दोन मिनिटात सुचलेलं ‘ऐरणीच्या देवा’ एवढं हिट होईल हे खुद्द लता दिदींना सुद्धा वाटलं नव्हतं.

साधी माणसं या चित्रपटातली जयश्री गडकर भाता ओढतांना म्हणते….

लक्ष्मीच्या हातातली, चौरी व्हावी वर-खाली
इडा-पिडा जाईल आली, किरपा तुझी भात्यातल्या सुरासंगं गाऊ दे.

ऐरणीच्या देवा तुला ठिणगी-ठिणगी वाहू दे
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे.

मराठीतल हे सुपरआयकॉनिक गाणं आजही नवी पिढी गुणगुणते. १९६५ च्या दरम्यान लता मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेलं आणि जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं हे गाणं असंच नाही तयार झालं. हे गाणं तयार होण्यामागे सुद्धा एक रंजक किस्सा आहे. होय ! कारण सुपर आयकॉनिक म्हंटल की त्यामागं किस्सा हा असतोच.

तर १९६५ च्या दरम्यान भालजी पेंढारकर साधी माणसं हा चित्रपट बनवत होते. या चित्रपटासाठी आनंदघन या नावाने लता मंगेशकर संगीत दिग्दर्शन करत होत्या. तर भालजी स्वतः योगेश या नावाने चित्रपटाची गीते लिहिणार होते.

त्यावेळी जगदीश खेबुडकर यांनी मराठी चित्रपट सृष्टीला अनेक लोकप्रिय गाणी दिली होती. भालजींसाठी पण त्यांनी गाणी लिहिली होती. पण भालजी पेंढारकर यांनी आपल्या ‘साधी माणसं’ या चित्रपटात खेबुडकरांची गाणी घ्यायची नाहीत असं ठरवलं होतं.

खेबुडकर म्हणतात,

भालजी पेंढारकर हे उत्तम गाणी आणि संवाद लिहणारे होते, त्यांनी साधी माणसं साठी स्वत: तसेच योगेश यांची गीते घेतल्याची बातमी त्यांनी वर्तमान पत्रात वाचली होती.

या दरम्यान कोल्हापुरात खेबुडकरांचा शिक्षकी पेशा असल्याने ते वर्गात शिकवण्याचं कामंही उत्तम पद्धतीने पार पाडत होते. मराठी चित्रपटांची त्या काळी कोल्हापुरातच मोठ्या प्रमाणात निर्मिती होत असे. असाच एकदा तास रंगात आला होता त्यात अचानक एक शिपाई आला आणि म्हणाला

तुम्हाला हेडमास्तर बोलिवत्यात

जगदीश खेबुडकर मुख्याध्यापकांकडे गेले. तेव्हा मुख्याध्यापक म्हंटले उपाध्यक्षांचा फोन आहे, बोला. फोनवर प्रत्यक्षात भालजी पेंढारकर बोलत होते. ते म्हणाले,

जगदीश असशील तसा निघून ये.

खेबुडकर म्हणाले, मी तासावर आहे, पुढचा तास ऑफ आहे तेव्हा येतो. खेबुडकरांना हेडमास्तर म्हणाले, तुम्ही आताच निघा, मी पुढचा शिक्षक तासाला पाठवतो.

खेबुडकरांनी सायकलीवर टांग टाकली आणि स्टुडिओत हजर झाले. खेबुडकर भालजींना म्हणाले बाबा काय बोलावणं?

भालजी म्हणाले, अरे जगदीश मी साधी माणसं करतोय. तेव्हा खेबुडकर त्यांना म्हणाले, हो मला माहित आहे, गीतंही तुमचीच आहेत. भालजी यावर म्हणाले, ‘हो मी काही गीतं लिहली आहेत, पण एका गाण्यासाठी अडलंय. खेबुडकर यावर म्हणाले कोणतं हो गाणं?

मला एक ‘थीम साँग’ हवं आहे. तुझं गाणी घ्यायची नाहीत असा प्रयत्न करून लिहतोय. पण या एका गाण्यावर अडलंय. चाल ही तयार आहे.

(हे गाणं लोहाराच्या भात्यावर गायलं जाणार असल्यामुळे लता मंगेशकरांना या गाण्यातील संगीतात लोहाराच्या भात्याचा टिपिकल आवाज हवा होता. त्यामुळे चाल त्यांनी आधीच तयार केली होती.)

भालजींनी खेबुडकरांना साधी माणसं चित्रपटातली कथा ऐकवली. लोहारकाम करणारं जोडपं, नवऱ्याबद्दल तिच्या भावना, लोहारांचा देव, त्यांना वाहिली जाणारी फुलं असं काहीतरी भावनात्मक आलं पाहिजे असं भालजी खेबुडकरांना सांगत होते.

‘गरीबीत सुद्धा त्यांना आनंद आहे, गाण्यात ते आलं पाहिजे, त्यांचा व्यवसायाचा त्यांना मनापासून अभिमान आहे, हे ‘थीम साँग’ वर्षानुवर्ष गाजलं पाहिजे, असं गाणं पाहिजे, असं सांगून त्यांनी खेबुडकरांना सांगितलं ‘कधी आणून देशील? विचारलं

तेव्हा खेबुडकर यांनी उत्तर दिलं, बाबा तुम्ही कथा सांगत होते, तेव्हाच डोक्यात ओळी छापल्या जात होत्या. कागद नाहीये माझ्याजवळ कागद आणि पेन द्या.

भालजींनी कागद आणि पेन दिला, यानंतर खेबुडकरांनी गाणं लिहण्यास जागीच सुरूवात केली. ऐरण आणि ठिणगी-ठिणगी या प्रमाणे खेबुडकरांना भालजी पेंढारकरांचे शब्द आठवले. लोहारांचा देव ‘ऐरण’ आणि फुलं कोणती तर कोळशातून उडणाऱ्या ‘ठिणग्या’. बाजूच्या खोलीत बसलेल्या खेबुडकरांनी ओळी कागदावर उतरवल्या आणि अख्ख गाणचं लिहून काढलं. लागल्या ओढीनं भालजींनी लता दिदींना फोन लावला व हे गाणं त्यांना फोनवरच सांगितलं.

आणि हे गाणं अजरामर झालं !

ऐरणीच्या देवा तुला…
ऐरणीच्या देवा तुला, ठिणगी ठिणगी वाहू दे
आभाळागत माया तुजी,
आम्हांवरी ऱ्हाऊ दे

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.