ट फिरवली. 

दोन दिवसात वातावरण फिरवण्याचा हुकमी एक्का असतो तो म्हणजे व्हिडीओ कट करुन फिरवणे.

आत्ता सोशल मिडीया असल्यामुळे याचा वापर जोरात होत. पण प्रत्येकाने एकच गोष्ट लक्षात घ्यावी ती म्हणजे संपुर्ण व्हिडीओ पहावा. विरोधक आणि सत्ताधारी मग तो कोणत्याही गटाचा असो, कोणत्याही पक्षाचा असो संपुर्ण बाजू ऐकावी. कोण काय म्हणतं ते समजून घ्यावं आणि मत तयार करावं. 

कारण नेता कोणताही असो तो भाषण करतो, त्याच भाषण कट होवू शकतं. पाहीजे तो भाग कट करुन फिरवला जावू शकतो पण वेळ प्रत्येकावर येवू शकते. पण आपण मतदार असतो. सुज्ञ असतो. आपण संपुर्ण गोष्टी पाहूनच विचार केला पाहीजे. मग चूक आणि बरोबर ठरवलं पाहीजे. कोणीतरी आपला वापर करुन घेतल्यानंतर वाटते ती फक्त लाज. म्हणूनच. 

1 Comment
  1. Sambhaji mane says

    धनंजय मुंढे विरूद्ध हे षढ यंत्र आहे पण जणता सुज्ञ आहे राजकारण करावे पण इतक्या खालच्या दर्जाचे करू नये

Leave A Reply

Your email address will not be published.