अजूनही उल्हासनगर रिंकू पाटील हत्याकांडाच्या कटू आठवणी विसरू शकत नाही..

३१ मार्च १९९० चा तो दिवस. जवळपास सगळ्याच पेपरच्या हेडलाईन या रिंकू पाटील या नावावर आधारित होत्या. उल्हासनगरात तीन दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला होता. सगळीकडे एकदम चिडीचूप वातावरण होतं.

आदल्या दिवशी उल्हासनगरात जे घडलं ते माणुसकीला काळिमा फासणारं होतं. निषेध, मोर्चे या सगळ्यांच्या पलीकडे हि घटना झालेली होती. शासनसुद्धा या विकृतीमुळे दबावात आलं होतं आणि न्यायाच्या अपेक्षेत लोकांनी सरकारला धारेवर धरलेलं होतं.

असं काय झालं होतं त्या दिवशी ? ३० मार्च १९९० चा तो दिवस होता. १० च्या बोर्ड परीक्षेचा शेवटचा दिवस. सेंचुरी रेयॉन हायस्कुल, उल्हासनगरात रिंकू पाटील शिकायला होती. परीक्षा सुरु झाली होती. वातावरण गंभीर तर होतंच शिवाय मुलं उत्साही सुद्धा होते कारण हा शेवटचा पेपर होता. सगळी मुलं पेपर लिहीत होती.

अचानक मोठा गलबला झाला, सगळीकडे आरडाओरडीचे आवाज येऊ लागले.

हा गोंधळ होण्याचं कारण होतं हरेश पटेल. हरेश पटेल या ४-५ जणांच्या टोळीचं नेतृत्व करत होता. त्यातल्या काहींच्या हातात धारदार तलवारी होत्या, एकाजणाकडे पिस्तूल होतं तर एकाच्या हातात पेट्रोलने भरलेला कॅन होता.

या टोळीने परीक्षा केंद्रात प्रवेश केला. दोन पोलीस कॉन्स्टेबल लोकांनी त्यांना अडवायचा प्रयत्न केला पण या टोळीने त्यांच्यावर हल्ला चढवला.

शेवटी हरेश पटेल आणि त्याची टोळी रिंकू पाटील ज्या वर्गात परीक्षा देत होती त्या वर्गात घुसले. इतर विद्यार्थी आणि शिक्षकांना धाक दाखवत त्यांना वर्गातून हाकलून लावलं. सगळेच विद्यार्थी जीव मुठीत घेऊन पळत सुटले. वर्ग रिकामा झाला फक्त एका मुलीला वर्गातून बाहेर पळून जाता आलं नाही ती होती रिंकू पाटील. वर्ग पूर्ण ताब्यात आल्यावर टोळीतील दोन गुंड दारावर पहारा देत बसले.

दरवाजे खिडक्या बंद करण्यात आल्या आणि हरेश पटेल जो टोळीचा म्होरक्या होता त्याने पेट्रोलचा कॅन रिंकू पाटीलवर रिकामा केला. रिंकूने किंचाळायला सुरवात केली, मदतीसाठी आर्जवा केली. मला वाचवाच्या किंकाळ्या परीक्षा केंद्रात निनादू लागल्या पण परीक्षा केंद्रावरील एकाचीही हिंमत झाली नाही कि रिंकू पाटीलला वाचवायला जावं. 

हरेश पटेलच्या टोळीला त्यांना हवं असलेलं सावज सापडलं होतं. पेट्रोलचा कॅन ओतल्यावर झटकन त्यानं काडी पेटवली आणि रिंकूवर फेकली. लालभडक आगीत होरपळणारी रिंकू हतबल झाली होती, पेटलेल्या अवस्थेत ती मदतीसाठी हाका मारत होती.

परीक्षा केंद्रामध्ये आवाज घुमत होता पण एकही जण तिला सोडवायला आला नाही. शाळेशेजारच्या चाळीत या किंकाळ्या जाऊन पोहचल्या, सगळी चाळ शाळेत जमा झाली. दरवाजा खिडक्यांतून आग धुमसत होती.

ज्वाला भडकत राहिल्या आणि रिंकूचे शेवटचे शब्द होते हरेश तू माझ्या मागे का लागलास ? आई बाबा…..! काही क्षणातच रिंकू जळून खाक झाली. हरेश पटेल आपल्या टोळीला घेऊन पसार झाला. गुंड पळून गेल्यानंतर सगळं परीक्षा केंद्र त्या वर्गात जमा झालं. रिंकूच्या आई वडिलांना हि बातमी कळली आणि त्यांनी जिवाच्या आकांताने शाळेत धडक दिली. तोवर रिंकू गेली होती.

गर्दी गोळा होऊ लागली. रिंकूच्या वडिलांनी रिंकूला पाहण्याची विनंती केली, पोलिसांनी नकार दिला तेव्हा रिंकूच्या वडिलांनी पोलिसांची कॉलर धरली. जमाव पोलिसांना मारण्याच्या बेतात होता. रिंकूच्या आईला तर काय करावं समजत नव्हतं त्या मटकन खाली बसल्या.

संध्याकाळी ६ वाजता रिंकूच प्रेत तिच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आलं. सगळं शहर हतबल झालं होतं. रिंकू पाटील सगळ्याच पेपरची हेडलाईन बनली होती. 

न्यायव्यवस्थेला प्रश्न विचारले जात होते. सरकारला धारेवर धरलं जाऊ लागलं. आरोपीना मृत्युदंडाच्या शिक्षा सुनावण्यात याव्या याच्या चर्चा झडू लागल्या. पुढे पोलिसांनी कसून शोध घ्यायला सुरवात केली. रिंकूच्या वडिलांनी तत्कालीन गृहमंत्री अरुण मेहता, मुख्यमंत्री शरद पवार यांना फोन फिरवले. सरकारी यंत्रणा झटपट कामाला लागली.

काही दिवसांनी हरेश पटेलच्या टोळीतील २ साथीदारांना पोलिसांनी शोधून काढलं. कोर्टाने या दोन्ही नराधमांना फाशीची शिक्षा ठोठावली. पण हरेश पटेल कुठं गायब झाला ? तर हरेश पटेलने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची बातमी आली. 

आता नेमकं हरेश पटेलने आत्महत्या केल्याने पोलिसांच्या आणि जवळपास सगळ्यांच्याच दृष्टीने हे प्रकरण संपल्यात जमा झालं होतं. पण हरेश पटेलने हे विकृत कृत्य का केलं होतं याविषयी अनेक तर्क वितर्क लावले जाऊ लागले.

रिंकू आणि हरेश पटेल यांचं प्रेमप्रकरण होतं पण रिंकूने त्याला नकार दिल्याने त्याचा इगो दुखावला आणि त्याने हे जळीतकांड घडवून आणलं.

रेल्वे ट्रॅकवर सापडलेलं ते हरेशचं प्रेत नव्हतंच.

हरेश पटेलने या दृश्याचं रेकॉर्डिंग केलं होतं आणि त्याच्या कॉपीज विकल्या होत्या. अशा अनेक वावड्या सत्य म्हणा किंवा असत्य म्हणा अशा बातम्या येत राहिल्या.

पुढे रिंकू पाटील प्रकरणावर निष्पाप नावाचा सिनेमासुद्धा येऊन गेला. रिंकू पाटीलच्या वडिलांनी जरी गुन्हेगारांना माफ केलं असलं तरी त्यांच्या मुलीचं जळीतकांड आजही अनेक जणांच्या अंगावर शहारा आणत. या आठवणी जरी झाल्या असल्या तरी हे जळीतकांड विस्मृतीत जाणारं नाही कारण सगळा महाराष्ट्र या घटनेने हादरला होता. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.