राजपुताण्याच्या स्वाभिमानासाठी एका स्त्रीला सती जावं लागलं !

राजस्थान ही वीर राजपुतांची भूमी.

ज्या भूमीवर महाराणी पद्मावतीने जोहर केला होता, त्याच भूमीवर ‘करणी सेने’ने संजय लीला भन्साळीच्या ‘पद्मावत’ चित्रपटाविरुद्ध एल्गार पुकारून चित्रपटात काम करणाऱ्या दीपिका पदुकोनला नाक कापण्याची धमकी देण्याचं काम करणी सेनेच्या ‘वीरां’नी केलं होतं.

स्त्रीची फक्त  पुराणात, इतिहासात आणि व्हॉटसअॅपच्या फॉर्वडेड मेसेज मध्येच पूजा करायची असते असं आजचं एकंदरीत चित्र असताना, दुर्दैवाने वीरभूमी राजस्थान हीच असल्या बेगडी वागण्यात सर्वात पुढे आहे. याचंच उदाहरण म्हणजे रूपकंवर कांड.

कोण होती रूप कंवर?

राजस्थानच्या सिकर जिल्ह्यात ‘देवराला’ नावाचं एक खेडं आहे. शेखावत क्षत्रिय रजपूतांमुळे या भागाला ‘शेखावाटी’ म्हणून ओळखले जातं. रूपकंवर ही याच गावची सून. तिचे सासरे सुमेर सिंह हे  देवरालामधल्या शाळेत शिक्षक होते. तिचा नवरा माल सिंह हा बीएस्सीचा विद्यार्थी. म्हणजे तसं हे घर सुशिक्षितांच.

रूपकंवर स्वतः हायस्कूल पर्यंतच शिकलेली. तीच वय होतं अवघं अठरा वर्षाचं. पोरीला शिकवून काय करायचं, या मानसिकतेतून तिचं लवकर लग्न लावून देण्यात आलं होतं. लग्नाला सात महिने झाले अन पोरगी माहेरी आली. आईकडून लाड करून घेत असताना माहेरी येऊन तीनच दिवस झाले होते. इतक्यात अचानक बातमी आली की रूपचा नवरा आजारी आहे. त्यामुळे तिला सासरी परत बोलवण्यात आलं.

roopkanwar 1 1513231870
रूप कंवर आपला पती मालसिंह शेखावत सोबत

नवरा तिन दिवस सुद्धा रुपशिवाय राहू शकत नाही असं म्हणून तिच्या मैत्रिणी तिला चिडवत होत्या, मात्र वडील आणि भावासोबत सासरी आल्यावर लक्षात आलं की प्रकरण थोडंस गंभीर आहे. माल सिंहला जिल्ह्याच्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. त्याला रक्ताच्या उलट्या येत होत्या. रूपच्या परत येण्यानेच बहुदा पण मालसिंहच्या  तब्येतीत थोडीशी सुधारणा झाली आणि तिने आपल्या भावाला आणि वडिलांना परत गावी पाठवलं.

त्यानंतर मात्र परत मालसिंहची प्रकृती खालावली आणि दोनच दिवसात ४ सप्टेंबर १९८७ रोजी सकाळी ८ वाजता मालसिंहचा मृत्यू झाला. रूप कंवर साठी तर हा फार मोठा धक्का असणार होता. चारच तासात तिच्या नवऱ्याचं शरीर देवराला गावी आणण्यात आलं.

हाडामासाची रूप कंवर क्षणार्धात राखेत खाक झाली 

दरम्यानच्या काळात गावामध्ये चर्चा सुरु झाली होती की आता रूपकंवरला मालसिंह सोबत सती जायला लागणार. राजस्थानमध्ये सतीची मोठीच  परंपरा आहे. त्यानंतर लागलीच रूप कंवरला खरोखरच सती जायचं आहे का, तिच्यात खरोखरच तेवढं पावित्र्य आहे का याविषयीची खलबतं गावातल्या जेष्ठ मंडळी आणि शास्त्र जाणणाऱ्या मंडळींमध्ये सुरु झाली. त्यासाठी तिची परीक्षा घेऊन खातरजमा देखील करून घेण्यात आली.

रूपकंवरला नववधूप्रमाणे सजवण्यात आलं. तिच्या हातात नारळ देऊन तिची गावभर मिरवणूक काढण्यात आली. तिथून तिला स्मशानात आणण्यात आलं, जिथ तिच्या नवऱ्याची चिता सजवण्यात आली होती.  शेकडो ‘भाविक’ हा ‘सोहळा’ बघायला हजर होते. कुठलाही पोलीस मात्र घटनास्थळी हजर नव्हता.

पंधरा मिनिटं रूपकंवर चितेभोवती फेऱ्या मारत राहिली. अखेर कोणी तरी तिला चितेवर चढायला सुचवलं. पोलीस येतील म्हणून गडबडीतच हा कार्यक्रम उरकून घ्यायचा होता. रूप चितेवर चढली. तिने आपल्या नवऱ्याचं शीर आपल्या मांडीवर घेतलं. तिच्या लहान दिराने काडेपेटीने पेटवून भावाच्या चितेला अग्नी दिला. गावकऱ्याच्या म्हणण्यानुसार तेव्हा आग पेटलीच नाही. अखेर सतीमातेच्या तेजाने आपोआप चितेने पेट घेतला.

चिता लवकर जळावी म्हणून गावातले ‘भाविक’ आपल्या घरातून आणलेलं तूप चितेत ओतत होते. ‘देवराला’वाले कहाणी सांगतात की चिता जळत असताना रूपकंवर तिथून खाली पडली होती, मात्र तिच्यात सती जाण्याची भावना इतकी तीव्र होती की ती जमिनीवर घसरत चितेकडे परत गेली. काही मिनिटातच रूपकंवर आपल्या नवऱ्यासह राख बनून गेली. दीड वाजेपर्यंत सारा खेळ संपला.

वडिलांनीच घेतला सती मातेचं मंदिर उभारण्यात पुढाकार

ललिता सैनी या देवराला पंचायत समितीच्या सदस्यानुसार रूप कंवरला ड्रगची गुंगी चढवण्यात आली होती. तुपाचा मारा तिच्यावर करून तिच्या आक्रोशाला न जुमानता “जय सती माता”च्या जयघोषामध्ये तिला जिवंत जाळण्यात आलं. स्वतःची धार्मिक परंपरा आणि राजपुताण्याचा अभिमान जपण्यासाठी एका निष्पाप जीवाचा बळी देण्यात आला.

नेहमीप्रमाणे पोलीस उशीराच घटनास्थळी पोहचले. त्यावेळी तिथे एकही साक्षीदार नव्हता. पोलीस कॉन्स्टेबलने स्वतःच एफआयआर बनवला. सुरवातीला ‘धार्मिक बाबतीत हस्तक्षेप’ या बाबी खाली कारवाई  करण्यात आली. मात्र संपूर्ण देशभरातून   या अघोरी प्रकाराविरोधात आवाज उठविण्यात आल्यानंतर मात्र प्रशासनाला पाउल उचलावे लागले.

रूपकंवरचे सासरे सुमेर सिंह यांना या प्रकरणात मुख्य आरोपी करण्यात आले. त्यांच्यासोबतच अन्य ३९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तिन दिवसांनी या प्रकरणात पहिली अटक झाली. मात्र इकडे गावात वेगळंच काहीतरी चाललं होतं. १६ सप्टेंबर रोजी रूप कंवरचे सगळे नातेवाईक गावात जमले.  रूप कंवर सती गेलेली जागा गंगाजल आणि दुधाने पवित्र करण्यात आली. त्रिशूळाला चुनरी लपेटून तिथे सती मातेचं मंदिर बनवण्यात आलं. यात रूपकंवरचे वडील देखील सामील होते.

chunri 010217 050020
चुनरी महोत्सव

त्यानंतरच्या काळात दरवर्षी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तिथे ‘चुनरी महोत्सव’ साजरा करण्यात येऊ लागला. पहिल्या वर्षी ५००० भाविक आले. पुढे त्यांची संख्या वाढत जाऊन ही संख्या पाच लाखांपर्यंत पोहचली. ९ वर्षानंतर जेव्हा या केसचा निकाल लागला त्यावेळी मुख्य आरोपी सुमेरसिंहसह सर्व आरोपी पुराव्याअभावी निर्दोष सुटले.

सतीची ही मध्ययुगीन अमानवी प्रथा राजा राम मोहन रॉय यांच्या प्रयत्नातून ब्रिटीश भारतात १८२९ सालीच कायद्याने बंद करण्यात आली होती. व्हिक्टोरिया राणीने सर्व संस्थाने आणि सर्व राज्यात १८६१ साली सतीला कायमची बंदी आणणारा कायदा केला होता.  पुढे शंभर वर्षांनी १९८७ साली भारताची मान अख्या जगात खाली घालायला लावणारे ‘सती रूपकंवर कांड’ घडून आल्यामुळे या प्रथेविरुद्धची शिक्षा कडक करण्यात आली.

आजही अनेक राजस्थानी या प्रथेचे समर्थन करताना आढळतात. बाईने शीलरक्षणासाठी आणि धर्मासाठी जोहर करावा अथवा सती जावे. यातूनच वीर राजपुताण्याची शान वाढते असे त्यांना वाटते. पद्मावत प्रकरणावेळी हीच मानसिकता उघड झालेली पाहायला मिळाली.

असं असलं तरी हळहळू राजस्थानी बायका घुंघटच्या बाहेर येत आहेत. स्वतःचे विचार खुलेपणाने मांडताहेत. पुरुषी सत्तेविरुद्ध आवाज उठवताहेत. स्वयंपाकघर सोडून  शिक्षणाच्या जोरावर स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत. हीच खरी भारतीय नारी आहे आणि हाच नारीचा खरा सन्मान आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.