लस्ट स्टोरी : लव्ह आणि सेक्सच्या मधला फॅमिली पॅक.

जगात दोन प्रकारची लोक असतात. पहिला DDLJ चा राज. तो काजोल वर एकादाच प्रेम करतो. तिच्या घरी जातो. गाणी म्हणतो वगैरे वगैरे. दूसरे असतात वासू. हंटर सिनेमातला वासू. तो पण घरी जातो फरक इतकाच तो कोण नसताना जातो आणि कोण नसताना येतो. 

त्यानंतर तिसरी माणसं येतात. त्यांची संख्या जगात निम्याच्या वरती असावी. जे प्रेमात सेक्स शोधतात किंवा सेक्समध्ये प्रेम शोधतात. किंवा प्रेम आणि सेक्स या दोन्ही गोष्टी गरजेच्या असतात किंवा सेक्स पुर्ण होत नाही म्हणून प्रेम करतात. प्रेम सेक्स सेक्स प्रेम अस करत जो केमिकल लोचा होतो ती स्टोरी म्हणजे लस्ट स्टोरी. म्हणूनच ती जवळची वाटते एखाद्या वासूनं भावूक रात्री आयुष्यात आलेल्या एखाद्या मॅरिड बाईबद्दल सांगितलेली गोष्ट. तिनेही त्याला कित्येक रात्रीच्या एकाच रात्री काहीतरी सांगितलेल असत. अस काहीतरी वाटणार. कुठतरी भावना आणि सेक्सच्या अलिकडे पलिकडे घेवून जाणारी सिरीज म्हणजे लस्ट स्टोरी. 

लस्ट स्टोरी चार दिग्दर्शकांनी मांडलेला डाव आहे. अनुराग कश्यप, जौया अख्तर दिबाकर बॅनर्जी, करण जौहर या चार दिग्दर्शकांच्या चार शॉर्ट फिल्म एकत्र आल्या आणि फिल्म बनली. एका स्टोरीचा दूसऱ्या स्टोरीशी तितकाच संबध आहे. असलाच तर तो जितका सेक्स आणि लव्हचा असतो तितकाच आहे. 

पहिली स्टोरी अनुराग कश्यपची. राधिका आपटे कॉलेजमध्ये शिकवत असते. आकाश ठोसर त्याच कॉलेजमध्ये शिकत असतो. शिक्षक आणि विद्यार्थ्याची लस्ट स्टोरी. राधिका आपटेच लग्न झालय. पण गरजेसाठी तिला आकाश ठोसर देखील हवा आहे. वासूगिरी वाटणारी हि कथा पुढे आकाशच्या आयुष्यात असणाऱ्या प्रेयसीकडे सरकते. आत्ता सेक्सची जागा पझेसिव्ह पणात येते. प्रेम सेक्सच्या पलिकडे दगड नावाची गोष्ट असते. हक्काचा दगड ज्यावर कधीपण पाय ठेवता येतो. तसच काहीस नात्यात कन्फ्यूज करणारी हि स्टोरी. बर हे कन्फ्यूजन करणारी गोष्ट नायिकाच बोलून दाखवते तेव्हा आपण गोंधळतो आणि तिच्या ठिकाणी जावून बसतो. अनुराग कश्यपकडे पाहिलं तर त्यानं काय नविन केलं आहे अस जाणवत नाही. म्हणजे त्याचा फिल्म मध्ये पण जाणवणारा कल्ट इथे देखील जाणवतो इतकच. 

दूसरी स्टोरी जोया अख्तरची. भूमी पेडणेकर हि या कथेची नायिका. भूमी पेडणेकर हि वास्तविक बॉलिवूडला मिळालेली व्होडका आहे. हळुहळु ते बॉलिवूडच्या लक्षात येईलच. असो तर तिनं या कथेत मोलकरणीचा रोल केला आहे. घरात चालणाऱ्या सगळ्या गोष्टींना रिएक्शॅन देवून तीनं ज्या उंचीवर हि स्टोरी नेली आहे ते अफलातून. बॅचलर असणाऱ्या मालकाबरोबर संबध त्याच लग्न जुळण आणि तिनं फक्त प्रतिक्रिया देणं. तिची रिएक्शॅन तुमच्या रिएक्शॅनहून वेगळी असते. आणि यात हि फिल्म जिंकत असते. 

तिसरी स्टोरी दिबाकर बॅनर्जा यांची. आपल्याकडे बऱ्यापैकी चाललेल्या वेब सिरीजसारखी वाटणारी. पण ती वेगळी यासाठी वाटते कारण कोण कुणाचा कधी आणि कसा वापर करत याहून अधिक प्रत्येक नात्याची असणारी गरज या स्टोरीत जास्त क्लियर होते. नवरा पाहीजे, मित्र पाहीजे मुळात माणसं पाहीजेत हे समाजातील हायर क्लास ला सुद्धा भेडसावत असत. मनिषा कोईराला खूप वर्षानंतर पाहताना तिच्या गळ्यावर पडलेल्या सुरकुत्यांकडे लक्ष जातं. पण त्याचं क्लासची आणि वयाची स्टोरी तीनं हिट केली आहे. 

चौथ्या स्टोरीचा एक सीन कट होवून प्रत्येकाच्या वॉटसएपवरती आला. खरतर ती फक्त एक मज्जा. क्लायमॅक्सची. भलेभले संपादक, स्रीवादी लेखिका स्त्रीयांच्या सेक्स लाईफबद्दल बोलतात त्या सर्वांना एका फटक्यात मेन क्रक्स देण्याच काम करण जोहरने केल आहे. लग्न झालं की फिल्म संपत नाही, लग्नाच्या दोन वर्षांनंतर फिल्म चालू होते या करण जोहरच्याच मताला खोडून लग्नानंतर काय होतं ते त्यानं दाखवल आहे.

मुळात हा चार स्टोरीजचा फॅमिली पॅक नक्कीच आवडण्यासारखा आहे. यात मोलकरणीची स्टोरी आहे, कॉलेजच्या मुलाची आहे, शिक्षिकेची आहे, नवऱ्याची आहे, नवरीची आहे, लग्नाला वीस वर्ष झालेल्या बाईची आहे, तिच्यासोबत संबध ठेवणाऱ्या पन्नाशीच्या माणसाची आहे. थोडक्यात लस्ट स्टोरी वेगळं काहीच सांगत नाही जे आहे ते सांगतो. उग्गीच कोणतेही विचार घेवून धावत नाही.माणसाला माणूस म्हणून जे गरजेच असत आणि प्रत्येक माणूस कसा वेगळा असतो हे लस्ट स्टोरी सांगते. 

प्रेम आहे की सेक्सपुरत नात आहे या कन्फ्यूजनमध्ये असाल तर बघण्यासारखा आहे. जमलच नाही तर मित्र मैत्रीणीला किंवा स्वत:ला सोबत घेवून एक तासभर बसा तुमच्या मनातला लस्ट तुमच्याशी बोलू लागेल तिच लस्ट स्टोरी.  

Leave A Reply

Your email address will not be published.