लिंगेश्वरी मातेचं मंदिर, जिथे स्त्री रुपात केली जाते भगवान शंकराची पूजा !

देशातले वेगवेगळे मंदिर आणि त्यासंदर्भातील वेगवेगळ्या आख्यायिका यांची आपल्याकडे काही कमीच नाही. असंच एक लिंगेश्वरी मातेचं मंदिर, जिथे स्त्री स्वरुपात भगवान शंकराची पूजा केली जाते. विशेष म्हणजे भक्तांसाठी हे मंदिर वर्षभरातून एकदाच उघडलं जातं.

नेमकं आहे कुठे हे मंदिर..?

छत्तीसगडमधील फरसगावपासून ८ किलोमीटर अंतरावरील आलोर येथील डोंगरी प्रदेशातील एका गुहेत हे मंदिर आहे. शिव लिंगाच्या स्वरुपात असणाऱ्या या लिंगेश्वरी मातेकडे भगवान शंकराच्या शिव आणि शक्ती या या दोन्हीही रूपाचं प्रतिक म्हणून बघितलं जातं.

वर्षभरात फक्त एकदाच भक्तांसाठी खुलं

पारंपारिक मान्यतांनुसार या मंदिराचे दरवाजे भक्तांसाठी वर्षभरातून फक्त एकदाच उघडले जातात. प्रत्येक वर्षातील भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीनंतर येणाऱ्या बुधवारच्या मुहूर्तावर मंदिराजे दरवाजे उघडले जातात. या एकाच दिवशी मातेची पूजा-अर्चा केली जाते. बाकीचं संपूर्ण वर्षभर मंदिरातील शिवलिंग कापडाने झाकून टाकण्यात येतं.

मातेकडून भविष्यवाणी

ज्या दिवशी मंदिर उघडण्यात येतं त्याच दिवशी मंदिरातील मातेकडून पुढच्या वर्षभराच्या परिस्थितीची भविष्यवाणी देखील केली जाते. या भविष्यवाणीची पद्धती देखील निराळी आहे.

दरवर्षी ज्यावेळी मंदिर बंद करण्यात येतं, त्यानंतर मंदिरासमोर मोठ्या प्रमाणात वाळू पसरवून ठेवण्यात येते. त्यानंतर जेव्हा पुढच्यावेळी मंदिराचे दरवाजे उघडण्यात येतात, त्यावेळी मंदिरासमोर पसरवून ठेवण्यात आलेल्या वाळूवर पडलेल्या वेगवेगळ्या प्राण्यांच्या आणि फुलांच्या चिन्हावरून मातेकडून भविष्यवाणी करण्यात येते.

वाळूवर जर कमळाचं चिन्ह उमटलेलं असेल तर ते समृद्धीचं प्रतिक समजलं जातं, तर वाघाच्या पायाच्या चिन्हावरून भीतीदायक भविष्याची सूचना केली जाते. अशाप्रकारच्या वेगवेगळ्या चिन्हांचे वेगवेगळे अर्थ लावले जाते.

आपोआपच वाढतोय शिवलिंगाच्या स्वरूपातील मातेचा आकार

प्रतिवर्षी न चुकता या मंदिरात दर्शनासाठी आणि पूजा अर्चेसाठी जाणाऱ्या स्थानिक भक्तांच्या मते, मंदिरातील शिवलिंगाचा आकार आधी छोटा होता मात्र आता प्रतिवर्षी तो आपोआपच वाढू लागलाय. मातेचे भक्त हा एक चमत्कारच असल्याचे सांगतात.

मुलबाळ होऊ न शकणाऱ्या अनेक दाम्पत्यांना मातेच्या आशीर्वादाने अपत्यप्राप्ती झाली असल्याचा दावा देखील मातेच्या भक्तांकडून करण्यात येतो. त्यामुळे दरवर्षी अपत्यप्राप्तीची कामना घेऊन मंदिरात येणाऱ्या लोकांची संख्या देखील वाढू लागली असल्याची माहिती स्थानिक लोक देतात.

मंदिरासंबंधित आख्यायिका आणि चमत्कारांचे दावे यांकडे अंधश्रद्धा लोकांची म्हणून बघायचं की अजून काही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न. आम्ही फक्त ही माहिती तुमच्यापर्यंत पोहचवतोय.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.