मिरजेच्या काँग्रेस आमदाराचं तिकीट दिलीप कुमारनी फायनल केलं होतं…
गोष्ट आहे १९९९ सालची. सोनिया गांधींच्या विदेशपणाचा मुद्दा उचलून धरत शरद पवारांनी बंड केलं होतं. त्यांना व त्यांचे सहकारी पी.ए.संगमा, तारिक अन्वर यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं. पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती.
राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतरच्या पहिल्याच निवडणूका होत्या त्या म्हणजे महाराष्ट्रातील विधानसभा.
त्याकाळी केंद्रात आणि राज्यात युतीची सत्ता होती. शिवसेनेचे नारायण राणे मुख्यमंत्री आणि भाजपचे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते. त्यांच्या विरोधात काँग्रेस आणि नव्याने स्थापन झालेलं राष्ट्रवादी काँग्रेस असा तिहेरी सामना होणार होता.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात तर उमेदवारांच्यासाठी मारामारी सुरु होती. दोन्ही पक्षांची विचारधारा एकच होती. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात स्थानिक राजकारणानुसार पक्षांची बदलाबदली सुरु होती. शरद पवारांनी हि निवडणूक सिरीयस घेतली होती. त्यांच्या पक्षाचा अस्तित्वाचा प्रश्न होता. त्यांनी अनेक तरुण नेते मंडळी राष्ट्रवादी मध्ये ओढली होती.
सांगली जिल्ह्यातल काँग्रेसचं मुख्य नेतृत्व वसंतदादा पाटील घराण्याकडे चालत आलेलं. वसंतदादांचे चिरंजीव प्रकाश बापू पाटील, पतंगराव कदम असे दिग्गज नेते काँग्रेसमध्ये राहिले. तर आर.आर.पाटील, जयंत पाटील हे तरुण नेतृत्व राष्ट्रवादी मध्ये गेलं.
सांगली जिल्ह्याच्या तिकीट वाटपाची मुख्य जबाबदारी पतंगराव कदमांच्याकडे होती. तिकिटासाठी रस्सीखेच सुरु होती. पक्ष सोडून कोलांटउड्या चालल्या होत्या. प्रत्येक गटाच समाधान करायचं अवघड काम पतंगराव कदमांच्या कडे होतं. त्यांनी सांगली जिल्ह्याच्या काँग्रेस उमेदवारांची यादी बनवली आणि महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेसकडे पाठवून देण्यात आली.
वरून जेव्हा यादी पुन्हा आली तेव्हा पतंगरावांनी दिलेले सगळे उमेदवार फायनल झाले होते फक्त मिरजेचा उमेदवार बदलण्यात आला होता. तिथे नवीन उमेदवार होते हाफिज धत्तुरे.
धत्तुरे यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. एक सर्वसामान्य बेकरी व्यावसायिक आणि वेळप्रसंगी लोकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून काँग्रेस पक्षात त्यांना ओळखलं जायचं. सांगली जिल्ह्यात आधीच असलेले गटतट यात हाफिज धत्तुरे कधीच बसले नाहीत. कोणतेही पैशांचे पाठबळ, राजकीय वरदहस्त नसतानाही त्यांना आमदारकीचा तिकीट कस मिळालं याच अनेकांना आश्चर्य वाटत होतं.
खुद्द पतंगराव कदम देखील चकित झाले होते. त्यांनी चौकशी केली आणि कळालं हाफिज धत्तुरे यांचं नाव खुद्द दिलीप कुमार यांनी फायनल केलं आहे.
खरं तर दिलीप कुमार हे काही राजकारणात नव्हते. त्यांचा सुरवातीपासूनच काँग्रेस विचारांशी ओढा होता. त्यांचे सुनील दत्त सारखे मित्र तेव्हा राजकारणात सक्रिय होते. खासदारकी जिंकत होते. स्वतः दिलीप कुमार यांना देखील अनेकदा आग्रह झाला होता, पण त्यांनी सत्तेच्या राजकारणात कधी सहभाग घेतला नाही. त्यापासून अंतरच राखलं.
मिरजेचे बेकरी व्यावसायिक हाफिज धत्तुरे यांची आणि भारताचे सुपरस्टार दिलीप कुमार यांची ओळख कशी हा प्रश्न देखील कित्येकांना सतावत होता. त्याच झालं असं होतं कि ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायजेशन ट्रस्ट नावाची एक संस्था आहे. दिलीप कुमार यांच्या मदतीने ती संस्था उभी राहिली असून त्यात देशभरातील मुस्लिम समाजातील अन्सारी, कुरेशी, बागवान, नई, मेहतर या मागास वर्गीयांत मोडल्या जाणाऱ्या कुटूंबासाठी कार्य केले जाते.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकतें या संस्थेशी जोडले गेले होते. यात हाफिज धत्तुरे यांचा देखील समावेश होता. ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायजेशन ट्रस्टच्या कुठल्याशा कार्यक्रमावेळी धत्तुरे आणि दिलीपमकुमार यांची भेट झाली होती. संस्थेच्या प्रत्येक कामात पुढे येऊन काम करणारा हा उत्साही कार्यकर्ता दिलीप कुमार यांच्या लक्षात राहिला.
पुढे जेव्हा तिकीट वाटप सुरु झाले तेव्हा दिलीप कुमार यांनी काँग्रेस पक्षाला विनंती केली की मिरजेचं विधानसभा उमेदवारी धत्तुरे यांना देण्यात यावी. याबदल्यात संपूर्ण राज्यभरात ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायजेशन ट्रस्ट काँग्रेसच्या पाठीशी राहणार होते. अखेर काँग्रेसने धत्तुरे यांना तिकीट जाहीर केलं.
संपूर्ण सांगली जिल्ह्यात हाफिज धत्तुरे यांना दिलीप कुमार यांनी तिकीट मिळवून दिलंय याही चर्चा झाली पण कोणालाच विश्वास बसत नव्हता. निवडणुकीच्या काही दिवस आधी चक्क दिलीप कुमार यांचं मिरजेला आगमन झालं. इतका मोठा सुपरस्टार मिरजेसारख्या छोट्याशा गावात येतोय याचा कित्येकांना सुखद धक्का बसला.
दिलीप कुमार मिरजेला आले, त्यांनी हाफिज धत्तुरे यांचा प्रचार केला. गोऱ्या गोमट्या दिलीप कुमार यांना मिरजेच्या रस्त्यावर प्रचार करताना बघून लोकांना वेड लागायची पाळी आली. त्यांनी हाफिज धत्तुरे यांना भरघोस मतदान दिलं. तब्बल १५ हजार मतांनी ते निवडून आले.
फक्त १९९९ नाही तर २००४ सालच्या निवडणुकीवेळी त्यांना तिकीट मिळालं. यावेळी पक्ष श्रेष्ठींकडून नाही तर स्वतः पतंगराव कदम यांनी आग्रह धरला आणि धत्तुरे यांना पुन्हा आमदारकी मिळाली. ते पुन्हा सलग दुसऱ्यांदा मिरजेत आमदार बनले.
साधी राहणी हि हाफिज भाई धत्तुरे यांची ओळख होती. मिरजेत अनेकदा रिक्षातून प्रवास करताना ते नजरेस पडायचे. पुढे राजकीय कुरघोडीत त्यांचं तिकीट कापण्यात आलं. धत्तुरे राजकारणाच्या शर्यतीत मागं पडत गेले.
मात्र इतकं असूनही आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत त्यांच्यावर कधीही कोणतेही आरोप झाले नाहीत अथवा घोटाळ्याचे डाग त्यांच्या कपड्यावर पडले नाहीत. शेवट पर्यंत स्वच्छ चारित्र्याचा लोकनेता म्हणून ते मिरज करांच्यात फेमस राहिले. १४ फेब्रुवारी २०१८ रोजी त्यांचं वाढदिवसाच्या दिवशीच हृदय विकाराने निधन झालं.
हे ही वाच भिडू.
- दादांच्या सांगलीत कॉंग्रेसला सुरुंग लावणारा पैलवान म्हणजे संभाजीअप्पा…!!
- मिरजेच्या जोकरमुळे भारतातली सर्कस परदेशी भूमीवर धुमाकूळ घालू लागली
- बाजारात स्टूल टाकून पेशंट तपासणाऱ्या डॉक्टरने दादांच्या उमेदवाराला आमदारकीला पाडलं