दिलीपकुमारांनी ट्रोलिंगला तसच प्रेमानं उत्तर दिलं असतं जस त्या ॲसिडहल्ला करणाऱ्याला दिल होतं

दिलीप कुमार यांची तब्येत नाजूक त्यांच्यासाठी प्रार्थना करा, असा आवाहन त्यांच्या पत्नी सायराबानो यांनी काही दिवसांपूर्वी केलं. अनेक माध्यमांनी ही बातमी लावली.

पण जेव्हा बातमी आली तेव्हा प्रत्येक ठिकाणी कमेंटमध्ये एकच सुर निघाला तो म्हणजे ट्रोलिंगचा…!!!

अजूनही आहे का हे, आत्ता गचक की, म्हातारा किती दिवस जगणार, हा तर पाकीस्तानचा युसूफ खान, याने तर निशाण ए हिंद स्विकारला होता वगैरे वगैरे. प्रत्येकजण दिलीप कुमारांच्या मरण्याची अपेक्षाच व्यक्त करत होता.

नेमकं काय झालं…? 

म्हणजे ट्रोलिंग करता येवू लागलं, एखाद्या गोष्टीवर व्यक्त होणं सोप्प झालं म्हणूनच असा तिरस्कार उफाळून येवू लागला की हे पूर्वीपासूनच होतं. एक पत्नी तिच्या नवऱ्यासाठी प्रार्थना करा म्हणून साकडं घालते. भले तो नवरा शंभरीत असो, तिच्यासाठी तो तिचा नवरा आहे याची आपण जाणीव ठेवत नाही.

असो तर असाच एक किस्सा या निमित्ताने सांगू वाटला म्हणून हा लेख, हा लेख वाचून एक गोष्ट लक्षात येईल आज दिलीपकुमार बोलण्याच्या स्थितीत असते तर तितक्याच प्रेमाने त्यांनी आपल्या मृत्यूची वाट पाहणाऱ्या ट्रोलरची मने जिंकली असती.

दिलीप कुमार यांना प्रत्यक्ष आयुष्यात असाच एक खलनायक भेटला होता. ज्याला दिलीप कुमार विसरू शकत नाहीत.

हा किस्सा तसा छोटासा. काहीसा गंभीर, काहीसा गमतीशीर..

दिलीप कुमार यांचं घर पाली हील येथे. आत्ता पाली हील येथे मुंबईतील श्रीमंत माणसं राहत असली तरी पूर्वी इथे शुकशुकाट असायचा. पूर्वीची मुंबई ही खऱ्याखुऱ्या निसर्गाने वेढलेली होती. त्यामुळे या भागात काहीसं जंगल होतं. या जंगलात एका दरोडेखोराचा वावर होता. तो येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना लुटायचा. 

दिवस पुढे जाऊ लागले तशी इथे माणसांची वस्ती वाढू लागली. ब्रिटीश अधिकाऱ्यांचे बंगले इथे उभारले गेले. आणि कालांतराने याच जागेवर बॉलिवुड मधील मोठ्या असामी राहायला आल्या. त्यापैकीच एक म्हणजे दिलीप कुमार.

दिलीप साब दानशूर वृत्तीसाठी प्रसिद्ध. त्यामुळे त्यांच्या बंगल्याबाहेर सदैव फकीर, गोरगरीब लोकांची वर्दळ असायची. एके दिवशी एक अज्ञात इसम दिलीप साबच्या बंगल्याबाहेर आला. तो बंगल्याबाहेर उभ्या असलेल्या सुरक्षारक्षकांची नजर चुकवून बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न करत होता.

परंतु दिलीप साब यांच्या बॉडीगार्डची नजर गेली आणि त्यांनी त्या माणसाला वेळीच अडवलं. त्या माणसाच्या हातात ॲसिडची बाटली होती. दिलीप कुमार यांच्यावर ॲसिड हल्ला करण्याच्या हेतूने तो इसम बंगल्यात घुसायचा प्रयत्न करत होता. 

ही गोष्ट दिलीप कुमार यांच्या कानावर गेली.

ते नेमकं काय झालं हे पाहण्यासाठी बाहेर आले. सर्वांनी पोलिसांना बोलवा अशी आरडाओरड सुरू केली. पण दिलीप साब शांत होते. त्यांनी पोलिसांना बोलवायला मनाई केली.

या सर्व गोंधळात बेकरी प्रोडक्ट घेऊन एक माणूस चालला होता. दिलीप साब यांनी त्याला थांबवले. त्याच्याकडून एक खाजा विकत घेऊन त्यांनी ॲसिड हल्ला करायला आलेल्या त्या माणसाला गोड असा खाजा खायला दिला.

पण त्या इसमाने तो खाजा झिडकारून फेकून दिला. 

तसं बघायला गेलं तर हा किस्सा इथेच संपला..

पण तो इसम दिलीप साब वर ॲसिड हल्ला करण्यासाठी का आला होता? दिलीप साब आणि त्याची अशी काय दुश्मनी होती?

याचं उत्तर असं..

ॲसिड हल्ला करणाऱ्या त्या व्यक्तीची बायको दिलीप कुमार यांचं सतत कौतुक करायची. त्यांच्या अभिनयाची कायम प्रशंसा करायची. हे त्या माणसाला सहन झालं नाही. म्हणून त्याने मत्सराच्या भावनेत दिलीप कुमार यांच्यावर ॲसिड हल्ला करण्याचा डाव आखला. दिलीप कुमारांनी त्याला ख्वाजा देवून अगदी प्रेमानं जिंकून घेतलं. 

आज दिलीप कुमार बोलण्याच्या स्थितीत असते तर त्यांनीही असच काहीस केलं असतं हे नक्की.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.