म्हणजे इतक्या मोठ्या ऍक्टरला पण बायकोचा धाक होताच की!

मी जेव्हापासून SRK ची फॅन आहे तेव्हापासून मी बऱ्याच लोकांना एक वाक्य बोलताना ऐकलंय ते म्हणजे SRK कॉपी कॅट आहे … तो नेहमी दिलीप कुमार यांची कॉपी करत आलाय! ते मला कधी पटलं नाही कारण मी दिलीप कुमार यांचं काही काम विशेष पहिलंच नव्हतं कधी..

80च्या दशकात जन्मलेली असल्याने मला दिलीप कुमार यांचं काय अप्रूप असणार म्हणा! मी कधी त्यांचे चित्रपट पाहिलेही नव्हते. नाही म्हणायला ‘मांग के साथ तुम्हारा’, ‘उडे जब जब जुल्फे तेरी’ हि गाणी मात्र आवडायची.

2010-11 ची गोष्ट, दिलीप कुमार जेव्हा लिलावाती हॉस्पिटल मधे ऍडमिट झाले तेव्हा सुरवातीला मला काहीच विशेष वाटलं नाही… त्यादिवशी घरी गेल्यावर आईला दिवासभरातल्या गमती जमती सांगताना मी हे असं सांगितलं.

मी: आई ,अगं आज ना, दिलीप कुमार ऍडमिट झालेत, मी सायरा बानो ना पण भेटले

आई: (प्रचंड खुश होऊन) अय्या माऊ! काय मजा! दिलप्या माझा खुप आवडता हिरो आहे! तू भेटलीस म्हणजे मस्तच गं! काय ग्रेट ऍक्टर आहे! आणि सायरा बानो पण छानच आहे! युसूफ खान आहे त्यांचं नाव माहितेय कि नाही तुला!

मी: हो आई , पेशंट फाईल वर खरं नावच असत पेशंटचं!

बाबा पण खुश झाले.. हे सगळं ऐकून मला वाटायला लागलं.. OMG!!! म्हणजे आपण एका ग्रेट ऍक्टर ला भेटून आलोय तर! माझ्यासाठी जसा SRK स्पेशल आहे तसे आई बाबांसाठी त्यांच्या काळात दिलीप कुमार असणार!

नंतर 2-3 वेळा जेव्हा त्यांना भेटायला गेले तेव्हा नेहमी सायरा बानो यांच्याशीच बोलणं झालं… गंभीर चेहेऱ्याच्या सायरा अगदि मोजकच बोलायच्या! चेहेर्यावरची माशीही कधी हलेल तर शपथ! नॅचरली त्यांना नवऱ्याच्या आजारपणाच टेन्शन आहे म्हंटल्यावर त्या माझ्या समोर ‘ मेरे यार शब्बा खैर’ वर डान्स नक्कीच करणार नव्हत्या! पण तरी मला त्या थोड्या खडुसच वाटल्या!”

मग एक दिवस दुपारी दोन-अडीच वाजता कॉल आला.. डायटीशीयन आणि शेफना दिलीपजीनी भेटायला बोलावलंय!

मनात आलं.. झालं! सायरा बानो ना नक्कीच काहीतरी तक्रार असणार! ( अश्या सेलिब्सच्या बाबतींत काही झालं की कधी कधी प्रकरण एवढं वाढू शकतं की नोकरी धोक्यात येऊ शकते!!) मला घाम फुटला! मी आणि माझी शेफ मैत्रीण लिफ्ट मध्ये चर्चाच करत होतो.. सगळं नीट वेळेवर गेलं होतं ना?, तू फूड टेस्टिंग केलं होतंस ना? असा सगळा विचार करतच आम्ही त्यांच्या रूम पर्यंत पोचलो..

आत शिरलो तर सायरा बानो काही रूम मध्ये नव्हत्या! हे पाहून थोड हुश्श वाटलं! दिलीप कुमार TV वर फुटबॉल ची मॅच पाहत होते… आम्ही दोघींनी त्यांना wish केलं आणि त्यांनी आम्हांला चक्क बसायला सांगितलं!

आम्ही त्यांना जेवणाबद्दल काही विचारणार त्याआधीच ते मला म्हणाले ..

 Do you watch football matches?

मी: No sir, I follow cricket more

त्यावर ते म्हणाले. (हिंदीत) प्रत्येकाने आयुष्यात एकतरी खेळ शिकायलाच हवा! खेळावर प्रेम करायलाच हवं! मी माझ्या वेळचा state level football player आहे! मला अस वाटतं खेळ हा माणसाच्या आयुष्यात एक Discipline आणतो! खेळ तुम्हाला फिट तर ठेवतोच पण एक वेगळाच आनंद हि देऊन जातो!

आम्ही दोघी थक्क होऊन हे सगळं ऐकत होतो! मधेच एकमेकींकडे बघत, मधेच त्यांच्याकडे बघत सहमती दर्शक मान हलवून हसतही होतो!

त्यानंतर त्यांनी आमच्या दोघींचे अगदी हात हातात घेऊन आभार मानले! त्यांच्या गालावरची गोड खळी, त्यांच्या लाल, गोऱ्या, मऊ- मऊ सुरकुतलेल्या हातांचा स्पर्श आणि त्यातली ऊब मला अजूनही आठवतेय! त्यांना आम्ही पाठवलेलं आदल्या रात्रीचं आणि त्या दुपारचं जेवण खूप आवडलं होतं म्हणून त्यांनी speical thanks सांगायला आम्हांला बोलावलं होतं हे समजल्यावर खूप आनंद झाला आणि त्यांच्याबद्दलचा आदर दुप्पट वाढला.

कोणताही गर्व नं बाळगता इतक्या मोठया व्यक्तीने Appreciation देण आमच्यासाठीं खरंच खूप मोठी गोष्ट होती!

नंतर निघताना म्हणाले माझी बायको घरी गेलीये म्हणून तुम्हाला आत्ता बोलावलं. ती असली कि मला अजिबात कोणाशी बोलू देत नाही! म्हणून आज सगळ्या हॉस्पिटल स्टाफशी गप्पा मारणार आहे, सारखं पडून पण मला कंटाळा आलाय हॉस्पिटलमध्ये!

हे ऐकून मला खूप हसू आलं, म्हणजे इतक्या मोठ्या ऍक्टरला पण बायकोचा धाक होताच की!

त्या भेटीनंतर मात्र मी आवर्जून दिलीप कुमार यांचे अगदी नया दौर, देवदास पासून सौदागर पर्यंत बरेच चित्रपट पहिले! दिलीपकुमार एक अभिनेता म्हणून किती ग्रेट आहेत हे मला उशिरा समजलं असलं तरी एक व्यक्ती म्हणून ते किती चांगले आहेत याचा प्रत्यय आधी आला याचा मला मनोमन आनंद आहे. त्यामुळेच कदाचित उशिरा का होईना, आई बाबांसारखीच मी हि त्यांची फॅन झाले!

  • गायत्री बर्वे गोखले

#cinemagully #सिनेमागली

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.