तुम्ही १०० कोटी कसे खर्च करणार ? 

कितीची ऑफर शंभर कोटींची. कर्नाटकचे प्रचंड आशावादी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी टिव्हीवरती हा आकडा सांगितला आणि कित्येक घरांच्या स्वयंपाक घरातून भांड्यांचा आवाज आसमंतात दुमदुमला. म्हाताऱ्या कोताऱ्यांच्या बोबड्या वळल्या. सातव्या वेतन आयोगवाल्यांना उन्हाळ्यात सत्तराव्या वेतन आयोगाचा फिल आला. तरुणांच गोव्याला जाण्याचं स्वप्न फुललं तर तरुणींना लग्न अजून एक वर्ष लांबवता येण्याचा कॉन्फीडन्स आला. 

१०० कोटीं म्हणजे किती ? दोन हजारांच्या नोटांनी भरलेली नेमकी किती पोते ? नेमके किती शुन्य ? हे काढायचे म्हणले तरी ATM च्या लाईनमध्ये उभा रहायला लागणार का ? असे एक से अनेक प्रश्न बोलभिडूला वाचकांनी विचारले. म्हणूनच एखाद्या CA च्या ताकदीने आम्ही तुमच्यासाठी घेवून आलोय १०० कोटींमध्ये काय करता येवू शकतं. 

 

सोनं –  

अडीअडचणीला उपयोगी होईल म्हणून सोनं करणं का सर्वात सोप्पा मार्ग आहे. १०० कोटीत किती सोनं. सोन्याचा सर्वसामान्य दर आपण ३०,००० हजार तोळा धरुन चालू. हिशोबाला बर पडतं.

तीस हजार = तोळा 

तीन लाख = दहा तोळे. 

तीस लाख = एक किलो. 

तीन कोटी = दहा किलो 

तीस कोटी = शंभऱ किलो 

नव्वद कोटी = तीनशे किलो 

१०० कोटी = तीनशे तीस किलो. 

अजूनही सोनं येवू शकतं. त्याचं काय करायचं. करु की पाव्हण्यारावळ्यांना त्यात काय एवढं. गावाकडच्या म्हातारीला एखादी बोरमाळ सुटायलाच हवी की यातनं. 

Screen Shot 2018 05 19 at 10.55.12 AM

 

पतसंस्था गुंतवणूक –  

पतसंस्थेचा चालू व्याजदर हा दहा टक्के धरुन चालू. बॅंकेचा आपण आठ टक्के धरू. भले ठेव बुडू दे पण दोन टक्यांचा व्याजदर बुडवण्याचं नुकसान मराठी माणूस कधीच करणार नाही. आपण पतसंस्थेचा विचार करु. 

आत्ता मार्केट रेट चालू आहे दहा टक्के. म्हणजे शंभर कोटींचे वर्षाला दहा कोटी. महिन्याला कोटभर रुपयांच्या घरातच धरून चालू. विचार करा आयुष्यभर महिना कोटभर रुपये मिळत राहतील. 

वाह ताज, रोज ताज.  

 

जागा खरेदी विक्री – 

शंभर कोटीं स्टाईलमध्ये इनवेस्ट करण्यासाठी हा पर्याय सर्वात जवळचा ठरू शकतोय. विचार करा जागेचे रेट आज काय चालू आहेत. प्रत्येक शहरात चार पाच गुंठे जागा घेत गेलात तर महाराष्ट्राचा गावागावात जागा होतील ? शक्यता कमीच आहे तरी आपण पन्नास एक गावं तरी धरुन चालू. महाराष्ट्रातल्या पन्नास गावांमध्ये आपली इस्टेट आहे म्हणल्यानंतर राजकारणाच्या ऑफर येतील पण आपण त्याला भूलायचं नाही. १०० कोटींमध्ये आपण स्वत:ची विधानसभा बांधू शकतो.  आज मुड झाला की मुख्यमंत्री व्हायचं, उद्या मुड झाला की राज्यपाल. नेहमीच पाय जमिनीवर असावेत म्हणून मध्ये आध्ये आपणच विरोधी पक्षनेता व्हायचं. आपल्या राज्याला आपण एक दिवस गोवा म्हणू दूसऱ्या दिवशी मणीपूर. पण राज्य आपलं सरकार आपलं. शंभर कोटींमध्ये स्वत:च राजकारण. 

 

लग्न समारंभ – 

“रुखवत मोजण्यास पगारानं माणसं ठेवणे आहेत” अशी जाहिरात देणारे महाराष्ट्रातील तुम्ही एकमेव व्यक्ती ठरू शकता. बोल कुठं लग्न घ्यायचं असा प्रश्न टाकून पुन्हा गावातल्या मंगलकार्यालयातच आपण जाणार आहोत. असो पंचक्रोशीतलं सर्वात सुंदर ठिकाण निवडू. त्यास पुण्यातल्या गणपती मंडळांसारखा देखावा उभा करु. पाच पन्नास बॅन्जो पार्ट्या सांगू. इराणवरुन घोडे आणू. बुंदी पाडायला खास उत्तरेतून माणसं बोलवू. पाच तोळ्यांची अंगठी घालू आणि बुंदी वाढताना ती नाचवू. बोट नाचवतच आपण बुंदी वाढायला सांगू. खाणारा पण खुष आणि त्यानं आपली अंगठी बघितली म्हणून आपण पण खूष. 

Screen Shot 2018 05 19 at 10.40.45 AM

 

किराणा भरणं –  

आपला महिन्याचा किराणा किती ? पाच हजार दहा हजार. आम्ही चार माणसं असणाऱ्या मध्यमवर्गीय समाजास खर्च विचारला त्यांचा खर्च दहा हजार होता. आपण दहा हजार धरुन चालू. 

महिना –  दहा हजार 

वर्षाला –  एक लाख वीस हजार 

१० वर्ष –  १२ लाख रुपये. 

१०० वर्ष –  १ कोटी वीस लाख 

५०० वर्ष –  ६ कोटी … 

यात महागाई दर जमा करत जा. पुढे त्याला तुमच्या एवरेज पिढ्यांनी भागा व विचार करा आपल्या किती पिढ्या बसून खावू शकतात. कित्येक पिढ्या… 

अजून अजून काही सुचतय का ? सुचलं तर कमेंट बॉक्स आहे की. बिनधास्त लिहा. १०० कोटींच काय करणार ते ?  आम्ही आहोतच छापायला.

Leave A Reply

Your email address will not be published.