मनसेच्या खळ्ळ-खट्याक आवाजामुळं कित्येक दुकानांच्या पाट्या मराठीत झाल्या होत्या…

”रमेश अरे तेवढं त्या दुकानाच्या पाटीकडे बघ रे, मराठीत पाटी असावी असा कायदा असताना त्यानं बघ इंग्लिश मध्येच ठेवलेय,” कदम काका रम्या हा सरकारी अधिकारी असल्यासारखं त्याच्याकडे तक्रार करत होते. ”त्या दुकानदाराच्या कानफटात जाळ काढायचा नाही का मग काका?” रम्यानं खिशातलं नोकियाचं डबडं काढत दरडवल्याच्या आवाजातच काकांना विचारलं. भावाचं लग्न दोन दिवसांवर आलं असताना आधी ‘लग्न कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं’ या आवेशातच कदम काकांनी सांगितलेल्या दुकानाकडं रम्या निघाला. एका दगडात रम्यानं काचेच्या साईन बोर्डचा पार भुगा केला.

”महाराष्ट्रात राहचंय तर इथले कायदे पाळावेच लागतील. उद्यापर्यंत इथं मराठीत बोर्ड नसू दे, मग तुला सांगतो,” दुकानदाराच्या कानफटात हाणतच रम्यानं दम भरला होता. दुसऱ्या दिवशीच बोर्ड लागला मात्र आदल्या दिवशीच पोलिसांनी रम्याला उचलून नेलं होतं. मोठ्या भावाचं घरातलं पहिलंच लग्नकार्य होतं पण रम्या मात्र कोठडीची हवा खात होता.

“जा गुजरातमध्ये, जा तामिळनाडूमध्ये जा कुठल्याही प्रांतामध्ये ज्याच्या त्याच्या राज्यामध्ये ज्याच्या त्याच्याच भाषेच्या पाट्या असतात मग आमच्या महाराष्ट्रात का नाही ?” राज ठाकरे यांनी त्यांच्या ओघवत्या शैलीत विचारलेल्या प्रश्नानं रम्यासारखे लाखो कार्यकर्ते पेटून उठले होते.

२००८ ला रेल्वेमध्ये मराठी पोरांना संधी मिळत नाही म्हणून बिहारी परीक्षार्थीना मारहाण करणं असू दे की परप्रांतीयांच्या विरोधातलं आंदोलन  प्रत्येक आंदोलनात लाखो मनसैनिक राज ठाकरेंच्या मागे उभे राहत होते. महाराष्ट्र दुकानावर मराठी पाट्या असल्याच पाहिजेत, असा कायदा असताना कायद्याची अमंलबजावणी का होत नाही असं म्हणत राज ठाकरेंनी एका नव्या मुद्याला हात घातला होता.

खळ्ळ-खटयाकच्या भाषेतच मनसेचे कार्यकर्ते दुकानदारानं कायदा ‘समजवून’ सांगत होते. हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते जेलमध्ये जात होते मात्र महाराष्ट्रभर खळ्ळखट्याक मात्र काय थांबत नव्हतं.

संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन,बाळासाहेब ठाकरे यांचं दक्षिण भारतीयां विरोधातील आंदोलन यांच्या गोष्टी पेपरात, पुस्तकात वाचणारी, नुकतंच कॉलेज झालेली किंवा कॉलेजात गेलेली पोरं या आंदोलनात पुढं होती. ना पदाची अपेक्षा ना पैशाची हाव, फक्त मराठी अस्मितेच्या नावाखाली ही पोरं मैदानात उतरली होती. राज ठाकरे तरुणांची डोकी भडकवत आहेत असा आरोपही होत होता मात्र मराठी अस्मितेचा मुद्दा तरुणांमध्ये घेऊन जाण्यास राज ठाकरे यशस्वी झाले होते.

हे आंदोलनही नंतर शांत झालं मात्र याचा मनसेला राजकीय फायदा मात्र मोठा झाला असं राजकीय जाणकार सांगतात.

२००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर निवडणुकीत उतरली. मात्र तरीही राज ठाकरेंनी केलेल्या या करिश्म्यामुळे मनसेचे तब्बल १३ आमदार निवडून आले. मनसेमुळे शिवसेना-भाजपा युतीचे अनेक ठिकाणी जबर नुकसान झाले. पण ह्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे शिवसेनेकडून मराठीचा मुद्दा खेचून आणण्यात राज ठाकरे यशस्वी झाले होते. मुंबईत दादर असू दे की पुण्याचा लक्ष्मी रोड मनसेच्या कार्यकर्त्यांनी दुकानावरच्या पाट्या दाखवत मतं मागितली होती आणि लोकांनीही त्यांना त्यांच्या या कामाला भरभरून प्रतिसाद दिला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.